🔥प्रतीपंढरीत वैष्णवांची मांदियाळी; डोळ्यांचे पारणे फेडणारा रिंगण सोहळा.! 🔥संत केजाजी महाराज पुण्यतिथी महोत्सव; महाराजांच्या जयघोषाने दुमदुमली घोराड नगरी.
सेलू -/ विदर्भाची प्रतीपंढरी श्रीक्षेत्र घोराड येथे श्री संत केजाजी महाराजांच्या 119 व्या पुण्यतिथी उत्सवानिमित्त आज सोमवारी भव्यदिव्य असा पालखी व दिंडी सोहळा पार पडला. याप्रसंगी विविध गावांतील 320 च्यावर भजनी मंडळीसह भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाल्याने घोराड नगरीत भक्तांचा जनसागर उसळला. संतनगरीत भक्तिमय वातावरण निर्माण झाले, जणू काही भक्तीचा मळा फुलल्याचे चित्र यावेळी पाहायला मिळाले.
या पालखी व दिंडी सोहळ्यात टाळ व मृदगांच्या तालावर ठेका धरणारे वारकरी आणि हरिनामाचा गजर करीत संत केजाजी महाराजांच्या जयघोषाने घोराड नगरी अक्षरशः दुमदुमली होती.
येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरातून सकाळी अकरा वाजता पालखी निघाली. यावेळी मुख्य प्रवेशद्वारावर रथाचे पुजन ज्ञानेश्वर महाराज भादंककर तथा अभ्युदय मेघे यांच्या हस्ते पार पडले. यात विविध मंडळानी तयार केलेले आकर्षक रथ, दाखल झालेले अश्व, बँडपथक, आणि भजनी मंडळाचा सहभाग असलेला हा दिंडी सोहळा हरिनामाचा जयघोष करीत मुख्य मंदिराला प्रदक्षिणा घालत संत नामदेव महाराज समाधी स्थळावर पोहचल्यावर अश्वाचा रिंगण सोहळा पार पडला. यावेळी हातात भगव्या पताका घेत धावणारे वारकरी, विणेकरी, पखवाज वादक, डोक्यावर तुळसी वृंदावन, पारायण गाथा घेऊन धावा करीत सहभागी झालेल्या महिला आणि हरीपाठ मंडळाचे वतीने मानवी साखळीद्वारे उंच मनोरा करीत वाजविला जाणारा पखवाज हे सगळे क्षण डोळ्यांचे पारणे फेडणारे ठरलेत. या अविस्मरणीय सोहळ्याचा क्षण प्रत्यक्ष पाहण्यासाठी मैदानावर भाविकांची, महिलांची मोठी गर्दी उसळली होती. या पालखी सोहळ्यानिमित्त गावातील रस्त्यावर महिलांनी रांगोळ्या काढून रस्त्याची सजावट करण्यात आली होती. ठिकठिकाणी स्वागत कमानी उभारण्यात आल्या होत्या. पालखी गावातील प्रमुख मार्गाने जात असताना ठिकठिकाणी पालखीचे स्वागत करण्यात आले. यात सहभागी भाविकांच्या सोयीसाठी ठिकठिकाणी अल्पोपहार, चहा-पाण्याची व्यवस्था ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली होती. मुख्य मार्गाने दिंडी पालखी ग्रामपंचायत मार्गे मुख्य मंदिराजवळ येताच या दिंडी सोहळ्याची सांगता होणार आहे. त्यानंतर बाहेगावातील भाविकांना महाप्रसादाचे वितरण करण्यात येणार आहे.