नागपूर -/आज मन मान्यच करत नाही… शब्द सुचत नाहीत…
फक्त विकासाचे राजकारण करणारे, सामान्य माणसाच्या प्रश्नांसाठी कधीही मागे न हटणारे अजितदादा आपल्यातून अचानक निघून जातील, असे स्वप्नातही कधी वाटले नव्हते. त्यांच्या जाण्याची बातमी कळताच मन सुन्न झाले, हृदयावर जणू कुणीतरी घाव घातल्यासारखे वाटले.
दादांची दबंगगिरी आम्हाला नेहमीच हक्काची वाटायची. कारण ती दबंगगिरी सत्ता दाखवण्यासाठी नव्हती, तर अन्याय मोडून काढण्यासाठी होती. चुकीच्या गोष्टींवर दादांचा संताप असायचा, पण सामान्य माणसाच्या दुःखावर त्यांचे मन तितकेच हळवे असायचे. त्यामुळेच ते केवळ नेते नव्हते, तर लाखो कार्यकर्त्यांचे आधारस्तंभ होते.
मी पंधरा वर्षे दादांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसचे काम पाहिले. त्या काळात राजकारणाचा खरा अर्थ समजला. सत्ता म्हणजे सेवा असते, पद म्हणजे जबाबदारी असते आणि नेता म्हणजे लोकांसाठी स्वतःला झोकून देणारा माणूस असतो—हे दादांनी कृतीतून शिकवले. कठीण प्रसंगातही खचून न जाता उभं राहायचं बळ त्यांनी आम्हाला दिलं.
मी पाहिलेला अजितदादा हा असा लोकनेता होता, ज्यांनी कधीही जात-धर्माचा भेद केला नाही. समाजातील शेवटच्या घटकापर्यंत न्याय पोहोचवण्याचा त्यांचा प्रामाणिक प्रयत्न असायचा. पाणी, वीज, रस्ते, शेतकरी, कामगार, युवक—प्रत्येकाच्या प्रश्नावर ते तितक्याच तळमळीने बोलायचे. म्हणूनच ते खऱ्या अर्थाने जात-पात विरहित नेतृत्वाचे प्रतीक होते.
आज दादांचे शरीर आपल्यात नाही, ही जाणीव असह्य वेदना देणारी आहे. पण देह नश्वर असतो… विचार अमर असतात. दादांचे विचार, त्यांचे धाडस, त्यांची विकासाभिमुख भूमिका आणि सामान्य माणसावरचं प्रेम कधीही संपणार नाही.
अशा निर्भीड, कर्तृत्ववान, जनतेसाठी जगलेल्या आणि जनतेसाठीच झटलेल्या महान लोकनेत्याला ही अश्रूंनी ओथंबलेली, अंतःकरणातून उमटलेली भावपूर्ण श्रद्धांजली.