हिंगणघाटजवळ भीषण अपघात; टिपरच्या धडकेत एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू.

0

🔥हिंगणघाटजवळ भीषण अपघात; टिपरच्या धडकेत एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू.

हिंगणघाट -/ राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४४ वर हॉटेल तनवीर-सगुना कंपनी परिसरात शुक्रवारी सकाळी १० ते ११ वाजण्याच्या दरम्यान भीषण अपघात घडला. भरधाव टिपरने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने पती-पत्नी आणि चिमुकली मुलगी अशा एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गजानन मधुकरराव वानखेडे (वय ४५), पल्लवी वानखेडे (वय ३८) आणि आरोही वानखेडे (वय ६) हे दुचाकी क्रमांक एमएच ३२ एएम १६९४ ने कपडे खरेदीसाठी हिंगणघाटकडे येत होते. दरम्यान, राष्ट्रीय महामार्गावर विरुद्ध दिशेने भरधाव येणाऱ्या टिपरने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.

धडकेची तीव्रता इतकी भीषण होती की तिघांचाही घटनास्थळीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच हिंगणघाट पोलिस, ११२ पथक, महामार्ग सुरक्षा पथक आणि मदतकार्य करणारे कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. जखमींना उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर तिघांनाही मृत घोषित केले.

मृत वानखेडे कुटुंब हे समुद्रपूर तालुक्यातील वायगाव गोंड-कुर्ला येथील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे, मृत झालेली आरोही ही जुळी बहीण असून तिच्या पश्चात आणखी एक बहीण आहे.

अपघातानंतर काही काळ महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविले असून संबंधित टिपर चालकाचा शोध सुरू आहे. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पुढील तपास सुरू आहे.

           ईकबाल पहेलवान                 साहसिक News-/24 हिंगणघाट 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!