आदिवासी शेतकऱ्याची जमीन बळकावणार्या ना. अशोक उईके विरूद्ध मुख्यमंत्री दखल घेतली का ? 

0

🔥हेच ते महाराष्ट्र राज्याचे ना. अशोक उईके,आदिवासीं विकास मंत्री यांनी आपल्याच समाज बांधवाची जमिन केली हडप

🔥आदिवासी शेतकऱ्याची जमीन बळकावणार्या ना. अशोक उईके विरूद्ध मुख्यमंत्री दखल घेतली का ? 

🔥 ना. अशोक उईके यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्याचा शेतकऱ्याचा इशारा

​यवतमाळ -/ राज्याचे आदिवासी विकास मंत्री ना. अशोक उईके यांच्यावर यवतमाळ शहरालगतच्या मौजा किन्ही येथील एका आदिवासी शेतकऱ्याची वडिलोपार्जित जमीन आमिष दाखवून बळकावल्याचा आणि एका नामांकित डॉक्टरची आर्थिक फसवणूक केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. दिवाणी न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करून ही जमीन परस्पर बिगर-आदिवासी व्यक्तींना विकल्याचा आणि महामार्गाच्या मोबदल्याची रक्कम लाटल्याचा दावा स्थानिक पातळीवर केला जात आहे. या प्रकरणी मूळ जमीन मालक लक्ष्मण उगले यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याचा निर्णय घेतला असून, जिल्हाधिकारी व तहसीलदारांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

राज्याचे आदिवासी विकास मंत्री ना. अशोक उईके एका मोठ्या जमीन व्यवहार आणि आर्थिक फसवणुकीच्या आरोपांमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यवतमाळ शहरालगत असलेल्या मौजा किन्ही येथील गट क्रमांक १५९/४ मधील १ हेक्टर ३० आर शेतजमीन आमिष दाखवून आणि दबाव टाकून नावावर करून घेतल्याचा आरोप आंध समाजाचे आदिवासी शेतकरी लक्ष्मण उगले यांच्या बाजूने करण्यात येत आहे. स्थानिक वृत्तप्रतिनिधींनी केलेल्या पाहणीनुसार, या व्यवहारात केवळ शेतकऱ्याचीच नव्हे, तर शहरातील एका नामांकित डॉक्टरचीही लाखोंची फसवणूक झाल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मौजा किन्ही येथील महामार्गालगत असलेली लक्ष्मण उगले यांची १ हेक्टर ३० आर जमीन अतिशय मोक्याच्या ठिकाणी आहे. या जमिनीचा दामदुप्पट मोबदला मिळवून देण्याचे आमिष दाखवून अशोक उईके यांनी पोकळ खरेदीखताद्वारे ही जमीन स्वतःच्या नावावर करून घेतली, असा आरोप आहे. विशेष म्हणजे, या जमिनीसंदर्भात दिवाणी न्यायालयाचा ‘जैसे थे’ ( ठेवण्याचा आदेश असतानाही, तो आदेश धुडकावून ही जमीन परस्पर शहरातील एका बिगर-आदिवासी व्यक्तीला विकण्यात आल्याचे सांगितले जात आहे. पुढे ही जमीन महामार्गात गेल्याने त्यापोटी मिळालेला मोठा आर्थिक मोबदलाही उईके यांनीच लाटल्याचा दावा तक्रारदारांकडून करण्यात आला आहे. याच जमिनीच्या व्यवहारातून यवतमाळमधील एका नामांकित डॉक्टरचीही फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. संबंधित डॉक्टरला या जमिनीच्या व्यवहारात लाखो रुपयांचा नफा मिळवून देण्याचे आश्वासन देऊन सुरुवातीला खात्यात १ लाख रुपये भरण्यास सांगण्यात आले. त्यानंतर, ही जमीन आदिवासी खातेदाराची असल्याने तिचे बिगर-आदिवासीमध्ये रूपांतर करण्यासाठी प्रशासकीय खर्च लागेल, असे सांगून टप्प्याटप्प्याने तब्बल १५ लाख रुपये उकळण्यात आले, असा आरोप आहे. एकूण ५० लाख रुपयांच्या फसवणुकीची चर्चा या निमित्ताने शहरात सुरू आहे. काम होत नसल्याचे लक्षात आल्यानंतर डॉक्टरने पैशांची मागणी केली असता, २०१० पासून आजतागायत केवळ आश्वासने देऊन टाळाटाळ केली जात असल्याचे समजते. या प्रकरणी डॉक्टरने तक्रार केल्यानंतर यवतमाळमधील एका माजी मंत्र्याच्या मध्यस्थीने पैसे परत करण्याचे कबूल करण्यात आले होते, मात्र अद्यापही रक्कम परत मिळालेली नाही, असे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.

जमिनीचे मूळ मालक लक्ष्मण उगले यांनी आरोप केला आहे की, त्यांची वडिलोपार्जित जमीन फसवणूक करून ताब्यात घेण्यात आली आणि त्यांना मारहाण करून जमिनीवरील हक्क सोडण्यास भाग पाडण्यात आले. या घटनेमुळे उगले कुटुंबावर मोठे आर्थिक व पारिवारिक संकट ओढवले आहे. आदिवासी समाजाच्या विकासाची जबाबदारी ज्या मंत्र्यांवर आहे, त्यांच्याकडूनच एका गरीब आदिवासी शेतकऱ्याची जमीन बळकावली गेल्याने स्थानिक आदिवासी बांधवांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.आता शासनाच्या विविध निर्णयांच्या आधारे आपली वडिलोपार्जित जमीन परत मिळवण्यासाठी लक्ष्मण उगले यांनी कंबर कसली असून, ते या प्रकरणी पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार दाखल करणार आहेत. तसेच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेऊन या संपूर्ण प्रकरणाची माहिती देणार असल्याचे आदिवासी समाजातील कार्यकर्त्यांकडून सांगण्यात आले आहे.

​यवतमाळचे जिल्हाधिकारी विकास मीना आणि तहसीलदार योगेश देशमुख यांनी या संपूर्ण जमीन व्यवहाराची, खरेदीखताची आणि न्यायालयाच्या आदेशाच्या उल्लंघनाची सखोल चौकशी करावी, तसेच दोषींवर कठोर कारवाई करून संबंधित आदिवासी शेतकऱ्याला त्याची जमीन सन्मानाने परत मिळवून द्यावी, अशी मागणी जोर धरत आहे. या सर्व आरोपांसंदर्भात ना. अशोक उईके यांची बाजू अद्याप समोर आलेली नसून, त्यांच्या प्रतिक्रियेनंतर या प्रकरणातील अधिक स्पष्टता समोर येईल.(क्रमशः)

ब्युरो रिपोर्ट साहसिक News-/24 यवतमाळ 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!