🔥हिंगणघाट तालुक्यातील काजळसरा परिसरात संशयास्पद आढळला वाघाचा मृतदेह.
हिंगणघाट-/ हिंगणघाट नजीकच्या काजळसरा(वैजापूर रीठ) परिसरातील पुलाखाली पाण्यात एका वाघाचा मृतदेह तरंगताना आढळून आल्याने तालुक्यात सर्वत्र खळबळ माजली आहे.
आज सकाळी परिसरातील नागरिकांच्या लक्षात आल्याने हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.
गेल्या काही दिवसांपासून हिंगणघाट तालुक्यात वाघाचा मुक्तसंचार असल्याबाबत भीतीचे वातावरण होते. परंतु वनविभागाने यास नकार देत परिसरात वाघ नसल्याचा दावा केला होता, मात्र शेतकरी तसेच ग्रामस्थांनी अनेकदा वाघ दिसल्याची माहिती दिली होती. ‘वाघ आला… वाघ आला…’ असे संदेश समाज माध्यमावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते. त्यामुळे रात्रीच्यावेळी बाहेर पडणे टाळले जात होते, तर शेतात जाणाऱ्या शेतकऱ्यांमध्येही दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते.
आज मात्र ही भीती एका वास्तवात बदलली आहे. पाण्यात मृतावस्थेत आढळलेल्या वाघामुळे वनविभागासमोर अनेक प्रश्न उभे राहिले आहेत. वाघाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, तो आजारी होता की पाण्यात बुडून त्याचा नाहक मृत्यू झाला असावा याचा तपास वनविभागाकडून सुरू करण्यात आला आहे.घटनास्थळी वनविभागाचे अधिकारी दाखल झाले असून परिसरात सामान्य नागरिकांना येण्यास बंदी घालण्यात आली आहे.शवविच्छेदनानंतरच वाघाच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार असल्याने अजूनतरी मृत्यूचे कारण समजू शकले नाही.