समृद्धी महामार्गावर भीषण अपघात,सालोडच्या चौघांसह यूपीच्या ट्रक चालक व वाहकाचा मृत्यू.

0

🔥सुषमा, जानवी आणि राजेश टिपले

🔥अंकुश लक्ष्मणराव राऊत (वय 33 वर्ष)

🔥समृद्धी महामार्गावर भीषण अपघात,सालोडच्या चौघांसह यूपीच्या ट्रक चालक व वाहकाचा मृत्यू

वर्धा -/ वर्धा जिल्ह्यातील पुलगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत समृद्धी महामार्गावर सोमवारी २० जुलै पहाटे भीषण अपघात होऊन सहा जणांचा जागीच मृत्यू झाला. विरुळ शिवारातील समृद्धी महामार्गाच्या चॅनेज क्रमांक ७९/८० येथे हा हृदयद्रावक अपघात घडला. अपघातानंतर आयसर ट्रकला आग लागल्याने घटनास्थळी एकच खळबळ उडाली.
प्राथमिक माहितीनुसार, समृद्धी महामार्गावर इथेनॉलने भरलेला एक ट्रक पलटी झाल्याने वाहतूक व्यवस्था बदलण्यात आली होती. त्यामुळे मुंबई कॉरिडॉरवरील वाहतूक सुरू असताना नागपूर कॉरिडॉरवरील काही वाहने थांबविण्यात आली होती. याचदरम्यान उत्तर प्रदेश क्रमांक युपी ७१ सी टी ०६०२ या आयसर ट्रकचा चालक संजय कुमार याने भरधाव व निष्काळजीपणे वाहन चालवत समोर उभ्या असलेल्या एम एच ३२ वाय १४३९ क्रमांकाच्या कारला मागून जोरदार धडक दिली.
धडक इतकी भीषण होती की कारचा अक्षरशः चुराडा झाला. त्याचवेळी आयसर ट्रकने पेट घेतला. अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली. मात्र ट्रकमधील वाहक समरजित पाल (२४) हा आगीत पूर्णपणे जळून मृत्युमुखी पडला.
या अपघातात ट्रक चालक संजय कुमार (३०), वाहक समरजित पाल (२४) (दोघेही उत्तर प्रदेश) तसेच कारमधील जानवी राजेश टिपले (२१), सुषमा राजेश टिपले(43) राजेश आनंदराव टिपले(48) आणि अंकुश लक्ष्मण राऊत (33) सर्व रा. सालोड हिरापूर, जि. वर्धा यांचा जागीच मृत्यू झाला. मृतांचे मृतदेह महामार्गावरील रुग्णवाहिकेच्या साहाय्याने जिल्हा रुग्णालय, वर्धा येथे शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले.
घटनेची माहिती मिळताच पुलगाव उपविभागीय पोलीस अधिकारी संगीता कारखेले, एपीआय सरिता यादव, पीएसआय तोडासे तसेच पुलगाव पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी वाहतूक सुरळीत करण्यासाठी तातडीने उपाययोजना करत पंचनामा व पुढील कायदेशीर कारवाई सुरू केली आहे.
या भीषण अपघातामुळे समृद्धी महामार्गावर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलिसांनी अपघाताचे नेमके कारण आणि इतर बाबींचा तपास सुरू केला असून सविस्तर अहवाल वरिष्ठांकडे पाठविण्याची प्रक्रिया सुरू आहे.
राजेश टिपले यांच्या घरी चार लोक होते. पुणे येथे लहान मुलगी तन्वी हिचा एम. एस. सी. ला प्रवेश घेतला होता. तीला सोडून द्यायला संपूर्ण कुटुंबासहित गेले होते. परत येताना हा अपघात झाला.अंकुश हा ऑटो व फोरव्हीलर चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा. त्याच्या मागे पत्नी, 1 वर्षाची छोटी मुलगी, आई – वडील, भाऊ असा आप्तपरिवार आहे.गावात संपूर्ण शोककळा पसरली असून दुःखद वातावरण निर्माण झाले आहेत. मजूर वर्ग घरीच थांबला आहेत.

          ब्युरो रिपोर्ट साहसिक      News-/24 वर्धा 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!