🔥ठाणेदार दिपमाला भेन्डेंच्या वरदहस्तामुळे बाभूळगाव तालुका वाळूच्या विळख्यात!
बाभूळगाव (प्रतिनिधी) -/ यवतमाळ जिल्ह्याच्या बाभूळगाव तालुक्यात कायद्याचे राज्य संपून वाळूमाफियांची उघड दहशत आणि समांतर राजवट सुरू असल्याचे संतापजनक वास्तव समोर आले आहे. सर्वोच्च न्यायालयाचे आदेश, राष्ट्रीय हरित लवादाचे निर्देश आणि खुद्द जिल्हा प्रशासनाचे नियम पायदळी तुडवत नदीपात्रांचे निर्घृण उत्खनन सुरू असताना, स्थानिक पोलीस आणि महसूल प्रशासन मात्र या माफियांचे मूक मूकबधिर भागीदार बनल्याचा थेट आरोप होत आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी धाव घेऊन जप्त केलेला वाळूसाठा अवघ्या चार दिवसांत पोलीस ठाण्याच्या नाकावर टिच्चून लंपास केला जातो, महसूल अधिकाऱ्यांना रस्त्यावर अडवून शासकीय कामात अडथळा आणला जातो, तरीही गुन्हेगारांवर कठोर प्रहार करण्याऐवजी तडजोडीची दुकानदारी चालवली जाते. ठाणेदार दिपमाला भेन्डे यांच्या संशयास्पद भूमिकेमुळे आणि महसूल यंत्रणेच्या बोटचेप्या धोरणामुळे बाभूळगाव तालुक्यातील कायदा-सुव्यवस्थेचा अक्षरशः बोजवारा उडाला असून संपूर्ण तालुका पर्यावरणाच्या महाविनाशाच्या खाईत लोटला गेला आहे.
बाभूळगाव तालुक्यातील तांभा आणि वाटखेड हे वाळूघाट सध्या वाळूचोरांचे मुख्य कुरण बनले आहेत. नदीपात्राची चाळण करून शेकडो ब्रास वाळूचा उपसा केला जात असून, नदीकाठावरच बेकायदेशीर साठवणूक केली जात आहे. रात्रीच्या अंधारात गावातून भरधाव वेगाने धावणारे ट्रक, टिप्पर आणि ट्रॅक्टर नागरिकांच्या जीवावर उठले आहेत. या गंभीर बाबीची दखल घेत यवतमाळचे जिल्हाधिकारी विकास मीना यांनी १९ जून रोजी वाटखेड व तांभा घाटावर थेट छापा टाकला. स्वतः जिल्हाधिकाऱ्यांनी नदीपात्रात उतरून पाहणी करत मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर साठवून ठेवलेली रेती जप्त केली. जिल्ह्याच्या सर्वोच्च पदस्थ अधिकाऱ्याने कारवाई केल्यानंतर तरी स्थानिक यंत्रणा जागे होईल, अशी अपेक्षा जनतेला होती. मात्र, जिल्हाधिकारी परत फिरताच अवघ्या चार दिवसांच्या आत तस्करांनी हा संपूर्ण साठा उचलून नेला. धक्कादायक बाब म्हणजे, हे सर्व बाभूळगाव पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकारी ठाणेदार दिपमाला भेन्डे यांच्या डोळ्यांदेखत घडले. जिल्हाधिकाऱ्यांनी जप्त केलेला मुद्येमाल सुरक्षित ठेवण्यात अपयशी ठरलेले पोलीस नेमके कोणाच्या दावणीला बांधले गेले आहेत, असा संतप्त सवाल आता विचारला जात आहे.
दिपमाला भेन्डे यांनी बाभूळगाव ठाण्याचा पदभार स्वीकारल्यापासून आजतागायत एकाही बड्या रेती तस्करावर धडक मोहीम उघडली गेलेली नाही, हा रेकॉर्डच त्यांच्या कार्यपद्धतीवर गंभीर संशय निर्माण करतो. तालुक्यातील प्रत्येक घाट जणू पोलिसांच्या मूक संमतीने ‘लिलाव’ झाल्यासारखा विकला गेला आहे, अशी उघड चर्चा नागरिक आणि राजकीय वर्तुळात आहे. सामान्य नागरिकांवर किरकोळ कारणांवरून खाक्या दाखवणारे पोलीस वाळूच्या अवजड वाहनांसमोर मात्र लाचार का होतात? यामागे महिनानिहाय हप्तेखोरीचे अर्थकारण दडले असल्याचा थेट आरोप स्थानिक जनतेकडून होत आहे. पोलीस ठाण्याच्या हद्दीतून रात्रंदिवस अवैध वाहतूक सुरू असताना पोलीस गस्ती पथक नेमके कुठे झोपा काढत असते, हा संशोधनाचा विषय बनला आहे.
वाळूमाफियांचे मनोधैर्य इतके उंचावले आहे की, ते आता थेट वर्ग-२ च्या शासकीय अधिकाऱ्यांच्या अंगावर धावून जाण्यापर्यंत मजल मारत आहेत. काल महसूल विभागाच्या पथकाने मादणी ते बोरगाव रस्त्यावर गस्त घालत असताना अवैध रेतीची वाहतूक करणारा एक ट्रॅक्टर अडवला. या ट्रॅक्टरमध्ये अंदाजे ५,१०० रुपये किमतीची एक ब्रास अवैध वाळू भरलेली होती. महसूल पथक पंचनामा करत असतानाच, अयफाज आणि तौफीक हे दोन इसम दुचाकीवरून घटनास्थळी पोहोचले. त्यांनी कर्तव्यावर असलेल्या महसूल कर्मचाऱ्यांना आई-बहिणीवरून अश्लील शिवीगाळ केली, धक्काबुक्की केली आणि शासकीय कारवाईत थेट अडथळा आणून ट्रॅक्टर चालकाला वाहनासह पळवून लावले.
याप्रकरणी नायब तहसीलदार सोनाली प्रकाशराव राऊत यांनी स्वतः बाभूळगाव पोलीस ठाण्यात जाऊन शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी तक्रार दाखल केली. मात्र, तक्रार दाखल झाल्यानंतर ठाणेदार दिपमाला भेन्डे यांनी आरोपींना तत्काळ गजाआड करून खाक्या दाखवण्याऐवजी प्रकरणाची तीव्रता कमी करण्यासाठी ‘तडजोडी’ची सूत्रे हलवली. या गंभीर गुन्ह्याला वेगळीच कलाटणी देण्याचे काम पोलिसांकडून सुरू असल्याने महसूल कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र असंतोष खदखदत आहे.
बाभूळगाव तालुक्यात सध्या वाळूउपशावरून जे महाभारत सुरू आहे, त्यामागे तहसीलदार मीरा पागोरे आणि ठाणेदार दिपमाला भेन्डे यांच्यातील प्रशासकीय ‘अर्थपूर्ण समन्वय’ कारणीभूत असल्याची जोरदार चर्चा आहे. महसूल आणि पोलीस या दोन्ही प्रमुख यंत्रणांचे प्रमुखच जर डोळेझाक करत असतील, तर कनिष्ठ कर्मचाऱ्यांनी जीवावर उदार होऊन कोणासाठी कारवाई करावी? नदीपात्रे पोखरल्यामुळे भूजल पातळी खालावली आहे, रस्ते उखडून गेले आहेत आणि अपघातांचे प्रमाण वाढले आहे. दोन जबाबदार महिला अधिकाऱ्यांच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे आणि माफियाधार्जिण्या धोरणामुळे बाभूळगाव तालुका अक्षरशः उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे.
जिल्हाधिकारी विकास मीना आणि जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी या प्रकरणाची केवळ कागदी चौकशी न करता, बाभूळगाव पोलीस ठाण्यातील कारभाराची उच्चस्तरीय चौकशी करावी आणि कर्तव्यचुकार ठाणेदार व संबंधित अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. अन्यथा संतप्त नागरिक रस्त्यावर उतरून वाळूचे ट्रक अडवतील आणि कायदा हातात घेतील, असा इशारा दिला जात आहे.(क्रमशः)