🔥वाघाच्या हल्ल्यात वासरू ठार; तारा सावंगा परिसरात दहशत,वनविभागाची तत्परता; पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांसह घटनास्थळी पाहणी.
आष्टी शहीद-तालुका-प्रतिनिधी(नरेश भार्गव)
आष्टी तालुक्यातील तारा सावंगा येथील पेठ शिवारात वाघाच्या हल्ल्यात एका वासराचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली असून परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
तारा सावंगा येथील शेतकरी रामेश्वर खोडे यांच्या पेठ शिवारातील शेतात गोठा असून त्यामध्ये गवळवू जातीच्या चार गायी व त्यांची वासरे बांधलेली होती. नेहमीप्रमाणे शेतकरी गोठ्यातील जनावरांची देखभाल करून घरी गेले. मात्र, दि. १३ रोजी सकाळी शेतात गेल्यावर त्यांना एक वासरू गोठ्यातून बेपत्ता असल्याचे आढळून आले.
शेतकऱ्यांनी परिसरात शोध घेतला असता झुडपामध्ये वासराचे अवशेष आढळून आले. अज्ञात वन्यप्राण्याने हल्ला करून वासराला ठार केल्याचा संशय व्यक्त केला जात असून, हा हल्ला वाघाने केल्याची शक्यता शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
घटनेची माहिती मिळताच वनपाल देविदास धुर्वे यांनी सुट्टीचा दिवस असतानाही तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. सुरज पाटील यांना सोबत घेऊन घटनास्थळी पाहणी केली व पंचनामा करण्यात आला.
या घटनेमुळे तारा सावंगा व परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, वनविभागाने वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करावा तसेच नुकसानग्रस्त शेतकरी रामेश्वर खोडे यांना शासन नियमानुसार आर्थिक नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे.