हिंगणघाट -/ नायलॉन मांजाने अनेकांचे जीवघेणे अपघात झाले असून काल पुन्हा स्वातंत्र्यदिनी एका माजी सैनिकाचा शहरात अपघात झाला असून ते या अपघातात गंभीर जखमी झाले आहेत.सरकारचेवतीने नायलॉन मांजा विक्री व वापरासंबंधात नियमावली ठरविण्यात आली असली तरीही स्थानिक प्रशासन यासंबंधात कारवाई करीत नसल्यामुळे शहरात विविध ठिकाणी खुलेआम विक्री व वापर दिसून येत आहे.
काल सायंकाळी यशवंतनगर येथील माजी सैनिक राजाभाऊ तायडे(७२)हे आठवडी बाजारातून आपल्या मोपेड दुचाकीने परत येत असताना स्थानिक लक्ष्मी टॉकीज परिसरात मांजाचे जाळ्यात अडकून गंभीर जखमी झाले. त्यांचे डोक्याला व गळ्याला गंभीर दुखापत झाली.
जखमी अवस्थेत येथील सुज्ञ नागरिकांनी त्यांना उपचारार्थ रुग्णालयात दाखल केले.
नायलॉन मांजाचा वापर करण्यासाठी नगर परिषद प्रशासनाने बंदी घातली असून वापर करणाऱ्या व्यक्ती व मुलांना ५० हजार रुपये दंड तर विक्री करणाऱ्यांस २५ लाख रुपये दंड आकारण्यात येणार असल्याची माहिती प्रकाशित करण्यात आली आहे.
या जीवघेण्या मांजाचा तत्काळ वापर बंद करण्यासाठी प्रशासनाने कारवाई करावी अशी मागणी जनतेद्वारे करण्यात येत आहे.