यवतमाळ -/ केंद्रात आणि राज्यात भाजपची पूर्ण सत्ता, पाठीशी कॅबिनेट मंत्री असणाऱ्या वडिलांचा वरदहस्त, तरीही नगराध्यक्ष प्रियदर्शनी उईके यांच्या कार्यकाळातील ‘नऊ महिने नऊ दिवसांत’ यवतमाळकरांच्या पदरी केवळ फसवणूक, चिखल आणि वणवणच पडली आहे! सत्तेची स्वप्ने दाखवून खुर्ची पटकावली; मात्र नऊ महिन्यांनंतरही यवतमाळच्या विकासाचा ‘पाळणा रिकामाच’ असल्याची सडकून टीका सामाजिक कार्यकर्ते नीरज वाघमारे यांनी केली. खड्ड्यांचे साम्राज्य, ढिगाऱ्यांनी साचलेला कचरा, विस्कळीत पाणी आणि कुत्र्यांच्या सुळसुळाटाने शहराची दुरवस्था झाली असून उईके यांच्या नाकर्तेपणामुळे यवतमाळचा अक्षरशः बट्ट्याबोळ झाल्याचा थेट घाव घालत वाघमारे यांनी पत्रकार परिषदेत नगरपरिषदेच्या कारभाराची पिसे काढली.
यवतमाळ शहरात सध्या प्राथमिक नागरी सुविधांचा पूर्णतः बोजवारा उडाला असून नगरपरिषद प्रशासन आणि सत्ताधारी भाजप शहराला भकास अवस्थेकडे ढकलत असल्याचा गंभीर आरोप नीरज वाघमारे यांनी पत्रकार परिषदेत केला. स्वातंत्र्याच्या तब्बल आठ दशकांनंतरही नागरिकांना शुद्ध पाणी, रस्ते, स्वच्छता, आरोग्य आणि महिलांसाठी साध्या सार्वजनिक स्वच्छतागृहांसाठी संघर्ष करावा लागतो, ही शहराची सर्वात मोठी शोकांतिका असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
नगरपरिषदेत सुरू असलेल्या खरेदी व्यवहारांची पोलखोल करताना वाघमारे यांनी धक्कादायक आकडेवारी जाहीर केली. बाजारात ६५० रुपयांना सहज मिळणारी तणनाशक बॅग पालिकेने तब्बल १,१२० रुपयांना खरेदी केली. मोकाट कुत्रे पकडण्यासाठी प्रति कुत्रा १,६१० रुपयांचा अव्वाच्या सव्वा दर ठरवून जनतेच्या पैशांची लुटालूट चालवली आहे. लाखो लोकसंख्या असलेल्या संपूर्ण शहरासाठी पालिकेकडे केवळ एकच फॉगिंग मशीन आहे आणि त्यातही पेट्रोलच्या नावावर खुलेआम काळाबाजार सुरू असल्याचा घणाघात त्यांनी केला.
कचरा वाहून नेणाऱ्या वाहनांच्या दुरुस्तीचे काम थेट ‘ब्राह्मणे बिल्डर्स अँड सप्लायर्स’ या बांधकाम कंपनीला देण्यात आले आहे. वाहन दुरुस्तीचे काम बिल्डर्सना देण्याचा अजब प्रताप केवळ याच नगरपरिषदेत पाहायला मिळतो, असा टोला त्यांनी लगावला. कचरा डेपोची आग तब्बल ४२ दिवस धुमसत असताना प्रशासनाने त्याची साधी चौकशी करण्याची तसदीही घेतली नाही. कंत्राटांच्या निविदांची प्रसिद्धी यवतमाळात वितरणच नसणाऱ्या वृत्तपत्रांमध्ये करून मर्जीतील लोकांना परस्पर कामे वाटली जात आहेत. राळेगावच्या कंत्राटदारांना सोलर दिवे, दीनदयाल पुतळ्याजवळील गार्डन आणि कुंड्यांचे टेंडर देऊन अत्यंत निकृष्ट दर्जाची कामे रेटली जात आहेत. शहरातील रस्त्यांची अक्षरशः चाळण झाल्यामुळे हजारो नागरिकांना स्पॉन्डिलायटिस आणि मणक्यांच्या गंभीर विकारांनी ग्रासले आहे. रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे दररोज भीषण अपघात होत असून अनेकांचे हात-पाय मोडले आहेत, तर काहींना नाहक जीव गमवावा लागला आहे. या मृत्यूंना थेट पालिका प्रशासन जबाबदार असल्याचा घणाघात त्यांनी केला.
सफाई कामगार, डेटा एन्ट्री ऑपरेटर आणि अग्निशामक दलातील जवानांचे ठेकेदारांमार्फत अमानुष शोषण सुरू आहे. २० हजारांपेक्षा जास्त किमान वेतन असताना कामगारांच्या हातात केवळ १० हजार रुपये टेकवले जातात. अशा शोषक कंत्राटदारांना तात्काळ काळ्या यादीत टाकण्याची मागणी त्यांनी केली. “कामगारांना हक्काचे किमान वेतन आणि थकीत पगार मिळवून दिल्यास दसऱ्याला आपट्याची पाने देण्याऐवजी नगराध्यक्ष, उपाध्यक्ष आणि गटनेत्यांना सोन्याची चेन घालेन,” असे खुले आव्हानच वाघमारे यांनी दिले. विरोधी पक्षाची भूमिका बजावणाऱ्या काँग्रेसवरही त्यांनी ताशेरे ओढले. नगराध्यक्षांच्या दहीहंडी कार्यक्रमात मोदी-फडणवीस यांच्या पोस्टर्सखाली काँग्रेस नगरसेवकांनी हजेरी लावून भाजपशी साटेलोटे केल्याचे उघड झाले आहे. विरोधकच सत्तेच्या मांडीला मांडी लावून बसल्याने जनतेने न्यायासाठी दाद कोणाकडे मागायची, असा संतप्त सवाल त्यांनी केला.(क्रमशः)