अंगणवाडीच्या जागेवरून प्रशासनात गोंधळ ?एका दिवसात दोन पत्रे; मुख्याधिकाऱ्यांच्या पत्रात वर्षाची चूक, बालविकास विभागाची कारवाई!

0

🔥अंगणवाडीच्या जागेवरून प्रशासनात गोंधळ ?एका दिवसात दोन पत्रे; मुख्याधिकाऱ्यांच्या पत्रात वर्षाची चूक, बालविकास विभागाची कारवाई!

(गजानन ढाकुलकर) हिंगणा -/ डिगडोह (देवी) नगर परिषद हद्दीतील पोलिसनगर येथील अंगणवाडी क्रमांक २१९ च्या जागेवरून प्रशासनात मोठा गोंधळ निर्माण झाल्याचे समोर आले आहे. अंगणवाडी सेविका सौ. नीता अल्लेवार यांनी दिनांक ३० जून २०२६ रोजी नागपूर जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केलेल्या निवेदनात, जिल्हा परिषद निधीतून सन २०१५-२०१६ मध्ये उभारलेली अंगणवाडी इमारत भक्कम व सुरक्षित असून ती पाडून त्या जागेवर उद्यान (गार्डन) उभारण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप केला आहे. तसेच नवीन अंगणवाडीची पर्यायी व्यवस्था न करता विद्यमान इमारत हटविणे हे लहान मुले, गर्भवती व स्तनदा मातांच्या हिताविरोधात असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे.

विशेष म्हणजे, अर्ज सादर झाल्याच दिवशी म्हणजे ३० जून २०२६ रोजी नगर परिषद डिगडोह (देवी) यांच्या मुख्याधिकाऱ्यांनी अंगणवाडी तात्काळ स्थलांतरित करण्याबाबत पत्र जारी केले. मात्र या अधिकृत पत्रावर दिनांक ३०/०६/२०२५ असा उल्लेख करण्यात आला आहे. प्रत्यक्षात संपूर्ण प्रशासकीय प्रक्रिया २०२६ मधील असताना सरकारी पत्रावर वर्षच चुकीचे नमूद झाल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. हा केवळ टंकलेखनाचा दोष आहे की निष्काळजीपणा, याची चौकशी होणे आवश्यक असल्याची मागणी होत आहे.

यानंतर दिनांक १ जुलै २०२६ रोजी एकात्मिक बाल विकास सेवा योजना, हिंगणा येथील बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांनी जिल्हा परिषदेकडे स्वतंत्र पत्र पाठवून नगर परिषद, अंगणवाडी सेविका आणि संबंधित कागदपत्रांचा संदर्भ देत या संपूर्ण प्रकरणात “योग्य ती कार्यवाही करण्यात यावी” अशी शिफारस केली आहे. त्यामुळे हे प्रकरण केवळ स्थानिक पातळीवर मर्यादित न राहता जिल्हास्तरीय प्रशासकीय तपासणीच्या दिशेने गेल्याचे दिसून येत आहे.

या प्रकरणात आता काही महत्त्वाचे प्रश्न उपस्थित होत आहेत जिल्हा परिषद निधीतून उभारलेली अंगणवाडी पाडण्याचा निर्णय कोणत्या अधिकाराखाली घेण्यात आला ?पर्यायी इमारत उपलब्ध नसताना स्थलांतराचा आदेश कोणत्या आधारावर देण्यात आला ?

मुख्याधिकाऱ्यांच्या अधिकृत पत्रावर २०२५ हे चुकीचे वर्ष कसे नमूद झाले ?

सरकारी निधीतून उभारलेल्या इमारतीचा वापर बदलण्यापूर्वी संबंधित विभागांची आवश्यक परवानगी घेण्यात आली होती का ?

संबंधित इमारत पाडण्यापूर्वी अधिकृत अभियंत्याकडून स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आले आहे का ?

या संदर्भात नगर परिषद डिगडोह (देवी)चे मुख्याधिकारी रामेश्वर पांडागळे यांच्याशी संपर्क साधून विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, संबंधित ठिकाणी “नमो गार्डन” विकसित करण्यात येणार असून त्याबाबत नगर परिषदेच्या सभेने ठराव मंजूर केला आहे. त्यामुळे सदर अंगणवाडी दुसऱ्या ठिकाणी भाडेतत्त्वावर सुरू करण्याबाबत कळविण्यात आले आहे. तसेच संबंधित पत्रावरील २०२५ हे वर्ष मुद्रण (प्रिंट) करताना झालेली चूक असून, त्यामध्ये २०२६ अशी पेनाने दुरुस्ती करण्यात आली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

🔥बाल विकास प्रकल्प अधिकाऱ्यांचा प्रतिसाद नाही :

या प्रकरणाबाबत एकात्मिक बाल विकास सेवा योजना, हिंगणा येथील बाल विकास प्रकल्प अधिकाऱ्यांशी मोबाईलद्वारे संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र त्यांनी फोनला प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे या संदर्भात त्यांची अधिकृत भूमिका समजू शकली नाही.

या संपूर्ण प्रकरणाची जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच महिला व बालविकास विभागाने सखोल चौकशी करून जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. अंगणवाडीसारख्या बालकांच्या हिताशी निगडित सार्वजनिक सुविधेबाबत निर्माण झालेल्या या वादामुळे सरकारी निधी, प्रशासकीय निर्णयप्रक्रिया, नियमपालन तसेच सार्वजनिक मालमत्तेच्या वापराबाबत अनेक गंभीर प्रश्न उपस्थित होत असून, संबंधित विभाग या प्रकरणात पुढे कोणती भूमिका घेतात याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!