वर्धा -/आज जग ज्या दिशेने चालले आहे त्याअनुषंगाने आपण आजही कुठेतरी कमी असल्याची जाणीव माझ्या मनात अनेकदा निर्माण होते. आजही आपला समाज हा त्याच्या मुलभूत गरजांच्या पलीकडे जाऊन विचार करू शकत नाही. परंतू हे चित्र बदलण्याची जबाबदारी समाजाचा घटक म्हणून आपल्यासारख्या सर्वावरच आहे. सशक्त समाज घडविण्यासाठी आज घराघरातील महिलांचे सक्षमीकरण महत्वाचे झाले आहे. सशक्त कुटूंब झाल्याशिवाय समाज सशक्त होऊ शकत नाही. त्यामुळे समाजाच्या जडणघडणीत महिलांची भुमिका अत्यंत महत्वाची आहे असे प्रतिपादन अंबिका सोशल फाऊंडेशनच्या अध्यक्ष अंबिका हिंगमिरे यांनी केले.अंबिका सोशल फाऊंडेशनच्या वतीने बोरगाव मेघे परिसरातील गणेशनगर मैदानावर महिलांसाठी विशेष हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून विदर्भातील प्रथम तृतीयपंथी विधीज्ञ शिवानी सुरकार यांच्यासह फाऊंडेशनच्या कांचन सुखदेवे, ॲड.शिवानी सुरकार, प्रीती कुंड, सीमा कोटनाके, रुपाली केळजळकर, अरुणा इरपाते, माया कतरकर, रुपाली केचे, भाग्यश्री बोन्टरे, धमशीला मुन, शुभांगी भाले यांच्यासह विविध क्षेत्रात कार्यरत अनेक भगिनी उपस्थित होत्या. या कार्यक्रमाला बोरगाव मेघे परिसरातील २ हजारांवर महिलांची भरगच्च उपस्थिती दिसून आली.
यावेळी बोलताना अंबिका हिंगमिरे यांनी सांगितले की, समाजात निराधार तसेच विधवा महिलांकडे बघण्याचा दृष्टीकोण बदलण्याची वेळ आली आहे. समाजात विधवांनाही आपल्या उत्सवांमध्ये तेवढ्याच सन्मानाने सहभागी करून घेत त्यांनाही संपूर्णपणे सामान्य व आनंदी जीवन जगण्याचा अधिकार आपण मिळवून दिला पाहिजे. स्त्रीयांनी एकमेकांना आधार द्यायला देखील शिकले पाहिजे. समाजात अंबिका सोशल फाऊंडेशनसारख्या अनेक संस्था कार्यरत आहेत. परंतू त्यांचे कार्य पुरेसे नाही. प्रत्येकाला मर्यादा आहेत. त्यामुळे महिलांनी आपली जात, पंथ, धर्म विसरून त्यांच्या सानिध्यातील निराधार महिलांना सहकार्य केले पाहिजे. समाज हा एकमेकांना सहकार्य करण्याच्या भावनेवरच अधिक मजबूत होत असतो. त्यामुळे आपण सर्वांनी आपल्या कार्यात एकसुत्रता आणून महिलांना मजबूती देण्याचे कार्य केले पाहिजे अशा शब्दात अंबिका हिंगमिरे यांनी महिलांना आवाहन केले.
यावेळी समस्त महिलांचे हळदी कुंकू करत त्यांना तिळगुळ तसेच वाण देऊन त्यांचा सन्मान फाऊंडेशनच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी अनेक महिलांनी आपल्या अडचणी अंबिका हिंगमिरे यांच्याशी बोलताना व्यक्त केल्या. यावेळी आपण प्रत्येक भगिनीसाठी कोणत्याही वेळी मदतीसाठी तत्पर असल्याची भावना व विश्वास अंबिका हिंगमिरे यांनी भगिनींना दिला. या कार्यक्रमाला बोरगाव मेघे परिसरातील २ हजारांवर महिलांची भरगच्च उपस्थिती दिसून आली. हा कार्यक्रम बोरगाव मेघे परिसरातील २ हजारांवर महिलांची भरगच्च उपस्थितीसह अतिशय दिमाखदार पद्धतीने साजरा करण्यात आला.
🔥विधवा भगिनींचाही झाला सन्मान.
जुनाट रूढी परंपरांना छेद देत अंबिका सोशल फाऊंडेशनने हळदी कुंकू उत्सवाच्या माध्यमातून समाजातील विधवा, निराश्रीत तसेच निराधार महिलांना देखील सन्मान देण्याच्या अनुषंगाने हळदी कुंकू उत्सवात त्यांना सहभागी करून घेत त्यांचा विशेष सन्मान अतिथींच्या हस्ते केला. यावेळी अनेक भगिनींच्या डोळ्यात अश्रू देखील आलेत. फाऊंडेशनकडून समाजातील वंचित घटकांची होत असलेली ही सेवा निराळी व समाजाचे चित्र बदलून टाकणारी आहे अशी प्रतिक्रिया यावेळी भगिनींच्या ओठावर उमटली.