वर्धा जिल्हा परिषद इमारतीतील कालबाह्य अग्निशामक यंत्रांमुळे नागरिकांच्या जीवितास धोका – तात्काळ कारवाईची मागणी

0

🔥वर्धा जिल्हा परिषद इमारतीतील कालबाह्य अग्निशामक यंत्रांमुळे नागरिकांच्या जीवितास धोका – तात्काळ कारवाईची मागणी.

वर्धा -/ वर्धा जिल्हा परिषद ही जिल्ह्यातील अत्यंत महत्त्वाची शासकीय संस्था असून येथे दररोज शेकडो नागरिक, महिला, शेतकरी, विद्यार्थी तसेच कर्मचारी विविध शासकीय कामांसाठी येत असतात. अशा ठिकाणी अग्निसुरक्षा व्यवस्था अद्ययावत व कार्यक्षम असणे अत्यावश्यक आहे.मात्र प्रत्यक्ष पाहणीत जिल्हा परिषद मुख्य इमारतीमध्ये बसविण्यात आलेल्या अनेक अग्निशामक सिलेंडरची वैधता मुदत (Expiry Date) संपलेली असल्याचे निदर्शनास आले आहे. अशा परिस्थितीत आग किंवा अन्य आपत्कालीन घटना घडल्यास हे अग्निशामक यंत्र कार्यरत राहतील की नाही याबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाला असून नागरिक व कर्मचाऱ्यांच्या जीवितास मोठा धोका निर्माण होऊ शकतो.

एकीकडे नागरिकांच्या सुरक्षेशी थेट संबंधित असलेल्या अग्निसुरक्षा व्यवस्थेकडे दुर्लक्ष होत असताना, दुसरीकडे विविध दालनांच्या नूतनीकरण व दुरुस्तीवर मोठ्या प्रमाणात सार्वजनिक निधी खर्च करण्यात येत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे प्रशासनाच्या प्राधान्यक्रमाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

या संदर्भात मा. जिल्हाधिकारी, मा. मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) जिल्हा परिषद व अग्निशमन विभाग नगरपरिषद वर्धा यांच्याकडे लेखी तक्रार आपले सरकार पोर्टल वर सादर करण्यात आली असून खालील मागण्या करण्यात आल्या आहेत :

१. जिल्हा परिषद इमारतीमधील सर्व कालबाह्य (Expired) अग्निशामक सिलेंडर तात्काळ बदलण्यात यावेत.

२. संपूर्ण इमारतीचे स्वतंत्र व अधिकृत फायर ऑडिट करून त्याचा अहवाल सार्वजनिक करण्यात यावा.

३. अग्निसुरक्षा व्यवस्थेकडे दुर्लक्ष करणाऱ्या संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांची चौकशी करून आवश्यक प्रशासकीय कारवाई करण्यात यावी.

४. इमारतीमध्ये अग्निसुरक्षा नियमांचे पालन होत असल्याबाबतचा अनुपालन अहवाल जाहीर करण्यात यावा.

५. सदर तक्रारीवर करण्यात आलेल्या कार्यवाहीचा लेखी अहवाल तक्रारदारास देण्यात यावा.

प्रशासनाने या गंभीर प्रकरणाची तातडीने दखल घेऊन आवश्यक कार्यवाही करावी. अन्यथा येत्या ७ दिवसांत सामान्य जनतेसह लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.

         ब्युरो रिपोर्ट साहसिक       News-/24 वर्धा 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!