🔥वर्ध्यातील तक्षक सिटीत ‘बी’ विंगच्या पहिल्या माळ्यावर देहव्यापाराचा अड्डा.! महिलेस अटक; ३७ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त
वर्धा -/ अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सालोड (हिरापूर) परिसरातील एका फ्लॅटवर छापा टाकून देहव्यापार केल्याच्या आरोपावरून एका महिलेला ताब्यात घेतले. या कारवाईत दोन अँड्रॉइड मोबाईल, रोख रक्कम २ हजार ९०० रुपये आणि देहव्यापारासाठी वापरले जाणारे साहित्य असा एकूण ३७ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २४ सप्टेंबर रोजी अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या पथकाला गोपनीय माहिती मिळाली होती. वर्धा येथील एका महिलेने आर्थिक फायद्यासाठी मुलींना पैशांचे आमिष दाखवून देहव्यापारास प्रवृत्त केल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. तसेच सालोड (हिरापूर), वर्धा येथील एका फ्लॅटवर ग्राहकांना बोलावून देहव्यापार केला जात असल्याचेही सांगण्यात आले.
या माहितीची पडताळणी करण्यासाठी पोलिसांनी बनावट ग्राहक (पंटर) तयार करून कारवाईचे नियोजन केले. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखा व अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या पथकाने संयुक्तपणे सालोड परिसरातील एका इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील फ्लॅट क्रमांक १०३ येथे छापा टाकला.
छाप्यावेळी फ्लॅटमध्ये सौ. प्रतिभा समीर कवडे (वय ४०) रा. धांदे यांच्या घरी, गॅस गोदामाजवळ, सिंदी (मेघे), वर्धा ही महिला आढळून आली. तसेच एका खोलीत बनावट ग्राहक आणि पीडित महिला आढळल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोलिसांच्या चौकशीत पीडित महिलेने तिला पैशांचे आमिष दाखवून देहव्यापारासाठी बोलावण्यात आल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी संशयित महिलेच्या ताब्यातून दोन मोबाईल, रोख रक्कम व अन्य साहित्य जप्त केले.
याप्रकरणी सावंगी (मेघे) पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम १४३(२) तसेच अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियम १९५६ मधील कलम ३, ४, ५ व ७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित महिलेला महिला सखी वन स्टॉप सेंटर तसेच महिला व बाल विकास विभाग, वर्धा येथे दाखल करण्यात आले आहे.
ही कारवाई पोलिस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, अपर पोलिस अधीक्षक सदाशिव वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विनोद चौधरी, सहायक पोलिस निरीक्षक आशिषसिंग ठाकूर आणि अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली.