राणीधानोरा रेती घाटावर तस्करांचा तांडव; महसूल विभागाच्या आशीर्वादाने पैनगंगेचे पात्र ओरबडले!

0

🔥राणीधानोरा रेती घाटावर तस्करांचा तांडव; महसूल विभागाच्या आशीर्वादाने पैनगंगेचे पात्र ओरबडले!

​यवतमाळ -/ तालुक्यातील राणीधानोरा येथील पैनगंगा नदीच्या पात्रातून सध्या मोठ्या प्रमाणावर रेतीचा अवैध उपसा सुरू असून, रेती तस्करांनी अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वीच लिलाव झालेल्या या घाटावर नियमांची पायमल्ली करत ‘अजस्त्र’ यंत्रांच्या सहाय्याने रात्रंदिवस उपसा केला जात आहे. याकडे महसूल विभागाचे मंडळ अधिकारी आणि तहसील प्रशासनाने सोयीस्कर दुर्लक्ष केल्याने, ‘कुंपणच शेत खात असल्याचा’ प्रकार समोर येत आहे.
​नदी पात्रातून रेती काढताना केवळ मानवी मजुरांचा वापर करण्याचे संकेत असताना, राणीधानोरा घाटावर मात्र मोठी पोकलेन आणि जेसीबी सारखी अजस्त्र वाहने उतरवण्यात आली आहेत. या यंत्रांमुळे नदीचे नैसर्गिक पात्र पूर्णतः विस्कळीत होत असून पर्यावरणाची मोठी हानी होत आहे. रात्रभर हा उपसा सुरू असतो आणि सकाळपर्यंत नदीकाठावर रेतीचे डोंगर उभे केले जातात.
​​रेती चोरीची व्याप्ती इतकी वाढली आहे की, तस्करांनी आता सार्वजनिक जागांवरही अतिक्रमण केले आहे. नदीकाठावरील पांदण रस्त्यांवर रेतीचे मोठमोठे ढिगारे लावून रस्ते अडवण्यात आले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, राणीधानोरा येथील स्मशानभूमीच्या परिसरातही मोठ्या प्रमाणात रेतीचे साठे करण्यात आले आहेत. पावित्र्य राखण्याच्या ठिकाणीही तस्करांनी आपली मिरासदारी सुरू केल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. ​विना रॉयल्टी वाहतूक आणि सरकारला चुना ​लिलाव झाला असला तरी, काढल्या जाणाऱ्या रेतीच्या तुलनेत रॉयल्टी फाडली जात नाही. एका रॉयल्टीवर अनेक फेऱ्या मारणे किंवा पूर्णपणे विना रॉयल्टी रेतीची वाहतूक करणे हा प्रकार सर्रास सुरू आहे. यामुळे शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडत आहे. यवतमाळ शहरात सध्या बांधकामांचे पेव फुटले असून रेतीची मागणी प्रचंड वाढली आहे. याच संधीचा फायदा घेत तस्कर चढ्या दराने रेतीची विक्री करून मालामाल होत आहेत.
​​या संपूर्ण प्रकरणातील सर्वात धक्कादायक पैलू म्हणजे महसूल विभागाची भूमिका. अंजनखेड येथील मंडळ अधिकारी डोल्हारकर आणि लोनबेहळ येथील मंडळ अधिकारी वांझाळ हे या अवैध उपशाला मूकसंमती देत असल्याचा आरोप होत आहे. हे अधिकारी कारवाई करण्याऐवजी केवळ ‘वसुली’ करण्यात मग्न असून, त्यातून ते ‘गब्बर’ झाल्याची चर्चा परिसरात रंगली आहे.
​केवळ खालचे अधिकारीच नव्हे, तर तहसीलदार आणि नायब तहसीलदार यांच्या नाकाखाली हा प्रकार राजरोसपणे सुरू आहे. रात्रंदिवस ओव्हरलोड ट्रक आणि ट्रॅक्टर या घाटावरून धावत असतानाही तहसील प्रशासनाने अद्याप एकही मोठी कारवाई का केली नाही? हा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. अधिकाऱ्यांच्या या ‘अर्थपूर्ण’ डोळेझाकपणा मुळेच तस्करांचे धाडस वाढले आहे. ​नदीपात्राचे होत असलेले नुकसान आणि जड वाहनांमुळे रस्त्यांची झालेली दुरवस्था यामुळे राणीधानोरा परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहेत. जर प्रशासनाने तात्काळ अजस्त्र वाहनांचा उपसा थांबवला नाही आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई केली नाही, तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा परिसरातील नागरिकांनी दिला आहे.

🔥​मुख्य मुद्दे:
​अजस्त्र यंत्रांचा वापर करून नदी पात्राचे नुकसान.
​स्मशानभूमी आणि पांदण रस्त्यांवर अवैध रेती साठे.
​महसूल प्रशासनातील मंडळ अधिकाऱ्यांचा भ्रष्ट कारभार.
​यवतमाळमधील वाढत्या मागणीमुळे तस्करांचे चांदी.
​जिल्हाधिकाऱ्यांनी या गंभीर प्रकरणाची दखल घेऊन राणीधानोरा घाटाची विशेष पथकाद्वारे चौकशी करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

ब्युरो रिपोर्ट साहसिक Newd-/24 यवतमाळ-वर्धा 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!