नागपूर -/ अमरावती रोडवरील सिद्धार्थ सोसायटी, आठवा मैल येथील १२ वर्षीय वंश राजकुमार वानखेडे हा मतिमंद मुलगा आज सकाळी घरासमोर खेळत असताना अचानक सायकल घेऊन निघून गेला. बराच वेळ उलटूनही तो घरी न परतल्याने कुटुंबीयांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. परिसरातही चिंतेची लाट पसरली होती.दरम्यान, दुपारी साधारण १२ते १ वाजण्याच्या सुमारास वंश हा दहेगाव परिसरात आढळून आला. तेथील सजग नागरिकांनी तत्काळ कळमेश्वर पोलीस ठाणे येथे संपर्क साधत पीएसआय प्रवीण जी. घोडाम, कॉन्स्टेबल कोमल तसेच मंगेशभाऊ गमे यांना माहिती दिली.कळमेश्वर पोलिसांनी तत्परता दाखवत मुलाची ओळख पटवली आणि तात्काळ पालकांशी संपर्क साधला. आवश्यक पडताळणी पूर्ण केल्यानंतर वंशला सुखरूप त्याच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात आले.या संपूर्ण घटनेत सजग नागरिकांची सतर्कता आणि पोलिसांची वेगवान कार्यवाही यामुळे एक संभाव्य अनर्थ टळला. परिसरात नागरिक व पोलिसांच्या समन्वयाचे सर्वत्र कौतुक होत आहे.