🔥ब्रेकिंग न्यूज|धामणगाव रेल्वे, समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; सात भाविकांचा मृत्यू
🔥दुर्गादेवीची मूर्ती घेऊन जाणाऱ्या बोलेरो पिकअपला ट्रकची जोरदार धडक; २० ते २३ जण प्रवासात असल्याची प्राथमिक माहिती
🔥लोकेशन : समृद्धी महामार्ग, चॅनेल क्रमांक ९७, तळणीजवळ
धामणगाव रेल्वे -/ तालुक्यातील समृद्धी महामार्गावर चॅनेल क्रमांक ९७ जवळ शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास भीषण अपघात झाला. शेगावहून दुर्गादेवीची मूर्ती घेऊन वर्ध्याकडे जाणाऱ्या बोलेरो पिकअप वाहनाला ट्रकने जोरदार धडक दिली.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, MH-05-BH-5793 क्रमांकाच्या बोलेरो पिकअपला CG-07-CG-8855 क्रमांकाच्या ट्रकने धडक दिली. धडकेनंतर पिकअप वाहन पलटी झाले.
या पिकअप वाहनामध्ये ट्रॉली जोडण्यात आली होती आणि त्यामध्ये सुमारे २० ते २३ भाविक प्रवास करत असल्याची प्राथमिक माहिती आहे. अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला, तर उपचारासाठी नेत असलेल्या आणखी एका जखमीचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा सहा वर पोहोचला आहे.
अपघातात अनेक जण जखमी झाले असून, स्थानिक नागरिक आणि पोलिसांच्या मदतीने जखमींना वाहनातून बाहेर काढण्यात आले. त्यांना तातडीने धामणगाव रेल्वे ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. गंभीर जखमींना प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी सावंगी मेघे, सेवाग्राम येथील रुग्णालयात हलविण्यात आले.
घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासन आणि महसूल विभागाचे अधिकारी घटनास्थळी तसेच ग्रामीण रुग्णालयात दाखल झाले. ग्रामीण पोलीस अधीक्षक निकेतन कदम, उपविभागीय पोलीस अधिकारी गिरीष ताबोडे, दत्तापूर पोलीस ठाण्याचे गजानन म्हेत्रे, तळेगाव पोलीस ठाण्याचे किरण ओटे, मंगरुळ दस्तगीर पोलीस ठाण्याचे ठाणेदार संजय आत्राम, तहसीलदार अभय घोरपडे तसेच उपविभागीय अधिकारी यांनी परिस्थितीची पाहणी केली.
दरम्यान, धामणगाव शहराच्या अपघातानंतर धामणगाव रेल्वे ग्रामीण रुग्णालयात नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. मृत आणि जखमींची अधिकृत संख्या तसेच त्यांची ओळख निश्चित करण्याचे काम प्रशासनाकडून सुरू आहे. या भीषण अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.पुढील तपास मंगरूळ दस्तगीर पोलीस करीत आहे.