बळीराजा शेतकरी गटाची उत्तुंग भरारी,सत्यमेव जयते फार्मर कप 2026 स्पर्धेत समृद्धीच्या शिडीची पहिली पायरी गाठली

0

🔥बळीराजा शेतकरी गटाची उत्तुंग भरारी,सत्यमेव जयते फार्मर कप 2026 स्पर्धेत समृद्धीच्या शिडीची पहिली पायरी गाठली.

वर्धा -/ पाणी फाउंडेशन आणि कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या सत्यमेव जयते फार्मर कप 2026 या स्पर्धेत सहभागी झालेल्या बळीराजा शेतकरी गट, पिंपळनेर यांनी समृद्ध शेतीच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल टाकत समृद्धीच्या शिडीची पहिली पायरी यशस्वीपणे पूर्ण केली आहे. या उपक्रमांतर्गत शेतकऱ्यांनी नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी आणि शेतीमधील फवारणीचा खर्च कमी करण्यासाठी दशपर्णी अर्क तयार करण्याची प्रक्रिया पूर्ण केली.

स्पर्धेतील पहिल्या टप्प्याचा भाग म्हणून आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमात शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. रासायनिक कीटकनाशकांवरील अवलंबित्व कमी करून कमी खर्चात प्रभावी कीड व्यवस्थापन साध्य करण्याच्या उद्देशाने दशपर्णी अर्क तयार करण्यात आला. विविध औषधी वनस्पतींच्या पानांपासून बनविण्यात येणारा हा अर्क शेतीसाठी अत्यंत उपयुक्त मानला जातो.

यावेळी मार्गदर्शक म्हणून :- मा बळवंते सर,( कृषी अधिकारी) मा गव्हळे सर , मा उबरकर सर (पाणी टीम समन्वयक ) मा शेळके सर (उमेद समन्वयक ) व गटाचे निमंत्रक वैभव गायकी यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण प्रक्रिया पार पडली. या उपक्रमात दत्ता मोरे, प्रवीण ढोले, निलेश ढोले, विजय इंगळे, अजय खडसे, आशिष गायकी, मनोज ढोले, दिनेश भोयर सतीश गावंडे, गुरुदास आडे, संतोष मोरे आणि कैलास राठोड या शेतकऱ्यांनी सक्रिय सहभाग घेतला.

उपस्थित शेतकऱ्यांनी नैसर्गिक शेतीच्या माध्यमातून उत्पादन खर्चात बचत करण्याबरोबरच जमिनीचे आरोग्य जपण्याचा निर्धार व्यक्त केला. स्पर्धेच्या पुढील टप्प्यांमध्येही अशाच नाविन्यपूर्ण आणि शाश्वत शेती पद्धतींचा अवलंब करून गट उत्कृष्ट कामगिरी करेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

सत्यमेव जयते फार्मर कप 2026 स्पर्धेमुळे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांमध्ये सामूहिक कार्य, जलसंधारण, नैसर्गिक शेती आणि आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा प्रसार होत असून, बळीराजा शेतकरी गटाने त्याची दमदार सुरुवात केल्याचे दिसून येत आहे. शेतकऱ्यांच्या या प्रयत्नांमुळे परिसरात नैसर्गिक आणि शाश्वत शेतीची चळवळ अधिक बळकट होण्यास मदत होणार आहे.

        ब्युरो रिपोर्ट साहसिक      News-/24 वर्धा 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!