रावसाहेब पटवर्धन बँक घोटाळा,पैशाच्या जोरावर प्रकरण दाबण्याचा डाव; आरोपी उपनिबंधक कार्यालयात येऊनही पोलिसांकडून अभय

0

🔥हाच तो रावसाहेब पटवर्धन मल्टीस्टेट घोटाळा सूत्रधार अतुल महाजन 🔥अनिल विठ्ठल बांद्रे 🔥सचिन पुंडलिक बनकर

🔥रावसाहेब पटवर्धन बँक घोटाळा,पैशाच्या जोरावर प्रकरण दाबण्याचा डाव; आरोपी उपनिबंधक कार्यालयात येऊनही पोलिसांकडून अभय

🔥उपनिबंधक कार्यालयाचा संशयास्पद ‘यू-टर्न’; ‘मल्टीस्टेट’चे कारण पुढे करत अधिकाऱ्यांनी वर केले हात

🔥हिंगणघाट ठाण्यात १३ संचालकांवर गुन्हे दाखल, तरीही यवतमाळ पोलीस बघ्याच्या भूमिकेत

🔥मुख्य सूत्रधार अतुल महाजनच्या ‘अर्थपूर्ण’ हालचालींचा फटका; ग्राहक आणि कर्मचारी वाऱ्यावर

 प्रतिनिधी,यवतमाळ-/ हिंगणघाट पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल असलेले रावसाहेब पटवर्धन पतसंस्थेचे आरोपी संचालक खुलेआम जिल्हा उपनिबंधक (DDR) कार्यालयात वावरत असतानाही, यवतमाळ पोलिसांनी त्यांना बेड्या ठोकण्याऐवजी दिलेले ‘अभय’ प्रशासनाच्या संशयास्पद भूमिकेवर शिक्कामोर्तब करणारे ठरले आहे. पैशाच्या ताकदीवर कोट्यवधींचा हा आर्थिक घोटाळा दडपण्याचा पद्धतशीर प्रयत्न सुरू असून, सुरुवातीला मध्यस्थी करणारे जिल्हा उपनिबंधक कार्यालयही आता हात वर करत असल्याने सामान्य ठेवीदार व कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे.

​हिंगणघाट पोलीस ठाण्यात संस्थेच्या अध्यक्षासह १३ संचालकांवर आर्थिक फसवणुकीचे गंभीर गुन्हे दाखल आहेत. गुन्हे दाखल असलेले आरोपी उजळ माथ्याने शहरात फिरत असताना पोलीस मात्र तपास आणि अटकेच्या नावाखाली केवळ कागदी घोडे नाचवत असल्याचा आरोप होत आहे. यवतमाळच्या उपनिबंधक कार्यालयात हे संचालक बैठकीसाठी हजर झाले होते; मात्र याची माहिती असूनही पोलिसांनी आरोपींना अटक करण्याचे धाडस दाखवले नाही.

घोटाळ्याचा जाब विचारण्यासाठी संस्थेचे हवालदिल कर्मचारी, एजंट आणि ठेवीदार मोठ्या संख्येने उपनिबंधक कार्यालयावर धडकले. अध्यक्ष सोमण गैरहजर राहिले तरी मोजके संचालक तेथे उपस्थित होते. उपनिबंधक माळवे यांनी संचालकांसह केवळ चार ते पाच प्रतिनिधींना दालनात बोलावून चर्चा केली. मात्र, या बैठकीत उपनिबंधकांनी घेतलेली भूमिका थक्क करणारी होती. “ही मल्टीस्टेट सोसायटी असून ती माझ्या कार्यकक्षेत किंवा अखत्यारित येत नाही,” असे सांगत त्यांनी थेट जबाबदारी झटकून टाकली. “या प्रकरणातील पेपरबाजीमुळे मला नाहक त्रास सहन करावा लागत आहे,” असा त्रागाही त्यांनी व्यक्त केला. आजवर या प्रकरणात बैठका आणि मध्यस्थी करणाऱ्या अधिकाऱ्यांनी ऐन मोक्याच्या क्षणी अशी पळवाट काढल्याने संशयाचे धुके अधिक दाट झाले आहे. प्रकरणाचा मुख्य सूत्रधार अतुल महाजन हा पैशांच्या जोरावर संपूर्ण यंत्रणा मॅनेज करत असल्याचा आरोप सुरुवातीपासून केला जात होता. अधिकारी अचानक घेत असलेली बचावात्मक भूमिका आणि पोलिसांचे दुर्लक्ष पाहता हा अंदाज खरा ठरताना दिसत आहे. वरच्या स्तरावरून राजकीय दबाव आणून हे प्रकरण दाबण्यात येत आहे की तपास यंत्रणांना ‘अर्थपूर्ण’ वाटाघाटींनी थंड करण्यात आले आहे, असा थेट सवाल आता फसवणूक झालेले नागरिक उपस्थित करत आहेत.

संस्थेतील ठेवीदारांचे कोट्यवधी रुपये अडकल्याने सामान्यांचे संसार उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत. कर्मचाऱ्यांना पगार मिळालेले नाहीत, तर एजंटांना लोकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. हक्काचे पैसे बुडाल्याने उघड्यावर पडलेल्या ग्राहकांनी आता संताप व्यक्त केला असून, सहकार विभाग जर हात झटकणार असेल तर थेट पोलीस अधीक्षकांच्या दारात आंदोलन करण्याचा आणि गुन्हे शाखेकडे धाव घेण्याचा इशारा ठेवीदारांनी दिला आहे.(क्रमशः….)

ब्युरो रिपोर्ट साहसिक News-/24 यवतमाळ 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!