बाभुळगावात आरटीओची वाळू तस्करांशी मिलीभगत; पंचायत समितीसमोरच ‘तडजोड’ करून ‘लॅपटॉप’चा ट्रक सोडला!

0

🔥बाभुळगावात आरटीओची वाळू तस्करांशी मिलीभगत; पंचायत समितीसमोरच ‘तडजोड’ करून ‘लॅपटॉप’चा ट्रक सोडला!

🔥​नांदेसावंगी घाटावर १६-१७ फावड्यांनी नदी ओरबाडणे सुरू

🔥आरटीओ अधिकारी कारवाईऐवजी स्वतःची झोळी भरण्यात मग्न!

​यवतमाळ -/ बाभुळगाव तालुक्यात बेसुमार सुरू असलेल्या अवैध वाळू उपशावर अंकुश लावण्याऐवजी खाबुगिरी करणाऱ्या यंत्रणेचा संतापजनक चेहरा उघडकीस आला आहे. काल दुपारी बाभुळगाव पंचायत समितीच्या अगदी समोरच आरटीओ (प्रादेशिक परिवहन कार्यालय) अधिकाऱ्यांनी ‘लॅपटॉप’ नामक कुख्यात वाळू तस्कराचा ओव्हरलोड ट्रक अडवला खरा; मात्र काही वेळातच संशयास्पद ‘अर्थपूर्ण तडजोड’ करत हा ट्रक बिनदिक्कत सोडून देण्यात आला. नांदेसावंगी घाटावरून दररोज १६ ते १७ फावड्यांच्या साहाय्याने नदीचे पात्र अक्षरशः ओरबाडून खुलेआम तस्करी सुरू असताना, आरक्षक बनून आलेल्या अधिकाऱ्यांनीच तस्करांशी हातमिळवणी करत स्वतःची झोळी भरण्याचा उद्योग चालवल्याने नागरिकांमधून संतापाचा तीव्र भडका उडाला आहे. ​बाभुळगाव तालुक्यातून वाहणाऱ्या नदीपात्रांमधून सध्या वाळूमाफियांची समांतर राजवट सुरू असल्याचे चित्र आहे. पर्यावरणाचे नियम आणि कायद्याची बंधने पायदळी तुडवून दररोज लाखो रुपयांची वाळू पळवली जात असताना, यावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी असलेले प्रादेशिक परिवहन अधिकारी (आरटीओ) मात्र तालुक्यात कारवाईसाठी नव्हे, तर नियमित ‘हप्तेखोरी’साठी फेऱ्या मारत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. काल भरदुपारी घडलेल्या एका नाट्यमय घडामोडीने शासकीय यंत्रणा आणि वाळूमाफिया यांच्यातील साटेलोटे चव्हाट्यावर आणले आहे.
बाभुळगाव येथील पंचायत समितीच्या अत्यंत गजबजलेल्या परिसरासमोर आरटीओ अधिकाऱ्यांच्या पथकाने गस्त घालत असताना ‘लॅपटॉप’ या नावाने पंचक्रोशीत ओळखल्या जाणाऱ्या रेती तस्कराचा ट्रक अडवला. ट्रकमध्ये नदीपात्रातून काढलेली वाळू क्षमतेपेक्षा कितीतरी पट अधिक भरलेली होती. शासकीय इमारतीसमोरच कारवाई सुरू झाल्याचे पाहून परिसरातील नागरिकांची पावले थबकली आणि आरटीओ आता दणदणीत कारवाई करणार, अशी चर्चा सुरू झाली. मात्र, हा आव केवळ काही मिनिटांपुरताच मर्यादित ठरला.​प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, ट्रक बाजूला लावून संबंधित अधिकारी आणि तस्कराच्या प्रतिनिधींमध्ये गुप्त खलबते झाली. काही क्षणांतच ‘तोडपाणी’ पूर्ण झाली आणि कोणताही दंड न आकारता, कसलाही गुन्हा नोंद न करता, तोच रेतीचा ट्रक सुसाट वेगाने रवाना करण्यात आला. भरदिवसा पंचायत समितीच्या नाकावर टिच्चून झालेल्या या उघड लाचखोरीमुळे उपस्थित नागरिकांनी संताप व्यक्त केला.तालुक्यातील नांदेसावंगी नदीघाटाची सद्यस्थिती पाहिली तर वाळूमाफियांची मुजोरी किती शिगेला पोहोचली आहे याची प्रचिती येते. या घाटावर दररोज तब्बल १६ ते १७ लोखंडी फावड्यांच्या साहाय्याने रात्रंदिवस नदीच्या छातीवर वार केले जात आहेत. नदीपात्र अक्षरशः पोखरून काढले जात असून नैसर्गिक जलस्रोत नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. स्थानिक महसूल यंत्रणा याकडे जाणीवपूर्वक डोळेझाक करत असतानाच, रस्त्यावरून होणारी अवैध वाहतूक रोखण्याची जबाबदारी असणारे आरटीओ अधिकारी मात्र या लुटीत आपले उखळ पांढरे करून घेण्यात धन्यता मानत आहेत. गेल्या काही दिवसांपासून बाभुळगाव तालुक्याच्या ग्रामीण भागात आरटीओचे पथक अचानक सक्रिय झाल्याचे भासवत आहे. मात्र, ही सक्रियता वाहतूक नियमांच्या अंमलबजावणीसाठी नसून, केवळ नदीघाटावरून धावणाऱ्या वाळूच्या वाहनांची अडवणूक करून नियमित वसुली निश्चित करण्यासाठीच असल्याचा थेट आरोप आता स्थानिक नागरिक करत आहेत. ज्या अधिकाऱ्यांनी ओव्हरलोडिंग आणि नियमबाह्य वाहतुकीवर जप्तीची कारवाई करायला हवी, तेच अधिकारी तस्करांच्या गाड्यांना स्वतःच्या ‘अर्थपूर्ण आशीर्वादाने’ ग्रीन कॉरिडोअर उपलब्ध करून देत आहेत. ​तालुक्यातील सर्वसामान्य वाहनचालक अथवा शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टरवर नियमांचा बडगा उगारणारे हेच अधिकारी बड्या वाळू तस्करांपुढे मात्र लाचार का होतात, असा थेट सवाल सामान्य जनता विचारत आहे. नदीघाटांची होणारी लूट, शासनाचा कोट्यवधी रुपयांचा बुडणारा महसूल आणि रस्त्यावरून बिनदिक्कत धावणाऱ्या ओव्हरलोड गाड्यांमुळे रस्त्यांची होणारी चाळण याकडे वरिष्ठ पातळीवरून पूर्णतः दुर्लक्ष केले जात आहे. काल बाभुळगाव पंचायत समितीसमोर घडलेला ‘तोडपाणी’चा हा प्रकार केवळ हिमनगाचे एक टोक आहे. शासकीय पदाचा गैरवापर करून स्वतःची तिजोरी भरणारे ते आरटीओ अधिकारी कोण? ‘लॅपटॉप’ नावाच्या तस्कराशी त्यांचे काय लागेबांधे आहेत? आणि नांदेसावंगी घाटावर सुरू असलेला बेकायदेशीर उपसा कोणाच्या छत्रछायेखाली सुरू आहे, याची उच्चस्तरीय चौकशी होणे गरजेचे आहे. ​लाचखोरीचा हा उघड खेळ तात्काळ न थांबल्यास आणि संबंधित भ्रष्ट अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई न झाल्यास, स्थानिक नागरिक आणि सामाजिक संघटनांनी थेट रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे. प्रशासन यावर कोणती ठोस कारवाई करते की वाळूमाफियांच्या दावणीला बांधल्याप्रमाणे गप्प बसते, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.(क्रमशः)

ब्युरो रिपोर्ट साहसिक News-/24 यवतमाळ 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!