मुक्ताईनगर तालुक्यात शिक्षकांच्या खाजगी शिकवणीचा सुळसुळाट…!

0

मुक्ताईनगर/ पंकज तायडे :
तालुक्यात एकूण 122 प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक आणि केंद्रीय बोर्डाच्या सीबीएसई शाळा असून शाळेत शिकवणारे शिक्षक विद्यार्थ्यांना खासगी शिकवणीसाठी आग्रह धरत असून याप्रकरणी शाळेत विद्यार्थ्यांना सक्तीचे प्रमाण अधिक असल्याची तक्रार पालक वर्गाकडून होत आहे.
शिक्षण विभागाच्या सेवाशर्तीनुसार शाळेतील शिक्षकांना खाजगी शिकवण्यात घेणे हे कायद्यानुसार बंदी आणण्यात आलेली आहे. तरी देखील मुक्ताईनगर शहरात मोठ्या प्रमाणावर शिक्षकांद्वारे खाजगी शिकवणे चालवल्या जात असून यासाठी पालकांकडून आवाची सवा रुपये उकडून अक्षरशः आर्थिक लूट केली जात असल्याची तक्रार पालक वर्ग करत आहे. विशेषतः मुक्ताईनगर शहरात दोन केंद्रीय बोर्डाच्या अर्थातच सीबीएसई बोर्डाच्या शाळा असून विद्यार्थ्यांना खाजगी शिकवण्यासाठी या शाळेतील शिक्षकांकडूनच जाणीवपूर्वक त्रास दिला जात आहे. विद्यार्थ्यांनी दुसऱ्या खाजगी शिकवणी वर्गाकडे जाऊ नये म्हणून शाळेतूनच विद्यार्थ्यांवर सक्ती केली जाते अन्यथा इयत्ता दहावीचे बोर्डाच्या परीक्षेत मार्क दिले जाणार नाही असे सांगून विद्यार्थ्यांवर एक प्रकारे अन्याय केला जात आहे.
शिक्षकांच्या खाजगी शिकवणी वर्गामुळे मात्र खाजगी क्लासेस घेणाऱ्या संचालकांचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान देखील होत आहे. शिक्षक जर खाजगी शिकवण्यात घेतील तर ते वर्गात जाणीवपूर्वक विद्यार्थ्यांना पुरेपूर ज्ञान देणार नाही. त्यामुळे जे विद्यार्थ्यांचे पालक गरीब किंवा फी भरू शकत नाही, अशा परिस्थितीत आहेत अशा विद्यार्थ्यांवर हा एक प्रकारे खूप मोठा अत्याचार असल्याचे बोलले जात आहे. वारंवार शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांना आमच्याकडे शिकवणी लावावी लागेल असे बजावून सांगतात. त्यामुळे विद्यार्थी देखील दुसरीकडे जाऊ शकत नाही. त्यातच दहावीच्या बोर्डाचे मार्क जर मिळाले नाही तर आपले नुकसान होईल व पर्यायी आपला पाल्य हा नापास होईल म्हणून पालक वर्ग देखील शिक्षकी शिकवणी वर्गाकडेच वळत आहे.
शहरातील एका केंद्रीय बोर्डाच्या शाळेत विद्यार्थ्यांना तोंडी परीक्षेत अत्यल्प मार्क दिल्याने जवळपास आठ विद्यार्थी नापास झाल्याची घटना याच वर्षी च्या केंद्रीय बोर्डाच्या निकालावरून लक्षात आलेले आहे. यातील काही विद्यार्थ्यांनी मात्र शिकवणी वर्ग आपल्या शाळेतील शिक्षकांकडे लावलेले नसल्याचे स्पष्ट झाले आहे त्यामुळेच जाणीवपूर्वक या विद्यार्थ्यांना कमी मार्क देऊन नापास करण्यात आले की काय? अशी शंका पालकांनी उपस्थित केलेली आहे. विशेषतः या गैरकारभारासाठी प्राचार्यांची देखील सोबत असल्याचे बोलले जात आहे, त्यामुळे कुंपणच शेत खाणार असतील तर पालकांनी जावे कुठे? असा प्रश्न निर्माण होत आहे.
स्वहितासाठी विद्यार्थी हित व शाळेचे हीत डावलून स्वतःची खडगी भरण्यासाठी विद्यार्थ्यांचा ढालीप्रमाणे वापर केला जात आहे. त्यातच तोंडी परीक्षेत कमी मार्क देण्याचे धमकावून विद्यार्थ्यांच्या भविष्यावरच प्रश्नचिन्ह निर्माण केला जात असल्याचेही तक्रार पालक करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!