🔥आमदार सुमित वानखेडे यांच्या प्रयत्नांना यश; ६ कोटींचा निधी मंजूर.
आर्वी -/विधानसभा मतदारसंघातील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले प्रश्न आता मार्गी लागत असून, विकासाचे एक नवे पर्व सुरू झाले असल्याचे चित्र दिसत आहे. आमदार सुमित वानखेडे यांच्या विशेष प्रयत्नातून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नाबार्ड योजनेअंतर्गत आर्वी तालुक्यातील सावद-हेटी आणि वाई (रोहणा) येथील दोन महत्त्वाच्या पुलांच्या कामांसाठी ६ कोटी रुपयांचा भरीव निधी मंजूर झाला आहे. यामुळे या भागातील दळणवळणाचा मोठा प्रश्न कायमचा सुटणार आहे.
सावद-हेटी आणि वाई परिसरातील नागरिकांना पावसाळ्यात किंवा दैनंदिन प्रवासासाठी मोठा त्रास सहन करावा लागत होता. या पुलांची मागणी अनेक वर्षांपासून रखडलेली होती. मात्र, आमदार सुमित वानखेडे यांनी पदभार स्वीकारल्यापासून मतदारसंघातील अशा मूलभूत सोयींकडे विशेष लक्ष केंद्रित केले आहे. त्यांनी सातत्याने पाठपुरावा केल्यामुळेच राज्य शासनाने या कामांना तातडीने प्रशासकीय मंजुरी देऊन निधी उपलब्ध करून दिला आहे.
आमदार वानखेडे यांच्या कार्यशैलीमुळे मतदारसंघात ‘कधी नव्हे ती कामे’ होताना दिसत आहेत. केवळ घोषणा न करता प्रत्यक्ष निधी खेचून आणण्यावर त्यांचा भर असल्याने जनतेमध्ये त्यांच्याबद्दल विश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे. या पुलांच्या कामामुळे शेतकरी, विद्यार्थी मोठी सोय होणार असून, परिसराच्या आर्थिक विकासालाही यामुळे चालना मिळणार आहे.
हा निधी मंजूर झाल्याबद्दल आमदार सुमित वानखेडे यांनी भाजप-महायुती सरकारचे आणि मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत. मतदारसंघातील प्रत्येक गाव आणि वाडी-वस्ती मुख्य प्रवाहाशी जोडण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. दरम्यान, या निर्णयामुळे परिसरातील ग्रामस्थांनी आनंद व्यक्त करत आमदार वानखेडे यांच्या कार्यतत्परतेचे कौतुक केले आहे.