यवतमाळ जिल्ह्याच्या बाभुळगाव तालुक्यातील ग्रामपंचायत पंचगव्हाण गट ग्रामपंचायत कृष्णापूर-झपाटखेड,पंचगव्हाण पोड या ग्रामपंचायतीमधील ५७ वर्षांच्या प्रभार याद्या गहाळ; कोट्यवधींच्या घोटाळ्यांचा पर्दाफाश केल्याने RTI कार्यकर्त्यावर प्राणघातक हल्ला व खोटा विनयभंगाचा गुन्हा!
🔥यवतमाळ जिल्ह्याच्या बाभुळगाव तालुक्यातील ग्रामपंचायत पंचगव्हाण गट ग्रामपंचायत कृष्णापूर-झपाटखेड,पंचगव्हाण पोड या ग्रामपंचायतीमधील ५७ वर्षांच्या प्रभार याद्या गहाळ; कोट्यवधींच्या घोटाळ्यांचा पर्दाफाश केल्याने RTI कार्यकर्त्यावर प्राणघातक हल्ला व खोटा विनयभंगाचा गुन्हा!🔥तहसीलदारांकडून माजी उपसरपंचाच्या पत्नीसह ग्रामपंचायत सदस्याला १ लाखाच्या वर दंड; रेशन घोटाळा उघड
🔥जेसीपी (JCP) मशीनने कामे करून बोगस मस्टर फाडणारा मुख्य सूत्रधार रोजगार सेवक निलेश झामरे; स्वतःच्या पत्नीला पुढे करून रचला विनयभंगाचा खोटा कट
🔥दोषींवर ॲट्रॉसिटी, दंगल आणि दरोड्याचा गुन्हा दाखल करून RTI कार्यकर्त्याला तात्काळ पोलीस संरक्षण देण्याची महासंघाची मागणी
यवतमाळ -/ बाभुळगाव तालुक्यातील ग्रामपंचायत पंचगव्हाण अंतर्गत येत असलेल्या गट ग्रामपंचायत कृष्णापूर आणि झपाटखेड येथील भ्रष्टाचाराची पाळेमुळे अत्यंत खोलवर रुजली असून, सन १९६५ ते २०२२ पर्यंतच्या तब्बल ५७ वर्षांच्या प्रभार याद्या आणि ३५ वर्षांचे शासकीय रेकॉर्ड संगनमताने गायब करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या महाघोटाळ्याचा पर्दाफाश करणारे माहिती अधिकार (RTI) कार्यकर्ते तथा पत्रकार संघटनेचे अध्यक्ष रत्नपाल गोवर्धन डोफे यांच्यावर जातीवादी गावगुंडांनी प्राणघातक हल्ला केला. या प्रकरणी दोषींवर ॲट्रॉसिटी, दंगल आणि दरोड्याचा गुन्हा दाखल करावा, तसेच पीडित कार्यकर्त्याला तात्काळ पोलीस संरक्षण द्यावे या मागणीसाठी ‘माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ, यवतमाळ’ च्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी अनिरुद्ध बक्षी आणि जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चित्ता यांना लेखी निवेदन देऊन तीव्र आक्रोश व्यक्त करण्यात आला.
शासकीय रेशन घोटाळ्यात माजी उपसरपंचाच्या कुटुंबाला १ लाखाचा दंड:
मिळालेल्या माहितीनुसार, गरिबांचे हक्काचे रेशन धान्य काळ्या बाजारात विकून शासकीय रेशनचा मोठा घोटाळा केल्याचे चौकशीत निष्पन्न झाल्यानंतर, तहसीलदार बाभुळगाव यांनी माजी उपसरपंचाची पत्नी आणि संबंधित ग्रामपंचायत सदस्यावर १ लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कमेचा मोठा दंड ठोठावून कडक कारवाई केली आहे. तहसीलदार यांच्या या अधिकृत कारवाईमुळे रेशन घोटाळा चव्हाट्यावर आल्याने भ्रष्टाचाऱ्यांचे धाबे दणाणले होते.
सरपंचाचे नातेवाईक अन् रोजगार सेवकाचे साटेलोटे; जेसीपीने कामे करून मजुरांचे बोगस मस्टर:
ग्रामपंचायतीमध्ये सरपंचाच्या जवळच्या नातेवाईकांना घरकुल योजना तसेच मनरेगा योजनेच्या माध्यमातून वैयक्तिक सिंचन विहिरींचा बेकायदेशीर लाभ देण्यात आला. इतकेच नव्हे तर, मनरेगा अंतर्गत होणारे पांदण रस्ते नियमांनुसार मजुरांकडून करून घेणे बंधनकारक असताना, ते जेसीपी (JCP) मशीनद्वारे करण्यात आले. या कामांमध्ये मजुरांच्या बोगस हजेऱ्या आणि खोटे मस्टर (दस्तऐवज) तयार करण्यात आले. या संपूर्ण महाघोटाळ्याचा मुख्य सूत्रधार रोजगार सेवक निलेश झामरे हाच असून, त्याने सरपंचाच्या सोबतीने कोट्यवधी रुपयांचा निधी हडप केला आहे, असा थेट आरोप महासंघाने केला आहे.
इतर गंभीर घोटाळे आणि बेकायदेशीर कामांचा सविस्तर तपशील:
• जि. प. शाळेची इमारत बेकायदेशीर पाडली: कृष्णापूर येथील जिल्हा परिषदेच्या जुन्या शाळेची जीर्ण इमारत कोणतीही प्रशासकीय परवानगी न घेता बेकायदेशीरपणे पाडून, त्यातील साहित्याची परस्पर विल्हेवाट लावून शासकीय मालमत्तेची चोरी करण्यात आली.
• ८ वर्षांपासून अधिकृत मीटरशिवाय वीज चोरी: सार्वजनिक पाणी पुरवठा योजनेच्या विहिरीवरील अधिकृत विद्युत मीटरचा पुरवठा खंडित असतानाही, गेल्या ८ वर्षांपासून तिथे सर्रासपणे आकडे टाकून बेकायदेशीर वीज चोरी सुरू आहे.
• लाखोंचे पथदिव्यांचे बिल थकीत: सार्वजनिक पथदिव्यांचे ४ लाख ७१ हजार रुपयांपेक्षा जास्त विद्युत बिल थकीत ठेवून शासनाचे आर्थिक नुकसान करण्यात आले आहे.
• विविध योजनांमधील गैरव्यवहार: १५ वा वित्त आयोग, घरकुल योजना, टॉवर टॅक्स वसुली, जलजीवन मिशन, अंगणवाडी आणि जिल्हा परिषद शाळांच्या विकास निधीत कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाला आहे.
• बेकायदेशीर वृक्षतोड: शासकीय जमिनीवरील मौल्यवान झाडांची कोणतीही परवानगी न घेता बेकायदेशीरपणे कत्तल करण्यात आली.
SC कार्डचा गैरवापर: घोटाळा लपवण्यासाठी रोजगार सेवकाच्या पत्नीला केले पुढे:
हा सर्व गंभीर भ्रष्टाचार रत्नपाल डोफे यांनी पुराव्यासह उघड केल्यामुळे रोजगार सेवक निलेश झामरे आणि गावातील भ्रष्टाचारी पुढाऱ्यांचे धाबे दणाणले. रोजगार सेवक निलेश झामरे हा अनुसूचित जातीचा (SC) असून, त्याने स्वतःचा घोटाळा लपवण्यासाठी आणि चौकशी थांबवण्यासाठी गावातील जातीवादी गावगुंडांशी हातमिळवणी केली. या भ्रष्टाचाऱ्यांनी संगनमताने एक मोठा कट रचला, ज्यामध्ये रोजगार सेवक निलेश झामरे याने स्वतःच्या पत्नीला पुढे करून पोलिसांवर राजकीय दबाव आणला आणि भ्रष्टाचार उघड करणाऱ्या RTI कार्यकर्त्याविरुद्ध विनयभंगाचा संपूर्णपणे खोटा व सुडबुद्धीने गुन्हा दाखल करण्यास भाग पाडले, असा खळबळजनक खुलासा निवेदनात करण्यात आला आहे.
जातीवादी गावगुंडांवर ॲट्रॉसिटी, दंगल आणि दरोड्याचा गुन्हा दाखल करा; महासंघाची मागणी:
भ्रष्टाचार दाबण्यासाठी स्थानिक ५ पेक्षा जास्त जातीवादी गावगुंडांनी पूर्वनियोजित कट रचून रत्नपाल डोफे यांच्यावर जीवघेणा हल्ला केला आणि त्यांच्याकडील महत्त्वाचे दस्तऐवज बळजबरीने हिसकावून घेतले. महासंघाने स्पष्ट केले आहे की, या प्रकरणात केवळ साध्या मारहाणीचा गुन्हा दाखल न करता, नवीन भारतीय न्याय संहितेनुसार (BNS) ॲट्रॉसिटी ॲक्ट, दंगल (कलम १९१ BNS), दरोडा (कलम ३१० BNS) आणि जीवे मारण्याचा प्रयत्न (कलम १०९ BNS) अंतर्गत गुन्हे दाखल करून मुख्य सूत्रधार निलेश झामरे व राजकीय पुढाऱ्यांना तात्काळ अटक करण्यात यावी.
माहिती अधिकार कार्यकर्त्याला तात्काळ पोलीस संरक्षण द्या!
भ्रष्टाचार चव्हाट्यावर आणल्यामुळे माहिती अधिकार कार्यकर्ते रत्नपाल डोफे यांच्या जिवाला गंभीर धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे रत्नपाल डोफे आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबीयांना गृह विभागाकडून व पोलीस प्रशासनाकडून तातडीने चोवीस तास पोलीस संरक्षण (Police Protection) पुरवण्यात यावे, अशी आग्रही मागणी महासंघाने केली आहे. जर कार्यकर्त्यांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष झाले आणि भविष्यात कोणतीही अनुचित घटना घडली, तर त्याला संपूर्णपणे यवतमाळ जिल्हा पोलीस प्रशासन जबाबदार राहील, असा थेट इशारा निवेदनातून देण्यात आला.
मागण्या मान्य न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र धरणे आंदोलन छेडण्याचा इशारा जिल्हा प्रचार प्रमुख प्रदीप मधुकर भगत, प्रफुल सिद्धार्थ थुल, दिलीप पवार व कुलदिप यांनी दिला आहे. हे निवेदन सादर करतेवेळी महासंघाचे यवतमाळ जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.