🔥मिरवणुकीत वाद्याच्या तालावर थिरकली तरुणाई.🔥मिरवणुकीसह विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन.
सिंदी (रेल्वे) / प्रज्ञासूर्य, विश्वरत्न, कोटी कोटींचे उद्धारकर्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३३ वी जयंती रविवारी शहरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. त्यांच्या अनुयायांसह अनेकांनी त्यांना अभिवादन केले. महिला, पुरुष पांढरे शुभ्र वस्त्र परिधान करून त्यांनी पंचशील बुद्धविहार, चंद्रामनी बुद्धविहार व जेतवन बुद्धविहार येथे डॉ. आंबेडकरांना मानवंदना दिली. जयंतीनिमित्त रॅली व विविध सामाजिक उपक्रमाचे यावेळी आयोजन करण्यात आले होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३३ वी जयंती शहरात विविध सामाजिक घटकांकडून मोठ्या हर्षोल्लासात साजरी करण्यात आली. शहरातील आंबेडकर वार्ड तसेच तीनही वस्त्यांतील बुद्ध विहार सजले होते. प्रत्येक विहारावर रोषणाई करण्यात आली होती. सकाळी सर्वच बुद्ध विहारात त्यांच्या अनुयायांनी त्यांच्या प्रतिमेसमोर माथा टेकवत त्यांना अभिवादन केले. हार, फुले वाहत मेणबत्त्या पेटवून डॉ. बाबासाहेब यांना मानवंदना दिली. या ठिकाणी सामाजिक प्रबोधनपर कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. वक्तत्र्यांची भाषणे, सांस्कृतिक कार्यक्रम आदी उपक्रम राबविले गेले. तसेच लहान मुलांकरिता विविध स्पर्धांचे आयोजन करून विजयी मुलांना पारितोषिके वितरित करण्यात आली.रविवारी सायंकाळी तिन्ही बुद्धविहाराच्या कार्यकर्त्यांनी बसस्थानकावर एकत्रित येऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भव्य दिव्य सवाद्य मिरवणूक काढण्यात आली होती. यावेळी तरुणांनी वाद्याच्या तालावर नाचून जल्लोष साजरा केला. मिरवणुकी दरम्यान तरुणांनी हातात निळे झेंडे फडकत असल्याने निळे वादळ उठल्याचे प्रतीक दिसत होते. यावेळी ‘जय भीम’ च्या जयघोषाने सिंदी शहर दुमदुमले होते. या मिरवणुकी दरम्यान महिलांची उपस्थिती ही लक्षणीय दिसत होती. याप्रसंगी मोठया प्रमाणात आतिषबाजी करण्यात आली. गांधी चौकात मिरवणुकीत सहभागी कार्यकर्त्यांना थंड पाणी व शितपेयाचे वितरण करण्यात आले. यासाठी पुरुषोत्तम व्यास, महेश राऊत, वैभव भोयर यांचे मोलाचे योगदान लाभले. मिरवणुकी दरम्यान काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून ठाणेदार राठोड यांनी पोलिसांचा चोक बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
🔥गांधी चौकात मनमोहक देखाव्याचे आयोजन🔥
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विविध ठिकाणी शहर सजले होते. गांधी चौकात आंबेडकर उत्सव समितीकडून मनमोहक आंबेडकरी देखावा तयार करण्यात आला होता. त्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांचे लक्ष वेधून घेत होते. त्याच मंचावर सर्पमित्र कुमार साठे यांच्या निस्वार्थी कार्याची दखल घेत डॉ. आंबेडकर उत्सव समितीकडून त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ठाणेदार राठोड, घनश्याम मेंढे, रवी राणा, उत्तम वानखेडे, लोहकरे, सचिन मेंढे, यशवंत थुल उपस्थित होते.