🔥दक्षीण आर्णी वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याच्या आशीर्वादाने राखीव वनात ‘कुऱ्हाड’; 🔥वाळू तस्करीसाठी पाच किमीचे राखीव जंगलाचा रस्ता साफ!वनपरीक्षेत्र अधिकारी चैतन्य भोजने तसेच वाळु माफीया शुभम गायकवाड चा प्रताप.
यवतमाळ -/जिल्ह्यातील वडगाव धानोरा येथील सागवान वृक्षतोडीचे प्रकरण ताजे असतानाच, आता आर्णी तालुक्यातून निसर्ग साखळीला काळिमा फासणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. दक्षिण आर्णीचे वनपरिक्षेत्र अधिकारी (RFO) चैतन्य भोजने यांनी वाळू घाट मालकाशी हातमिळवणी करून चक्क राखीव वनक्षेत्रातून अवैध वाळू वाहतुकीसाठी रस्ता मोकळा करून दिल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे.
जंलाद्री घाट मालक शुभम गायकवाड आणि वनविभागाच्या अधिकाऱ्यांमधील ‘अर्थपूर्ण’ संबंधांमुळे पैनगंगा नदीच्या पात्रातून अवैध रेती उपसा करण्यासाठी निसर्गाचा बळी दिला जात आहे. या घाट मालकाला फायदा पोहोचवण्यासाठी आर एफ ओ भोजने यांनी चक्क राखीव वनातील झाडे तोडून रस्ता तयार करण्याची मूक संमती दिली. विशेष म्हणजे, एका रात्रीत जेसीबीच्या साहाय्याने पाच किलोमीटर लांबीचा रस्ता तयार करण्यात आला. या पाच किलोमीटरच्या पट्ट्यात नेमकी किती शेकडो झाडे तोडली गेली, याचा अंदाज लावणेही आता कठीण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही वृक्षतोड महिन्याभरापूर्वीच करण्यात आली होती. त्यानंतर, रातोरात जेसीबी चालवून आणि ओव्हरलोड ट्रकची वर्दळ वाढवून जंगलातून कायमस्वरूपी रस्ता तयार करण्यात आला. आज या राखीव वनातून दररोज रात्री शेकडो ट्रक, टिप्पर आणि ट्रॅक्टर भरधाव वेगाने वाळूची अवैध वाहतूक करत आहेत. ज्या जंगलाचे रक्षण करण्याची जबाबदारी चैतन्य भोजने यांच्यावर होती, त्याच जंगलाचे त्यांनी वाळू तस्करांसाठी ‘कुरण’ केल्याचा आरोप होत आहे.
जिल्ह्यात एकीकडे पर्यावरण रक्षणाच्या गप्पा मारल्या जात असताना, दुसरीकडे सरकारी अधिकारीच वाळू माफियांना पायघड्या घालत आहेत. कोट्यवधी रुपयांच्या वनसंपदेची राखरांगोळी करणाऱ्या या रॅकेटमध्ये किती लाखांची ‘मलिदा’ वाटला गेला, याची चौकशी होणे गरजेचे आहे.
आता सर्वांचे लक्ष याकडे लागले आहे की
मुख्य वनसंरक्षक किशोर मानकर या भ्रष्ट अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई करणार का?
जिल्हाधिकारी या अवैध वाळू उपसा आणि वृक्षतोडीची दखल घेऊन संबंधितांवर गुन्हे दाखल करणार का?
नष्ट झालेल्या वनसंपदेची भरपाई कोण करून देणार?
यामुळे आर्णीतील जंगलाचे अस्तित्व धोक्यात आले आहे. जर तात्काळ कारवाई झाली नाही, तर जनआंदोलन छेडले जाईल,”(क्रमशः)