ऑटोत प्रवासी नेण्याचा वाद विकोपाला; दोन भावांवर जीवघेणा हल्ला

0

🔥ऑटोत प्रवासी नेण्याचा वाद विकोपाला; दोन भावांवर जीवघेणा हल्ला

🔥सब्बल अन् धारदार कैचीने हल्ला; बापलेकास अटक, तिसरा आरोपी अद्याप मोकाट असल्याचा कुटुंबीयांचा आरोप

🔥पोलिसांच्या कारवाईवर पाटील कुटुंबीयांनी उपस्थित केले प्रश्नचिन्ह

सेलू -/ ऑटोतून प्रवासी नेण्याच्या कारणावरून झालेला वाद विकोपाला जाऊन दोन भावांवर सब्बल आणि धारदार कैचीने जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना तालुक्यातील सुकळी स्टेशन येथील जिल्हा परिषद शाळेसमोर शनिवार, २६ सप्टेंबर रोजी सकाळी साडेअकरा ते पावणेबाराच्या सुमारास घडली. या हल्ल्यात अनिकेत पाटील आणि मनिष पाटील हे दोघे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सेवाग्राम येथील रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली. दरम्यान, या प्रकरणी प्रशांत थुल आणि त्यांचा मुलगा प्रणय थुल यांना पोलिसांनी अटक केली असून प्रतिक थुल याच्यावर अद्याप कारवाई झालेली नसल्याचा आरोप पाटील कुटुंबीयांनी केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सुकळी स्टेशन येथील दिनेश पाटील (४०) हे शनिवारी सकाळी आपल्या ऑटोतून गावातील तेलंगे नामक महिला आणि मसराम दाम्पत्याला उपचारासाठी सेलू येथील ग्रामीण रुग्णालयात घेऊन जात होते. जिल्हा परिषद शाळेसमोर रस्त्यावर असलेल्या गतिरोधकामुळे त्यांनी ऑटोचा वेग कमी केला. याचवेळी प्रशांत थुल या ऑटोचालकाने त्यांचा ऑटो अडवून वाद घातल्याचे सांगण्यात येते.

वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. प्रशांत थुल, प्रणय थुल आणि प्रतिक थुल या तिघांनी दिनेश पाटील यांना मारहाण करून ऑटोबाहेर खेचल्याचा आरोप आहे. ही माहिती मिळताच दिनेश पाटील यांच्या पत्नी आपल्या मुलांसह घटनास्थळी पोहोचल्या. वाद सोडविण्याचा प्रयत्न सुरू असतानाच परिस्थिती आणखी चिघळल्याचे पाटील कुटुंबीयांचे म्हणणे आहे.

🔥सब्बलचे दोन घाव, कैचीचे चार वार.!

याचदरम्यान अनिकेत पाटील आणि मनिष पाटील यांच्यावर सब्बल व धारदार कैचीने हल्ला करण्यात आला. अनिकेत यांच्या पोटावर सब्बलचे दोन घाव, तर मनिष यांच्या पोटावर धारदार कैचीचे चार वार झाल्याचे कुटुंबीयांनी सांगितले. गंभीर जखमी अवस्थेत दोघांनाही तातडीने सेलू ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी सेवाग्राम येथील रुग्णालयात हलविण्यात आले.

शनिवारी दुपारनंतर ते रात्री उशिरापर्यंत दोघांवर शस्त्रक्रिया करण्यात आल्याचे कुटुंबीयांनी सांगितले. डॉक्टरांनी त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले असून पुढील उपचारादरम्यान पुन्हा शस्त्रक्रियेची गरज भासू शकते, अशी माहिती देण्यात आल्याचे कुटुंबीयांचे म्हणणे आहे.

या घटनेत प्रशांत थुल यांच्या हाताला आणि त्यांच्या पत्नीच्या डोक्याला देखील दुखापत झाल्याची माहिती समोर आली आहे.

🔥११२ वर फोन अन् पोलिसांच्या भूमिकेवर सवाल.!

घटना सुरू असताना गावातील कोणीतरी ११२ क्रमांकावर माहिती दिल्याचे सांगण्यात येते. मात्र, त्याचवेळी शाळकरी विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या पोलीस पाटलांना या वादाचे गांभीर्य लक्षात आले नसल्याचा आरोप प्रत्यक्षदर्शींनी केला आहे. वेळेत हस्तक्षेप झाला असता तर परिस्थिती नियंत्रणात आणता आली असती, असा दावा पाटील कुटुंबीयांकडून करण्यात येत आहे.

यानंतर पोलीस पाटील आणि आरोपी यांच्यात संगनमत असल्याचा आरोपही कुटुंबीयांनी केला आहे. आरोपीला पाठीशी घालण्यासाठी पोलीस पाटील यांनी आरोपीच्या घरी बैठक आयोजित केल्याचा आरोप देखील प्रत्यक्षदर्शींनी केला आहे.

🔥गंभीर हल्ला, तरीही ‘सोपस्काराची’ कारवाई?

या प्रकरणात पोलिसांनी प्रशांत थुल आणि प्रणय थुल यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेतील कलम ११८(१), ११८(२), ३(५) आणि ३५२ अन्वये गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे. मात्र, प्रतिक थुल याच्यावर अद्याप कारवाई झालेली नसल्याचा आरोप पाटील कुटुंबीयांनी केला आहे.

पोटावर सब्बल आणि धारदार कैचीने वार करून दोन तरुणांना गंभीर जखमी केल्याचा आरोप असताना प्रकरणातील सर्व आरोपींवर समान पद्धतीने कारवाई झाली का? असा सवाल आता पाटील कुटुंबीयांकडून उपस्थित केला जात आहे.

गंभीर दुखापतीनंतरही पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्याच्या कलमांवर कुटुंबीयांनी आक्षेप घेतला असून, हल्ल्याचे गांभीर्य लक्षात घेऊन योग्य ती कठोर कारवाई करावी, अशी त्यांची मागणी आहे.

दरम्यान, या प्रकरणातील आरोप, पोलिसांची कारवाई आणि पोलीस पाटलांवरील संगनमताचे आरोप यामुळे आता या प्रकरणाच्या पुढील तपासाकडे परिसराचे लक्ष लागले आहे.

ब्युरो रिपोर्ट साहसिक News-/24 सेलू 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!