यवतमाळात ‘स्वरा फार्म हाऊस’ बनले जुगाराचा ‘कॅसिनो’; पोलीस अधीक्षकांच्या आशीर्वादाने ‘रम-रम्मा-रम्मी’चा धिंगाणा!…

0

🔥हाच तो यवतमाळात ‘स्वरा फार्म हाऊस’ बनले जुगाराचा ‘कॅसिनो’; पोलीस अधीक्षकांच्या आशीर्वादाने ‘रम-रम्मा-रम्मी’चा धिंगाणा!

🔥​आमदार बाळासाहेब मांगुळकरांच्या तक्रारीला केराची टोपली?

🔥‘कालू बियाणी’ सांभाळतो सर्व कारभार ; पोलीस महासंचालक कारवाई करणार का?

​यवतमाळ -/ यवतमाळ शहराच्या वेशीवर असलेल्या ‘स्वरा फार्म हाऊस’वर सध्या कायद्याचा नव्हे, तर जुगाराचा आणि अश्लीलतेचा नंगानाच सुरू आहे. रात्रंदिवस चालणाऱ्या या ‘बाई, बाटली आणि जुगाराच्या’ खेळाने जिल्ह्याची शांतता धोक्यात आली असून, पांढरपेशी जुगारी आणि धनदांडग्यांची येथे मोठी मांदियाळी जमली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, जिल्ह्याच्या सर्वोच्च पोलीस अधिकाऱ्यांनीच या अवैध धंद्यांना ‘अभय’ दिल्याची चर्चा आता शहरात उघडपणे रंगू लागली आहे.
​​मिळालेल्या माहितीनुसार, स्वरा फार्म हाऊसवर केवळ साधा जुगार चालत नसून, एखाद्या आंतरराष्ट्रीय कॅसिनोला लाजवेल अशी व्यवस्था करण्यात आली आहे. एका स्वतंत्र खोलीत जुगाराचे ४ ते ५ टेबल लावण्यात आले असून, तेथे ‘रम-रम्मा-रम्मी’चा खेळ जोरात सुरू आहे. या फार्म हाऊसमध्ये प्रवेश करण्यासाठी सर्वसामान्यांना बंदी असून, केवळ ‘विशेष पास’ असलेल्या निवडक जुगाऱ्यांनाच एन्ट्री दिली जाते. परिस्थिती इतकी गंभीर आहे की, मोजक्याच लोकांना प्रवेश मिळत असल्याने अनेक धनदांडगे बाहेर ‘वेटिंग’वर असतात.
​या संपूर्ण काळ्या साम्राज्याचा सूत्रधार ‘कालू बियाणी’ नामक कुख्यात जुगारी असल्याचे समोर आले आहे. तत्कालीन पोलीस अधीक्षकांनी यापूर्वी येथे धाड टाकून नामवंत जुगारी आणि त्यांच्या आलिशान कार जप्त केल्या होत्या. मात्र, सद्यस्थितीत हे फार्म हाऊस गुन्हेगारांचे सुरक्षित आश्रयस्थान बनले आहे. या फार्म हाऊसच्या आडोशाने अनेक छोटे-छोटे फार्म हाऊस उभारण्यात आले असून, तेथे ऐय्याशीसाठी सर्व प्रकारची रसद पुरवली जात आहे. ​यवतमाळचे पोलीस अधीक्षक स्वतःला गृहराज्यमंत्र्यांचे निकटवर्तीय म्हणवून घेत असल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे. “माझे कोणी काहीही वाकडे करू शकत नाही,” अशा आविर्भावात हे अधिकारी वागत असल्यामुळेच स्वरा फार्म हाऊससारख्या ठिकाणांवर कारवाई करण्याचे धाडस स्थानिक प्रशासन दाखवत नसल्याचा आरोप होत आहे. पोलीसच जर रक्षक बनण्याऐवजी भक्षक बनत असतील, तर जनतेने दाद कोणाकडे मागायची, असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे.
​​आमदार बाळासाहेब मांगुळकर यांनी यवतमाळमधील अवैध धंद्यांविरुद्ध रणशिंग फुंकले आहे. त्यांनी थेट पोलीस महासंचालक सदानंद दाते यांची भेट घेऊन अवैध व्यावसायिकांची संपूर्ण ‘कुंडली’च सादर केली होती. या यादीत ‘स्वरा फार्म हाऊस’चे नाव अग्रक्रमाने होते. मात्र, आमदारांच्या या पाठपुराव्यानंतरही कारवाई शून्य आहे. पोलीस प्रशासन आमदारांच्या पत्राला आणि लोकभावनेला केराची टोपली दाखवत असल्याचे चित्र दिसत आहे.
​​एकीकडे यवतमाळचा तरुण वर्ग जुगाराच्या आहारी जात असताना, दुसरीकडे ‘स्वरा’वर धनदांडग्यांची मौज सुरू आहे. आता सर्वांचे लक्ष पोलीस महासंचालक सदानंद दाते यांच्याकडे लागले आहे. ते या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन पोलीस अधीक्षकांच्या मनमानीला लगाम घालणार का? की स्वरा फार्म हाऊसवरचा हा ‘रम-रम्मा-रम्मी’चा खेळ असाच सुरू राहणार?(क्रमशः)

          ब्युरो रिपोर्ट साहसिक           News-/24 यवतमाळ 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!