लोकशाहिर आण्णा भाऊ साठे यांना भारतरत्न मिळावा याबद्दल शिरोळ मातंग समाजाच्या वतीने मुख्यमंत्री यांना निवेदन
Byसाहसिक न्यूज24
फिरोज तडवी/यावल जळगाव:
धर्मवीर आनंद दिघे यांच्या पुण्यतिथी निमित्त ठाणे येथे त्यांच्या समाधीस्थळी त्यांना अभिवादन करुन लोकशाहिर आण्णा भाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार मिळावा याबद्दल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शिरोळ तालुका मातंग समाज संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले . यावेळी मराठी चित्रपट सृष्टीतील नामांकित दिग्दर्शक प्रविण तरडे म्हणाले , आण्णा भाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार मिळालाच पाहिजे . आण्णा भाऊ साठे यांच्या मुळेच व त्यांच्या विचारांमुळेच आम्हांला प्रेरणा मिळते . असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले . सदर निवेदनात लोकशाहिर आण्णा भाऊ साठे यांनी १३ लोकनाट्य , ३ नाटक , १५ पोवाडे , ३५ कांदब-या , ७ चित्रपट कथा , १ प्रवास वर्णन (रशिया ), १ शाहिर पुस्तक इत्यादी समाजप्रबोधनात्मक साहित्यकृती अवघ्या दिड दिवसाच्या शाळेमध्ये शिक्षण घेऊन सातासमुद्रापार भारत देशाचे नांव उंचावले आहे . महाराष्ट्र , गोवा , बंगाल , कर्नाटक अशा राज्यांसह संपूर्ण देशभरात चळवळीच्या माध्यमातून तसेच संयुक्त महाराष्ट्र चळवळीतून कष्टकरी , शेतकरी , दलित , गिरणी कामगार यांना उर्जा देण्याचे काम आपल्या लोकशाहिरीतून केले . त्यांनी डॉ . बाबासाहेब आंबेडकरांच्या झुंझार लेखणीतून दलित चळवळीचा रथ पुढे चालविला . अशा महामानवाला मरणोत्तर भारतरत्न मिळाला तर जगभरातील दलित वर्गाला न्याय मिळेल असे निवेदनात म्हटले आहे . सदर निवेदन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शिरोळ तालुका मातंग समाज संघटनेचे अध्यक्ष खंडू भोरे , उपाध्यक्ष उमेश आवळे , सहसचिव संदिप बिरणगे , संदिप बिरांजे यांनी दिले . यावेळी शिरोळ तालुका मातंग समाज संघटनेचे पदाधिकारी व समाज बांधव उपस्थित होते .