२४ तासांचा कृषी वीजपुरवठा कायम ठेवण्याची शेतकऱ्यांची मागणी

0

🔥२४ तासांचा कृषी वीजपुरवठा कायम ठेवण्याची शेतकऱ्यांची मागणी

🔥वीजपुरवठ्यात कपात केल्यास आंदोलनाचा इशारा; महावितरणकडे निवेदन

सेलू -/ शेतीसाठी सध्या सुरू असलेला २४ तासांचा वीजपुरवठा कायम ठेवावा, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी महावितरणकडे निवेदनाद्वारे केली आहे. कृषीपंपांचा वीजपुरवठा २४ तासांवरून आठ तासांवर आणण्याच्या प्रस्तावामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंता निर्माण झाल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

परिसरातील अनेक शेतकरी बागायती शेतीवर अवलंबून असून केळी, ऊस, भाजीपाला यांसह विविध पिकांचे नियोजन करतात. तसेच रब्बी हंगामात हरभरा आणि उन्हाळ्यात मका यांसारखी पिके घेतली जातात. या पिकांच्या नियोजनासाठी नियमित वीजपुरवठा आवश्यक असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

महावितरणकडून शेतीसाठीचा वीजपुरवठा आठ तासांपर्यंत मर्यादित करण्याची कार्यवाही झाल्यास सिंचनावर मोठा परिणाम होऊन पिकांचे नुकसान होण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. शेती हेच उदरनिर्वाहाचे प्रमुख साधन असल्याने वीजपुरवठ्यात कपात केल्यास शेतकऱ्यांवर आर्थिक संकट ओढवू शकते, असे निवेदनात म्हटले आहे.

दरम्यान, शेतीसाठीचा वीजपुरवठा पूर्वीप्रमाणे २४ तास सुरळीत ठेवावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. मागणी मान्य न झाल्यास महावितरणच्या कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही शेतकऱ्यांनी निवेदनातून दिला आहे.

ब्युरो रिपोर्ट साहसिक News-/24 सेलू,वर्धा 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!