बाभूळगाव महसूल प्रशासनात ‘वाळूमाफिया राज’; तहसीलदारांसह पथकावर अमाप माया जमवल्याचा गंभीर आरोप

0

🔥बाभूळगाव महसूल प्रशासनात ‘वाळूमाफिया राज’; तहसीलदारांसह पथकावर अमाप माया जमवल्याचा गंभीर आरोप

🔥महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे थेट दणका आदेश; अमरावती विभागीय आयुक्तांकडून चौकशीचे निर्देश, गडचिरोलीत बदलीची मागणी

​यवतमाळ (प्रतिनिधी) -/ बाभूळगाव तालुक्यातील अवैध वाळू उपसा आणि तस्करीला आळा घालण्याऐवजी चक्क महसूल प्रशासनातीलच बडे अधिकारी आणि कर्मचारी वाळूमाफियांचे ‘भागीदार’ बनल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. बाभूळगावच्या तहसीलदार श्रीमती मीरा पागोरे, दोन नायब तहसीलदार, चपराशी, संबंधित मंडळ अधिकारी आणि तलाठ्यांनी पदाचा गैरवापर करून वाळूचोरांकडून अमाप आर्थिक लाभ उकळल्याची थेट तक्रार राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे करण्यात आली आहे. या गंभीर प्रकरणाची तत्काळ दखल घेत खुद्द महसूलमंत्र्यांनी पत्रावर शेरा मारून अमरावती विभागीय आयुक्तांना या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. मंत्र्यांच्या या थेट हस्तक्षेपामुळे यवतमाळ जिल्हा महसूल विभागात मोठी खळबळ उडाली असून दोषी अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. 

​बाभूळगाव येथील नेहरूनगर रहिवासी सय्यद जहीर सय्यद रज्जाक यांनी राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे (मंत्रालय, मुंबई) यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे ही तक्रार दाखल केली आहे. तक्रारीत नमूद केल्यानुसार, बाभूळगाव तहसील कार्यालयात कार्यरत असलेल्या तहसीलदार श्रीमती मीरा पागोरे, नायब तहसीलदार दिलीप बदकी, नायब तहसीलदार यामीन सय्यद, चपराशी राजेश बोबडे यांच्यासह संबंधित मंडळ अधिकारी आणि तलाठी हे वाळूमाफियांना उघडपणे सहकार्य करत आहेत. वाळूमाफियांना मदत करण्यासाठीच या अधिकाऱ्यांनी बाभूळगाव येथे आपली बदली करून घेतली असल्याचे स्पष्ट दिसून येत असल्याचा गंभीर आरोप अर्जदाराने केला आहे. 

​शासकीय सेवेचा गैरवापर करत या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी वाळूचोरी करणाऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात आर्थिक माया जमवली आहे. त्यामुळे या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांची तसेच त्यांच्या कुटुंबीयांच्या नावावर असलेल्या बेनामी व ज्ञात मालमत्तेची अमरावती विभागीय आयुक्तांमार्फत सखोल चौकशी करण्यात यावी, अशी ठाम मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, बाभूळगाव येथे घडलेल्या अवैध वाळू उपसा आणि संबंधित घटनांमध्ये या सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांचा थेट सहभाग असल्याचे भक्कम पुरावे उपलब्ध होऊ शकतात. त्यासाठी या सर्वांचे मोबाईल कॉल रेकॉर्ड (सीडीआर) आणि मोबाईल लोकेशनची पोलिसांमार्फत तांत्रिक तपासणी करण्यात यावी, अशी मागणीही तक्रारदाराने केली आहे. 

​अवैध वाळू उपसा करू देणे ही थेट शासनाच्या मालमत्तेची चोरी आहे. महसूल अधिकाऱ्यांच्या या संगनमतामुळे परिसरात अवैध वाळू वाहतुकीने कळस गाठला असून, भरधाव वाळूच्या वाहनांमुळे व जीवघेण्या उपशामुळे सामान्य नागरिकांचे जीव जात आहेत. शासनाचा कोट्यवधींचा महसूल बुडवून आणि नागरिकांचा जीव धोक्यात घालून हे अधिकारी आपले खिसे भरत आहेत. या सर्व प्रकाराला केवळ हेच अधिकारी जबाबदार असल्याने, त्यांची बाभूळगाव येथून तात्काळ जिल्ह्याबाहेर म्हणजेच गडचिरोली जिल्ह्यात बदली करण्यात यावी, अशी आक्रमक मागणी सय्यद जहीर यांनी केली आहे. 

​दरम्यान, या अर्जाचे गांभीर्य लक्षात घेऊन महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी निवेदनावर स्वतःच्या स्वाक्षरीनिशी “विभागीय आयुक्त अमरावती चौकशी करावी” असा स्पष्ट शेरा मारला आहे. मंत्र्यांच्या थेट आदेशामुळे आता अमरावती विभागीय आयुक्त या प्रकरणात काय कारवाई करतात, तसेच संबंधित अधिकाऱ्यांचे मोबाईल रेकॉर्ड आणि मालमत्तेची चौकशी होऊन त्यांच्यावर निलंबनाची किंवा गडचिरोली बदलीची कुऱ्हाड कोसळते का, याकडे संपूर्ण यवतमाळ जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.(क्रमशः)

ब्युरो रिपोर्ट साहसिक News-/24 यवतमाळ 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!