यवतमाळ,-/गुन्हेगारांवर वचक ठेवण्यासाठी आणि जिल्ह्यातील गुन्हेगारीचा बिमोड करण्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण मानली जाणारी ‘स्थानिक गुन्हे शाखा’ (एलसीबी) सध्या गुन्हेगारांना उघड-उघड अभय देत असल्याचे अत्यंत विदारक आणि धक्कादायक चित्र यवतमाळ जिल्ह्यात पाहावयास मिळत आहे. कायदा आणि सुव्यवस्थेचे रक्षकच जेव्हा भक्षकांच्या भूमिकेत वावरू लागतात, तेव्हा खाकीवरील जनतेचा विश्वास कसा उडतो, याचे ज्वलंत उदाहरण यवतमाळच्या पोलीस दलाने समोर आणले आहे. गुन्हेगारांना गजाआड पाठवण्याची जबाबदारी असलेल्या या शाखेने सध्या केवळ आणि केवळ ‘वसुली’ हाच आपला एकमेव अजेंडा बनवला असून, महिन्याकाठी मिळणाऱ्या कोट्यवधी रुपयांच्या रसदमुळे एलसीबीची खऱ्या अर्थाने पोलीसिंग संपल्याचे स्पष्ट दिसत आहे.
जिल्ह्यातील पोलीस दलाच्या नाकावर टिच्चून गुन्हेगारीचे नेटवर्क चालवले जात आहे. अत्यंत गंभीर गुन्ह्यांमध्ये अडकलेला आणि ‘मोक्का’ सारखा कडक कायदा लागलेला कुख्यात आरोपी कुमार ओछाणी याच्यासोबत एलसीबीच्या पोलीस निरीक्षक सतीष चवरेने (पीआय) तब्बल १२ लाख रुपयांची ‘डील’ करून त्याला कायदेशीर कारवाईपासून पूर्ण संरक्षण दिल्याचा अत्यंत खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. कायद्याची भीती दाखवून गुन्हेगारांना जेलमध्ये सडवण्याऐवजी, त्यांच्याकडून लाखो रुपयांची लाच घेऊन त्यांना मोकळे सोडण्याचे पाप गुन्हे शाखेचे प्रमुख स्वतः करत आहेत. मोक्कासारख्या कायद्यातील आरोपीला खाकीचे कवच लाभत असेल, तर सर्वसामान्यांनी न्याय मागायचा कुणाकडे, असा संतप्त सवाल आता उपस्थित होत आहे. यवतमाळ जिल्ह्यात गुटखा बंदी केवळ कागदावरच उरली आहे. प्रकाश गोविदाणी सारखे गुटखा माफियांचे मोठे सरदार जिल्ह्यात खुलेआम आपले काळे साम्राज्य चालवत आहेत आणि दुर्दैवाने पोलीसही याच माफियांच्या खेम्यात सामील झाले आहेत. अमरावतीचा कुख्यात जावेद सुपारीवाला आणि अमित कल्याण यांचे गुटख्याचे जाळे आता संपूर्ण जिल्हाभर पसरले आहे.
या भ्रष्टाचाराचा कळस म्हणजे, दोन दिवसांपूर्वी स्थानिक गुन्हे शाखेच्या एका खास कर्मचाऱ्याने थेट एलसीबी प्रमुख सतीश चवरे यांना पूर्णपणे विश्वासात घेऊन अकोला बाजार येथे गुटख्याचा अख्खा कंटेनर पोलिसांच्या संरक्षणात उतरवला! या काळ्या धंद्यात आर्णीचा महेबूब तसेच यवतमाळ शहरातील गुटखा तस्करांची संपूर्ण टोळी सक्रिय सहभागी होती. कायद्याचे रक्षकच जेव्हा रात्रीच्या अंधारात तस्करांचे मालवाहू कंटेनर रिकामे करायला मदत करतात, तेव्हा या विभागाची खाकी वर्दी लाचेच्या चिखलात किती माखली आहे, हे वेगळे सांगण्याची गरज उरत नाही.
गुटखा तस्करीसोबतच यवतमाळ जिल्ह्यात हायप्रोफाईल जुगार क्लबांचा सुळसुळाट झाला आहे. यवतमाळ शहरात चक्क एका नामांकित खाजगी इंग्रजी शाळेच्या अगदी समोरच ‘गब्बर’ नावाच्या बुकीने आपला हायप्रोफाईल जुगार अड्डा थाटला आहे. शाळकरी मुलांच्या डोळ्यांदेखत आणि भविष्याशी खेळ करत हा जुगार सुरू आहे. याशिवाय, शिवा आणि भांबराजा टोलनाक्याजवळ प्रवीण उईके याचाही खुलेआम हायप्रोफाईल जुगार अड्डा सुरू असून, तिथे रोज लाखो रुपयांची उलाढाल होत आहे. जोडमोहा येथे हाफीजने आपला डेरा टाकून जुगाराचे मोठे जाळे निर्माण केले आहे. तसेच वाई येथे सुदधा मोठा क्लब सुरू आहे.
केवळ यवतमाळ शहरच नव्हे, तर उमरखेड, महागाव, ढाणकी, बिटरगाव, दिग्रस, वणी, पांढरकवडा आणि पाटणबोरी यासारख्या प्रमुख शहरांमध्ये आणि ग्रामीण भागातसुद्धा एलसीबीच्या थेट ‘लिखित-अलिखित’ परवानगीने खुलेआम जुगार अड्डे सुरू करण्यात आले आहेत. एलसीबीचे पोलीस निरीक्षक सतीश चवरे यांनी या गुटखा तस्करांना आणि हायप्रोफाईल जुगार क्लब चालकांना थेट अभय दिल्याने, या अड्ड्यांवर रात्रभर जुगाऱ्यांची मोठी जत्रा भरलेली असते. शांतताप्रिय यवतमाळ जिल्हा आता गुन्हेगार आणि जुगाऱ्यांचे नंदनवन बनत चालले आहे.
अशा प्रकारे संपूर्ण जिल्ह्याला गुन्हेगारीच्या गर्तेत लोटणारे एलसीबीचे पोलीस निरीक्षक सतीश चवरे यांना मोठ्या नेत्यांचा आणि मंत्र्यांचा राजकीय वरदहस्त लाभल्याची जोरदार चर्चा आहे. याच राजकीय पाठबळाच्या मस्तीत आणि अहंकारात ते नेहमी खाजगीत बोलताना दिसतात की, “माझा वरपर्यंत हात आहे, माझे कुणीही वाकडं करू शकत नाही!” पोलीस अधिकाऱ्याची ही भाषा आणि वर्तन खाकी वर्दीला काळिमा फासणारे आहे. राजकीय आशीर्वादाच्या जोरावर जिल्ह्याला लुटण्याचा परवानाच जणू या अधिकाऱ्याला मिळाला आहे. गुटखा आणि जुगार क्लबांमधून दरमहा मिळणाऱ्या कोट्यवधी रुपयांच्या वसुलीमुळे स्थानिक गुन्हे शाखेचे मूळ कर्तव्य, म्हणजे गुन्हेगारी नियंत्रण, पूर्णपणे इतिहासजमा झाले आहे.
जिल्ह्यात इतके मोठे काळेबेरे सुरू असताना आणि पोलिसांची गुन्हेगारांसोबतची युती चव्हाट्यावर आलेली असताना, यवतमाळचे जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता हे मात्र “आपल्याला काहीच माहीत नाही” अशा अविर्भावात वावरत आहेत. संपूर्ण जिल्हा पोलीस दलाचे प्रमुख असूनही, त्यांच्याच हाताखालील एलसीबी शाखा जिल्ह्याला पोखरत असताना एसपी मूग गिळून का गप्प आहेत? हा अज्ञानाचा आव आहे की जाणीवपूर्वक केलेले दुर्लक्ष? या प्रश्नांमुळे आता थेट पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांच्याही कार्यप्रणालीवर आणि प्रामाणिकतेवर संशयाची मोठी सुई निर्माण झाली आहे. आपल्याच विभागातील भ्रष्टाचारावर नियंत्रण मिळवता येत नसेल, तर पोलीस अधीक्षकांच्या पदाचा दरारा तो काय राहिला, असा टोकदार प्रश्न जनता विचारत आहे.
एकंदरीत पाहता, यवतमाळ जिल्ह्यातील अत्यंत महत्त्वाची, संवेदनशील आणि वजनदार मानली जाणारी ‘स्थानिक गुन्हे शाखा’ सध्या केवळ आणि केवळ वसुली एजंट म्हणून व्यस्त असल्याचे विदारक चित्र आहे. गुन्हेगारांना कायद्याचा धाक दाखवण्याऐवजी, सामान्य जनतेलाच पोलिसांचा धाक वाटू लागला आहे. जर या खाकीच्या नावाखाली चालणाऱ्या संघटित गुन्हेगारीवर आणि एलसीबीच्या ‘वसुली सत्रावर’ गृहविभागाने तत्काळ कठोर नियंत्रण आणले नाही आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली नाही, तर यवतमाळ जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था पूर्णपणे कोलमडून पडेल. मुख्यमंत्र्यांनी आणि गृहविभागाने या प्रकरणात तातडीने हस्तक्षेप करून यवतमाळला या खाकी वर्दीतील आणि गुन्हेगारी जगतातील युतीपासून मुक्त करावे, हीच आता यवतमाळकरांची एकमेव मागणी आहे.(क्रमशः)