यवतमाळात क्रिकेट सट्याचा विळखा: अनेक व्यापारी उद्ध्वस्त, महाविद्यालयीन तरुणांचे भवितव्य टांगणीला; ‘मामा-भाच्या’च्या अभद्र युतीवर पोलिसांचे मौन का?

0

🔥हाच तो सट्टा किंग पिपरानी चा भाचा पोलिस शिपाई अंकुश फेडरर मामा च्या धंद्यात सहभागी🔥हाच तो यवतमाळ येथील कुप्रसिद्ध सट्टा किंग निलेश पिपरणी ज्याने पोलिस ना मॅनेज करून धुव्वाधार जुवा केला सुरू

🔥यवतमाळात क्रिकेट सट्याचा विळखा: अनेक व्यापारी उद्ध्वस्त, महाविद्यालयीन तरुणांचे भवितव्य टांगणीला; ‘मामा-भाच्या’च्या अभद्र युतीवर पोलिसांचे मौन का?

🔥सटोडिया निलेश पिपराणीचा यवतमाळ ते वणी-पांढरकवड्यापर्यंत धुमाकूळ;‘आयडी-पासवर्ड’च्या मायाजालात तरुण पिढी उद्ध्वस्त करणारा म्होरक्या गजाआड कधी होणार?

​यवतमाळ -/ शांत आणि निसर्गरम्य ओळख असलेल्या यवतमाळ जिल्ह्याला आता बेकायदेशीर क्रिकेट सट्टा आणि जुगाराच्या भस्मासुराने आपल्या विळख्यात घेतले आहे. गल्लीबोळांपासून ते उच्चभ्रू वस्त्यांपर्यंत पसरलेल्या या सट्याच्या जाळ्याने आजवर अनेक प्रतिष्ठित व्यापारी आणि सामान्य नागरिकांचे संसार उद्ध्वस्त केले आहेत. कोट्यवधींच्या कर्जाच्या खाईत लोटल्या गेल्यामुळे नैराश्यातून काहींनी टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केल्याच्या घटना ताज्या असतानाच, आता या रॅकेटची पाळेमुळे थेट महाविद्यालयीन तरुणांच्या जीवावर उठली आहेत. या संपूर्ण काळ्या साम्राज्याचा स्वयंघोषित ‘किंगमेकर’ म्हणून कुख्यात असलेला सटोडिया निलेश पिपराणी शहरात राजरोसपणे आपले नेटवर्क चालवत असून, खाकी वर्दीतील एका कर्मचाऱ्याच्या कथित आशीर्वादाने त्याचे हे रान दिवसेंदिवस अधिक मस्तवाल होत चालल्याचा गंभीर आरोप आता उघडपणे होऊ लागला आहे.

​काही वर्षांपूर्वी लपूनछपून चालणारा क्रिकेट सट्टा आता डिजिटल युगात हायटेक झाला आहे. शहरातील विविध नामांकित महाविद्यालये, कॅफे, खासगी शिकवण्या आणि तरुणांचे कट्टे हे सटोडियांचे मुख्य अड्डे बनले आहेत. निलेश पिपराणी आणि त्याच्या टोळीने तरुणांना झटपट श्रीमंत होण्याची खोटी स्वप्ने दाखवून ‘ऑनलाइन गेमिंग’ व ‘बेटिंग ॲप्स’चे आयडी आणि पासवर्ड वाटपाचा धडाका लावला आहे. ​सुरुवातीला विद्यार्थ्यांना मोफत अथवा नाममात्र पैशांत आयडी देऊन जुगाराची चटक लावली जाते. एकदा का तरुण या दलदलीत रुतला की, त्याला सट्याच्या चक्रव्यूहात अडकवून लाखो रुपयांचे देणे दाखवले जाते. हे पैसे वसूल करण्यासाठी नंतर पिपराणी टोळीकडून गुंडगिरी, धमक्या आणि ब्लॅकमेलिंगचा मार्ग अवलंबला जातो. पालकांच्या कष्टाच्या पैशांवर शिक्षण घेणारे तरुण भीतीच्या छायेत घरातून चोऱ्या करणे, वाहन चोरी किंवा गुन्हेगारी मार्गाकडे वळत आहेत. पैशांचा तगादा सहन न झाल्याने अनेक उमलत्या पिढीचे आयुष्य उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. ​यवतमाळ शहरात सध्या निलेश पिपराणीच्या या बेधडक कारभारापेक्षाही अधिक चर्चा एका धक्कादायक समीकरणाची आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, यवतमाळ शहर पोलीस ठाण्यातील एका पोलीस जमादाराशी (ज्यांचे नाव अंकुश असल्याचे स्थानिक वर्तुळात बोलले जाते) पिपराणीचे असलेले कथित ‘मामा-भाचे’ संबंध या अवैध धंद्याला कवच ठरत आहेत.

​कायदा आणि सुव्यवस्थेचे रक्षकच जर सटोडियांचे भक्कम संरक्षक बनत असतील, तर दाद कोणाकडे मागायची, असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत. पोलीस दलातील या अंतर्गत साटेलोट्यामुळे स्थानिक पोलिसांकडून पिपराणीच्या अड्ड्यांवर केवळ ‘फार्स’ ठरणाऱ्या कारवाया केल्या जातात, किंवा छाप्यांची माहिती आधीच फुटते, अशी चर्चा यवतमाळकरांमध्ये दबक्या आवाजात नव्हे, तर आता चौकाचौकात उघडपणे सुरू आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना या अभद्र युतीचा सुगावा नाही की जाणीवपूर्वक डोळेझाक केली जात आहे, हा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे.

​सट्याचे हे लोण केवळ यवतमाळ शहरापुरते मर्यादित राहिलेले नसून संपूर्ण जिल्ह्याला पोखरत चालले आहे. जिल्ह्याची औद्योगिक आणि व्यावसायिक केंद्रे असलेली वणी, सीमावर्ती भागातील पांढरकवडा आणि नेर ही शहरे आता क्रिकेट सट्याची मुख्य माहेरघरे बनली आहेत. कोळसा खाणी आणि औद्योगिक कामगारांच्या पैशांवर सटोडियांची गिधाडनजर असून, रोज कोट्यवधी रुपयांची उलाढाल या भागात होत आहे. राष्ट्रीय महामार्गावरील मोक्याच्या ठिकाणाचा गैरफायदा घेत परराज्यातील बड्या बुकींशी थेट संपर्क ठेवून आंतरराज्य सट्टा चालवला जात आहे. ग्रामीण भागातील बागायतदार शेतकरी आणि व्यापारी वर्गाला लक्ष्य करून त्यांना कर्जाच्या खाईत ढकलले जात आहे. ​क्रिकेटच्या प्रत्येक आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय किंवा स्थानिक लीग सामन्यावर या शहरांमधून दररोज कोट्यवधी रुपयांची काळी उलाढाल होत असून, त्याचा थेट फटका स्थानिक अर्थव्यवस्थेला आणि सामाजिक शांततेला बसत आहे. ​व्यापाऱ्यांच्या आत्महत्या, उद्ध्वस्त होणारे सामान्य कुटुंब आणि गुन्हेगारीच्या गर्तेत ओढली जाणारी महाविद्यालयीन मुले – हे चित्र यवतमाळच्या संवेदनशीलतेवर ओरखडे ओढणारे आहे. निलेश पिपराणीसारखे गुन्हेगारी प्रवृत्तीचे म्होरके उजळ माथ्याने शहरात फिरत असताना पोलीस प्रशासन मात्र बघ्याची भूमिका घेत असल्याचा संताप सर्वसामान्य नागरिकांमधून व्यक्त होत आहे. ​गृहखात्याने आणि जिल्हा पोलीस अधीक्षकांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन, अंतर्गत असलेल्या खाकी वर्दीतील घटकांची चौकशी करावी आणि निलेश पिपराणीच्या संपूर्ण सिंडिकेटवर ‘मोक्का’ किंवा तडीपारीसारखी कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. अन्यथा, सटोडियांच्या या नंग्या नाचाविरोधात यवतमाळकरांचा रोष रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही.(क्रमशः)

ब्युरो रिपोर्ट साहसिक News-/24 यवतमाळ 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!