शरद पवारांच्या घरावर हल्ला हा लोकशाहीचा पहिला खून – जितेंद्र आव्हाड
वुत्तसंस्था / मुंबई :
“न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत करीत एसटी कर्मचाऱ्यांनी गुरुवारी पेढे वाटले. न्यायव्यवस्थेचा जयजयकार केला. मात्र आज जे काही घडले, कसे घडले, यावर मला बोलायचे नाही. परंतु ज्या पद्धतीने एसटी कर्मचाऱ्यांनी शरद पवार यांच्या वैयक्तिक घरावर ज्या घरात त्यांच्या पत्नी राहतात, नात राहते त्या घरात अचानक घुसणे हा लोकशाहीचा महाराष्ट्रातील पहिला खून आहे,” अशी टीका राज्याचे गृहनिर्मामंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केली. ठाण्यात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
“महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीत आजर्पयत असे कधीही घडलेले नाही. गोपीनाथ मुंढे यांनी १९९३ साली शरद पवार यांच्यावर शाब्दीक टीका केली. मात्र त्यावेळेस याचे पडसाद महाराष्ट्रात उमटतील हा विचार मनात ठेवून शरद पवार यांनी रात्री २ वाजता पोलिसांची बैठक घेऊन मुंढे यांची सुरक्षा दुप्पट केली. महाराष्ट्राच्या राजकारणाला सोनेरी झालरच ही वेगळी आहे. एकमेकांवर टीका करुनही दुसऱ्याच्या वैयक्तिक जीवनाचा सन्मान करायचा, हे महाराष्ट्राने कायम अनुभवले आहे,” असे आव्हाड म्हणाले.
प्रल्हाद केशव अत्रेंनी यशंवत रावांवर टीका करणो आणि यशवंत रावांनी अत्रे यांना त्यांची टीका कशी चुकीची आहे, ह समजवणे, त्यानंतर अत्रे यांनी परत यशवंत रावांवर न बोलणे ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. परंतु ही काय पद्धत आहे का असं म्हणत यामुळे राज्याचे राजकारण बिघडत असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. “ज्या महाराष्ट्रात आपण संस्कारक्षम राजकारण बघितले आहे, त्याच ठिकाणी असे होणार असेल तर यापुढील राजकारण कसे असेल हे सांगताच येत नाही. याच्या मागे राजकीय शक्ती आहे की नाही, हा प्रश्न नाही. परंतु हे जे कोणी घडवून आणले असेल त्याला काय वाटते तो सुरक्षित आहे? जेव्हा तुम्ही हे सर्व करता, तेव्हा लक्षात ठेवा तलवाराच्या ताकदीवर जगणारे हे तलवारीनेच मरतात अशी एक म्हण आहे,” असेही त्यांनी सांगितले.