तेरा दिवस ई-पॉस मशीनचा खोळंबा; रेशन दुकानदारांसह लाभार्थी त्रस्त!

0

🔥तेरा दिवस ई-पॉस मशीनचा खोळंबा; रेशन दुकानदारांसह लाभार्थी त्रस्त!🔥तेरा दिवस ई-पॉस मशीनचा खोळंबा; रेशन दुकानदारांसह लाभार्थी त्रस्त!

🔥 नाईस कंपनीचा ठेका रद्द करून नवीन कंपनी नियुक्त करण्याची रेशन दुकानदारांची मागणी

सेलू,प्रतिनिधी -/ तालुक्यातील रास्त भाव धान्य दुकानांमध्ये ई-पॉस (e-POS) मशीनच्या तांत्रिक अडचणी आणि नेटवर्कच्या समस्येमुळे रेशन वितरणाचा मोठा खोळंबा झाला आहे. तब्बल तेरा दिवस मशीन सुरळीत सुरू नसल्याने रेशन दुकानदारांसह गोरगरीब लाभार्थ्यांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. अखेर १४ ऑक्टोबर २०२६ रोजी मशीन सुरू झाल्यानंतर रेशन वितरणासाठी दुकाने उघडण्यात आली; मात्र मशीन अद्यापही व्यवस्थित चालत नसल्याने दुकानदार आणि लाभार्थ्यांच्या अडचणी कायम आहेत.

                    सध्या सणासुदीचे दिवस सुरू असताना रेशन वितरण व्यवस्थेतील हा बिघाड नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. रेशन घेण्यासाठी गरीब, गरजू आणि आदिवासी लाभार्थी आपले रोजंदारीचे काम सोडून दुकानांमध्ये येतात. मात्र, ई-पॉस मशीनच्या नेटवर्क समस्येमुळे त्यांना तासनतास प्रतीक्षा करावी लागत आहे. परिणामी, संतप्त लाभार्थी रेशन दुकानदारांवर नाराजी व्यक्त करीत असून काही ठिकाणी दुकानदारांना शिवीगाळही सहन करावी लागत असल्याची व्यथा व्यक्त होत आहे.

     🔥मशीन हातात घेऊन दुकानदार प्रतीक्षेत; कंपनीकडून मात्र ठोस माहिती नाही!

रेशन दुकानदारांच्या म्हणण्यानुसार, ई-पॉस मशीनच्या समस्येबाबत नाईस कंपनीकडून वेळेवर कोणतीही ठोस सूचना किंवा माहिती दिली जात नाही. दुकानदारांनी कंपनीच्या प्रतिनिधींना फोन केल्यास ‘थोडा वेळ थांबा’ असे उत्तर दिले जाते. त्यामुळे दुकानदार मशीन हातात घेऊन सतत प्रतीक्षा करतात; परंतु समस्या नेमकी कधी सुटणार, याबाबत स्पष्टता मिळत नाही.

🔥तेरा दिवसांच्या खोळंब्याची जबाबदारी कोणाची?

ई-पॉस मशीनच्या तांत्रिक समस्येमुळे सलग तेरा दिवस रेशन वितरण विस्कळीत राहिले. विशेष म्हणजे, सणासुदीच्या काळातच ही परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांच्या अडचणी अधिक वाढल्या आहेत. रेशन वितरणासारख्या अत्यावश्यक व्यवस्थेत एवढ्या दीर्घकाळ तांत्रिक अडथळे निर्माण होत असतील, तर संबंधित यंत्रणा आणि कंपनीच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. या तेरा दिवसांच्या विलंबाला जबाबदार कोण, असा सवाल रेशन दुकानदारांकडून उपस्थित केला जात आहे.

🔥नाईस कंपनीचा ठेका रद्द करा; नवीन कंपनी नियुक्त करा!

ई-पॉस मशीनच्या वारंवार होणाऱ्या तांत्रिक अडचणी, नेटवर्कचा खोळंबा आणि कंपनीकडून मिळणाऱ्या अपुऱ्या प्रतिसादामुळे तालुक्यातील रेशन दुकानदारांमध्ये तीव्र नाराजी आहे. संबंधित नाईस कंपनीचा ठेका रद्द करून सक्षम आणि तांत्रिकदृष्ट्या कार्यक्षम नवीन कंपनीला ठेका देण्यात यावा, अशी मागणी रेशन दुकानदारांकडून करण्यात येत आहे.प्रशासनाने या गंभीर समस्येची तातडीने दखल घेऊन ई-पॉस मशीन सुरळीत सुरू राहण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात. तसेच तेरा दिवसांच्या खोळंब्याची चौकशी करून जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणी सतीश भावरकर तालुका अध्यक्ष ऑल महाराष्ट्र फेडरेशन रेशन संघटना आणि सर्व रेशन दुकानदारानि केली आहे

ब्युरो रिपोर्ट साहसिक News-24 सेलू,वर्धा 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!