शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी झटणारा आवाज हरपला.!मिलिंद हिवलेकर यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन; केळझर परिसरात शोककळा

0

🔥शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी झटणारा आवाज हरपला.!मिलिंद हिवलेकर यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन; केळझर परिसरात शोककळा

सेलू -/ केळझर येथील मूळ रहिवासी, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे वर्धा विधानसभा अध्यक्ष तथा लोहार समाज संघटनेचे ज्येष्ठ कार्यकर्ते मिलिंद सदाशिवराव हिवलेकर (वय ५२) यांचे मंगळवारी (ता. २४) पहाटे नागपूर येथे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने दुःखद निधन झाले. त्यांच्या अकाली जाण्याने केवळ राजकीय क्षेत्राचीच नव्हे, तर शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी सातत्याने आवाज उठविणाऱ्या एका संवेदनशील व्यक्तिमत्त्वाची पोकळी निर्माण झाली आहे.

मूळचे शेतकरी कुटुंबातील असलेल्या हिवलेकर यांना शेती आणि शेतकऱ्यांच्या अडचणींची जाण होती. शेतकऱ्यांच्या प्रश्नांशी त्यांची नाळ घट्ट जोडलेली होती. राजकीय क्षेत्रात सक्रिय असतानाही त्यांनी सर्वसामान्यांच्या प्रश्नांना प्राधान्य दिले. विशेषतः शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी प्रशासनाकडे पाठपुरावा करण्याची त्यांची भूमिका नेहमीच ठाम राहिली.

अलीकडेच दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर बोर धरणाचे पाणी शेवटच्या शेतकऱ्याच्या शेतापर्यंत पोहोचावे, यासाठी त्यांनी प्रशासनाकडे निवेदन सादर करून पाणी उपसा करण्याची मुदत वाढवून घेतली होती. शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये, त्यांची पिके पाण्याअभावी कोमेजू नयेत, हीच त्यामागील तळमळ होती. शेतकऱ्यांच्या हितासाठी त्यांनी केलेला हा शेवटच्या काळातील प्रयत्न त्यांच्या सामाजिक बांधिलकीची साक्ष देणारा ठरला.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे वर्धा विधानसभा अध्यक्ष म्हणून त्यांनी राजकीय क्षेत्रात सक्रिय भूमिका बजावली. त्याचबरोबर नागपूर येथील लोहार समाज संघटनेतही ते ज्येष्ठ कार्यकर्ते म्हणून परिचित होते. राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील त्यांचा दांडगा जनसंपर्क, कार्यकर्त्यांशी असलेले जिव्हाळ्याचे संबंध आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांबाबतची आस्था यामुळे त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली होती.

त्यांच्या निधनाची वार्ता समजताच केळझर परिसरासह राजकीय आणि सामाजिक वर्तुळात शोककळा पसरली. त्यांच्या पार्थिवावर मंगळवारी दुपारी नागपूर येथील अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात वडील, पत्नी, मुलगा असा परिवार आहे.

शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी धावणारे पाय थांबले, मात्र त्यांच्या कार्यातून जपलेली सामाजिक बांधिलकी आणि माणुसकीची आठवण कायम राहील.

ब्युरो रिपोर्ट साहसिक News-/24 सेलू,वर्धा 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!