पोलिसांविरुद्ध तक्रार,पोलिसांकडूनच चौकशी; मग न्याय मिळणार कुणाकडून?

0

🔥पोलीस निरीक्षक यशवंत कदम

🔥आनंद भस्मे 

🔥ब्रम्हानंद मुन

🔥पोलिसांविरुद्ध तक्रार, पोलिसांकडूनच चौकशी; मग न्याय मिळणार कुणाकडून?

🔥पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांच्याकडून उत्तर नाही; आता विशेष पोलीस महानिरीक्षकांच्या दरबारात दाद मागणार!

हिंगणघाट -/ गुन्हा केला नसतानाही खोटे गुन्हे दाखल करून नागरिकांना त्रास दिला जातो का? पोलिसांच्या कारवाईविरोधात पुराव्यांसह तक्रार केली, तर त्याची निष्पक्ष चौकशी होते की संबंधित पोलिसांचीच बाजू सांभाळली जाते? दहेगाव गोसावी पोलीस ठाण्याशी संबंधित प्रकरणामुळे हे प्रश्न ऐरणीवर आले आहेत.

दिनांक 29 मे 2026 रोजी दहेगाव गोसावी पोलीस ठाण्यात घडलेल्या घटनेच्या संदर्भात सचिन वाघे यांनी पोलीस निरीक्षक यशवंत कदम, पोलीस कर्मचारी आनंद भस्मे आणि ब्रह्मानंद मुन यांच्या कार्यपद्धतीवर गंभीर आक्षेप घेत वरिष्ठांकडे तक्रार केली होती. संबंधित पोलिसांच्या कथित अन्यायकारक कारवाईला आव्हान देत उपलब्ध पुरावे, सीसीटीव्ही फुटेज आणि कागदपत्रांच्या आधारे निष्पक्ष चौकशीची मागणी करण्यात आली होती.

मात्र, तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार, चौकशीदरम्यान पुराव्यांचा सखोल विचार करण्याऐवजी संबंधित पोलिसांची बाजू ग्राह्य धरण्यात आल्याचे दिसून येते. मग चौकशी नेमकी सत्य शोधण्यासाठी झाली की संबंधित कर्मचाऱ्यांच्या भूमिकेची पडताळणी न करताच निष्कर्ष काढण्यात आला, असा सवाल उपस्थित होत आहे.

🔥पोलीस अधीक्षकांकडे अर्ज, तरीही उत्तराची प्रतीक्षा!

31 जुलै 2026 रोजी वर्धा जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांच्याकडे फेरचौकशीसाठी अर्ज सादर करण्यात आला. मात्र, आजपर्यंत कोणतेही समाधानकारक लेखी उत्तर किंवा कार्यवाहीचा तपशील मिळाला नसल्याचे सचिन वाघे यांचे म्हणणे आहे.

एका बाजूला पोलिसांविरोधात तक्रार, दुसऱ्या बाजूला त्याच विभागातील चौकशी आणि त्यानंतरही तक्रारदाराला उत्तर नाही. मग सामान्य नागरिकाने न्यायासाठी नेमके कोणाचे दार ठोठवायचे?

🔥सीसीटीव्ही फुटेजचा चौकशीत योग्य विचार झाला का?

घटनेशी संबंधित सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध असताना चौकशी अहवालात त्याचा कितपत विचार झाला? महत्त्वाचे पुरावे तपासले का? तक्रारदाराने उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरे अहवालात का दिसत नाहीत? या प्रश्नांची वरिष्ठ स्तरावर सखोल तपासणी होणे आवश्यक आहे.

🔥आता विशेष पोलीस महानिरीक्षकांकडे तक्रार!

स्थानिक स्तरावर न्याय मिळत नसल्याने सचिन वाघे आता विशेष पोलीस महानिरीक्षक, नागपूर परिक्षेत्र यांच्याकडे सविस्तर तक्रार दाखल करणार आहेत. संपूर्ण प्रकरणाची स्थानिक चौकशी यंत्रणेपासून स्वतंत्र वरिष्ठ अधिकाऱ्यामार्फत फेरचौकशी करावी, उपलब्ध सीसीटीव्ही फुटेज, पोलीस ठाण्यातील नोंदी आणि इतर कागदपत्रांची पडताळणी करावी, तसेच चौकशीत दोषी आढळणाऱ्यांवर नियमानुसार कारवाई करावी, अशी मागणी करण्यात येणार आहे.

पोलिसांविरोधात तक्रार करणाऱ्या नागरिकाला न्याय मिळवून देण्याची जबाबदारी वरिष्ठ पोलीस प्रशासनाची नाही का? पोलीस यंत्रणेवरील जनतेचा विश्वास टिकवायचा असेल, तर अशा तक्रारींची निष्पक्ष चौकशी आणि पारदर्शक कार्यवाही होणे गरजेचे आहे.(क्रमशः)

ब्युरो रिपोर्ट साहसिक News-/24 वर्धा 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!