आनंदाच्या क्षणांवर काळाचा घाला, हिंगणघाट नगर परिषदेचे कर्मचारी भारत चाफले यांचा अपघाती मृत्यू..

0

🔥आनंदाच्या क्षणांवर काळाचा घाला,
हिंगणघाट नगर परिषदेचे कर्मचारी भारत चाफले यांचा अपघाती मृत्यू

हिंगणघाट -/ मुलाच्या लग्नाची बोलणी नुकतीच झाली, सर्वत्र उत्साहाचे वातावरण होते. मात्र, नियतीला काही वेगळेच मान्य होते. हिंगणघाट नगर परिषदेच्या आरोग्य विभागातील प्रामाणिक कर्मचारी भारत चाफले (वय ५५ वर्ष) यांचा वर्धा मार्गावर झालेल्या भीषण अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेने हिंगणघाट शहरासह नगर परिषद वर्तुळात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भारत चाफले हे काल (दि. १४ एप्रिल) आपल्या मुलाला पुण्याला जाणाऱ्या गाडीत बसवून देण्यासाठी वर्धा येथे गेले होते. मुलाला सोडून दुचाकीने हिंगणघाटला परत येत असताना, सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास सोनेगाव जवळ एका अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, चाफले यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांना तातडीने वर्धा येथील रुग्णालयात नेण्यात आले, परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. विशेष आणि अत्यंत क्लेशदायक बाब म्हणजे, आदल्याच दिवशी म्हणजेच १३ एप्रिल रोजी चाफले यांच्या मोठ्या मुलाचा तरोडा येथे ‘साक्षगंध’ समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला होता. येत्या ५ मे रोजी विवाहाची तारीखही निश्चित झाली होती. घरात लग्नाची लगबग सुरू असतानाच कर्त्या पित्याचा असा अपघाती मृत्यू झाल्याने चाफले कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

🔥एक प्रामाणिक व्यक्तिमत्त्व हरपले.

भारत चाफले हे नगर परिषदेच्या आरोग्य विभागात कार्यरत होते. आपल्या कामाप्रती निष्ठा आणि अत्यंत संयमी स्वभावामुळे ते कर्मचारी वर्गात अतिशय प्रिय होते. एक ‘प्रामाणिक कर्मचारी’ म्हणून त्यांचा नावलौकिक होता. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, मुलगी, जावई आणि नातवंडे असा मोठा आप्तपरिवार आहे.

अज्ञात वाहन चालकाचा पोलीस शोध घेत असून, या घटनेमुळे हिंगणघाट परिसरात शोककळा पसरली आहे.

       ईकबाल पहेलवान साहसिक News-/24 हिंगणघाट 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!