विदर्भातसह वर्ध्यात पुन्हा उकाडा वाढणार
प्रतिनिधी / वर्धा :
आधीच वाढलेल्या पाऱ्यानं अंगाची लाहीलाही केली आहे. अशातच पुन्हा एकदा विदर्भात उष्णतेच्या लाटेचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. विदर्भात 7 ते 11 मे दरम्यान पुन्हा उष्णतेची लाट येणार असल्याचा अंदाज तज्ज्ञांनी वर्तवला आहे. वर्धा, चंद्रपूर, अमरावती, अकोला, यवतमाळ आणि वाशिम जिल्ह्यातील काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तसेच, नागपुरात 9 मे ते 11 मे दरम्यान उष्णतेची लाट येणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
बंगालच्या उपसागरात अग्नेय भागांत कमी दाबाचं क्षेत्र तयार झालं असून 8 मे रोजीच्या संध्याकाळी कमी दाबाच्या क्षेत्राचं चक्रीवादळात रुपांतर होणार आहे. त्यामुळे उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील तापमानात पुढील 2-3 दिवसांत पुन्हा वाढ होणार आहे.
विदर्भात 8 मे ते 10 मे पर्यंत उन्हाचा पारा 45 अंशावर जाण्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. काल विदर्भात चंद्रपूर वगळता प्रत्येक जिल्ह्यात 43 ते 44 पर्यंत पारा गेला होता.
आता उन्हाचा तडाखा वाढतच असल्यानं वर्धा शहरांत दुपारी 12 नंतर मुख्य रस्त्यांवर शुकशुकाट पाहायला मिळत आहे.
विदर्भात यावर्षी एप्रिल महिन्यातच पारा 44 आणि 45 वर गेला होता. आता परत उद्या (रविवारी) 8 तारखेपासून पारा 45 अंशावर जाणार, असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. त्यामुळे जर आवश्यक असेल तर घराच्या बाहेर पडा आणि जर जायचंच असेल तरच पाणी भरपूर प्यावं, अंगावर कॉटनचे कपडे घालावे. सोबतच कैरीचं पाणी, ताकाचं सेवन करावं, असा सल्ला तज्ज्ञांकडून देण्यात येत आहे. उन्हात बाहेर पडल्यानं तुमचा जीव सुद्धा जाऊ शकतो. त्यामुळे उन्हापासून बचाव करा, असं आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.