संतनगरीत वारकऱ्यांच्या सेवेसाठी वर्धा नागरी बँकेचा पाणीदार उपक्रम.!

0

🔥संतनगरीत वारकऱ्यांच्या सेवेसाठी वर्धा नागरी बँकेचा पाणीदार उपक्रम.!

सेलू -/ संत नगरी घोराड येथे आज सोमवारी भव्यदिव्य पालखी व दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्याला पंचक्रोशीतील भाविक व वारकऱ्यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती लाभली. यावेळी बोरतीरावरील नेत्रदीपक अश्वाचा रिंगण सोहळा पाहण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. याच पार्श्वभूमीवर वारकऱ्यांच्या सेवेसाठी वर्धा नागरी सहकारी अधिकोष बँक, सेलू शाखेच्या वतीने पिण्याच्या थंड पाण्याची व अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली.
या सोहळ्यात पंचक्रोशीतील तब्बल ३२० पेक्षा अधिक भजनी दिंड्यांनी सहभाग नोंदविला होता. संत नगरीत दाखल होणाऱ्या भाविकांसाठी सेलू येथील विकास चौकात बँकेचे कर्मचारी अजय कुलासपूरकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी अल्पोपहाराची व्यवस्था केली. तसेच घोराड येथील शनी मंदिराजवळ स्वतंत्र स्टॉल उभारून वारकऱ्यांसाठी थंड पिण्याच्या पाण्याचे जार उपलब्ध करून देण्यात आले.
या उपक्रमांतर्गत जवळपास २५० पाण्याचे जार उपलब्ध करून देण्यात आले होते. सकाळपासून दिवसभर आणि रात्री उशिरापर्यंत वारकऱ्यांसाठी मोफत पिण्याचे पाणी उपलब्ध होते. कडक उन्हात पायी वारी करणाऱ्या वारकऱ्यांना या उपक्रमामुळे मोठा दिलासा मिळाला.
वर्धा नागरी बँकेच्या या स्तुत्य उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असून सामाजिक बांधिलकीचे दर्शन यातून घडल्याची भावना भाविकांनी व्यक्त केली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सेवेचा पगडा असलेल्या अजय कुलासपूरकर यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात आल्याचे यावेळी फिरता फिरता कळले.

सचिन धानकुटे साहसिक News-/24 सेलू

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!