🔥सेलूत मोकाट कुत्र्यांचा हैदोस;चार वर्षीय बालकावर प्राणघातक हल्ला,दोन दिवसांत दुसरी घटना.
सेलू -/शहरात मोकाट कुत्र्यांनी अक्षरशः दहशत माजवली असून निष्पाप बालकांना लक्ष्य केले जात आहे. येथील वॉर्ड क्रमांक दोनमध्ये आज रविवारी दुपारी तीन वाजताच्या सुमारास घराच्या दारात खेळणाऱ्या चार वर्षीय बालकावर मोकाट कुत्र्याने हल्ला करून पायाचा लचका तोडल्याची संतापजनक घटना घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, तिलक प्रतीक गुरवे(वय ४) ,आपल्या घरासमोर खेळत असताना अचानक आलेल्या मोकाट कुत्र्याने त्याच्या पायावर आणि खांद्यावर चावा घेतला. रक्तबंबाळ अवस्थेत बालकाला तातडीने येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करीत त्याच्यावर उपचार करण्यात आलेत. विशेष म्हणजे, हाच मोकाट कुत्रा दोन दिवसांपूर्वी स्वर्णिम स्वप्नील चौधरी(वय २) या चिमुकल्याच्या पोटावर चावून गंभीर जखमी करून गेला होता. सलग दोन घटनांमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून पालकांमध्ये तीव्र संताप आहे. शहरात मोकाट कुत्र्यांची संख्या वाढली असून नगरपंचायतचे याकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. “आणखी किती बालकं जखमी झाल्यावर प्रशासन जागं होणार?” असा सवाल संतप्त नागरिक उपस्थित करत आहेत.
मोकाट कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करण्याची, पकड मोहीम राबवण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. अन्यथा नागरिक रस्त्यावर उतरतील, असा इशाराही दिला जात आहे.