रावसाहेब पटवर्धन मल्टीस्टेट घोटाळा: सूत्रधार अतुल महाजनचा बुरखा फाटला

0

🔥हाच तो रावसाहेब पटवर्धन मल्टीस्टेट घोटाळा: सूत्रधार अतुल महाजनचा बुरखा फाटला🔥संतप्त ठेवीदारांनी घरातच अडवले, जिल्हा उपनिबंधकांचे ‘घरदार विकून पैसे चुकवा’चे थेट आदेश

​यवतमाळ,प्रतिनिधी -/ सर्वसामान्यांच्या घामाचा पैसा गिळंकृत करणाऱ्या रावसाहेब पटवर्धन मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीतील कथित कोट्यवधींच्या आर्थिक गैरव्यवहाराचा भांडाफोड अखेर अधिकृतरीत्या झाला आहे. या महाघोटाळ्याचा मुख्य सूत्रधार इतर कुणी नसून संचालक अतुल रामदास महाजन हाच असल्याचे उघडकीस आल्यानंतर प्रकरणाला स्फोटक वळण लागले आहे.

​जिल्हा उपनिबंधक अर्चना माळवे यांच्या दालनात पार पडलेल्या सुनावणीत माजी अध्यक्ष आशिष सोमण यांनी घोटाळ्याची सज्जड कागदपत्रे आणि बँक खात्यांचे पुरावे टेबलवर आदळताच उपस्थित ठेवीदारांचा संभ्रम दूर झाला. सोमण यांनी संपूर्ण गैरव्यवहाराचे कारनामे चव्हाट्यावर आणल्याचे समजताच पळ काढू पाहणाऱ्या अतुल महाजन याच्या घरावर संतप्त ठेवीदारांनी थेट धडक दिली. पळून जाण्याच्या बेतात असलेल्या महाजनला घरातच पकडून संतप्त नागरिकांनी आक्रमक ठिय्या आंदोलन छेडले.

घोटाळ्याच्या चौकशीसाठी सहकार विभागाकडून तातडीची बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीला माजी अध्यक्ष आशिष सोमण उपस्थित राहिले आणि त्यांनी घोटाळ्याशी संबंधित धक्कादायक पुरावे जिल्हा उपनिबंधक अर्चना माळवे यांच्यासमोर सादर केले. या दस्तऐवजांवरून या गैरव्यवहारात सोमण यांचा थेट सहभाग नसल्याचे स्पष्ट झाले असून, ठेवीदारांच्या पैशांची अफरातफर करण्याचे संपूर्ण रॅकेट अतुल महाजन चालवत असल्याचे समोर आले.

​सोमण यांनी घोटाळ्याचे कच्चेचिठ्ठे उघडे केल्याचे कळताच इतर संचालक—कीर्ती महाजन, सचिन बनकर, अश्विनी बनकर, अनिल बांद्रे आणि रुपेश येडे—यांनी बैठकीला दांडी मारणे पसंत केले. स्वतःचा पर्दाफाश झाल्याचे लक्षात येताच मुख्य सूत्रधार अतुल महाजन यानेही बैठकीतून काढता पाय घेतला. सुनावणीदरम्यान जिल्हा उपनिबंधक अर्चना माळवे यांनी संस्थाचालकांच्या मनमानी कारभारावर आणि फसवणुकीवर तीव्र शब्दांत ताशेरे ओढले. “सामान्य नागरिकांनी कष्टाने जमा केलेल्या रक्ताच्या पैशांवर डल्ला मारणाऱ्यांची गय केली जाणार नाही. घरदार विका, पण प्रत्येक ठेवीदाराचा एक-एक रुपया व्याजासह परत करा,” असा थेट आणि कठोर पवित्रा प्रशासनाने घेतला. या भूमिकेमुळे उपस्थित ठेवीदारांच्या संतप्त भावनांना अधिकच धार चढली.

बैठकीतून महाजन पसार झाल्याचे समजताच शेकडो संतप्त ठेवीदारांनी मोर्चा थेट त्याच्या घराकडे वळवला. महाजन घरातून पळ काढण्याच्या तयारीत असतानाच ठेवीदारांनी त्याला रंगेहात गाठले. सुरुवातीला अनुपस्थित असलेल्या महाजनच्या कुटुंबीयांवरही ठेवीदारांचा रोष उफाळून आला.

​महाजन घरात सापडताच ठेवीदारांनी त्याच्या दिवाणखान्यातच ठिय्या मांडला. “आमच्या कष्टाचा एक-एक रुपया व्याजासह परत मिळेपर्यंत घरातून बाहेर पडणार नाही,” असा आक्रमक पवित्रा ठेवीदारांनी घेतला. सुमारे दोन तास चाललेल्या तीव्र आणि तणावपूर्ण चर्चेनंतर महाजनने घोटाळ्यातील आपली जबाबदारी मान्य केली व काही ठेवीदारांना पैसे परत करण्याचे तोंडी आश्वासन दिले.

केवळ आश्वासनांची खैरात ठेवीदारांच्या पचनी पडलेली नाही. “संस्था बुडवून हजारो कुटुंबांना रस्त्यावर आणणाऱ्या या घोटाळेबाजांवर जोपर्यंत फसवणुकीचे गुन्हे दाखल होत नाहीत आणि प्रत्यक्ष बँक खात्यात पैसे जमा होत नाहीत, तोपर्यंत लढा मागे घेणार नाही,” असा स्पष्ट इशारा ठेवीदारांनी दिला आहे. प्रशासनाच्या कठोर भूमिकेमुळे आणि ठेवीदारांच्या आक्रमक पवित्र्यामुळे पतसंस्थेच्या उर्वरित फरारी संचालकांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत.(क्रमशः)

           ब्युरो रिपोर्ट साहसिक       News-/24 यवतमाळ 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!