🔥हाच तो नेपाळी खाद्यतेलाचा काळाबाजार करणारा मास्टरमाईंड अनुज राजेश जसानी🔥कारंजातील खाद्यतेल रिपॅकिंग फॅक्टरी संशयाच्या भोवऱ्यात.! ‘जसानी’चा नेपाळी रिफाइंड सोयाबीन तेलाचा काळाबाजार जोरात.! अन्न व औषध प्रशासन विभाग झोपेत
वर्धा – / अन्न व औषध प्रशासनाने छापा टाकून संशयास्पद व निकृष्ट दर्जाचे नेपाळी रिफाइंड सोयाबीन तेल जिल्ह्यात जप्त केल्याच्या पार्श्वभूमीवर या प्रकरणाचे धागेदोरे आता कारंजा परिसरापर्यंत पोहोचल्याची चर्चा आहे. कारंजा शहरातील चंदेवाणी रोड परिसरातील ‘जसानी’च्या तेल रिपॅकिंग फॅक्टरीमध्ये संशयास्पद तेलाची मोठ्या प्रमाणावर रिपॅकिंग केली जात असल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे, या ठिकाणाहून कारंज्यासह काटोल, आर्वी आणि लगतच्या बाजारपेठांमध्ये तेलाचा पुरवठा होत असल्याची चर्चा आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बाजारभावापेक्षा कमी दरात उपलब्ध होणारा तेलसाठा चंदेवाणी रोडवरील ‘जसानी’च्या फॅक्टरीत आणला जातो. त्यानंतर त्याची अन्य पॅकिंगमध्ये भरून विक्री केली जात असल्याचे बोलले जात आहे. या तेलाची गुणवत्ता, त्याची आयात, साठवणूक तसेच पॅकिंग प्रक्रियेसंदर्भात अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.
विशेष म्हणजे, संबंधित तेलाचा पुरवठा नेमका कुठून होतो, त्याची अन्न सुरक्षा मानके पूर्ण होतात का, तसेच रिपॅकिंग करणाऱ्या युनिटकडे आवश्यक परवाने व नोंदणी आहे का, याची चौकशी होणे गरजेचे आहे. तेलाचे नमुने प्रयोगशाळेत तपासल्यानंतरच त्याची गुणवत्ता आणि नागरिकांच्या आरोग्यास असलेला धोका स्पष्ट होऊ शकतो.
वर्ध्यात अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी संशयास्पद तेलाविरोधात कारवाई केल्यानंतर कारंजा परिसरातील संबंधित फॅक्टरीकडेही अन्न व औषध प्रशासनाचे लक्ष जाणे अपेक्षित आहे. प्रशासनाने या युनिटची तपासणी करून तेलाचे नमुने ताब्यात घ्यावेत, प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवावेत आणि नियमांचे उल्लंघन आढळल्यास संबंधितांवर अन्न सुरक्षा व मानके कायद्यानुसार कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
दरम्यान, या फॅक्टरीतून नेमका किती तेलसाठा बाजारात वितरित झाला आहे आणि कारंजा, काटोल, आर्वी परिसरातील कोणत्या व्यापाऱ्यांना त्याचा पुरवठा झाला, याचाही तपास होणे आवश्यक असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. प्रशासनाच्या तपासणीनंतरच या चर्चेला कितपत तथ्य आहे, हे स्पष्ट होणार आहे.(क्रमशः)