सेलू -/ सेलू–वडगांव–झडशी रस्त्याच्या प्रस्तावित सिमेंटीकरणाच्या कामातून निघालेल्या सरकारी मातीवर काही मंडळींची वाकडी नजर पडल्याचे उघडकीस आले असून, या प्रकरणात आता माती चोरणाऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार लटकू लागली आहे.या गंभीर प्रकरणाची दखल घेत महसूल विभागाने मोक्का चौकशी पंचनामा करत कारवाईच्या दिशेने पावले टाकली आहेत.
रस्ता खोदकामातून निघणारी सरकारी माती नियमाने शासनाची असते. मात्र, याच मातीचा राजरोस काळाबाजार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांनी या मातीचा बाजार मांडत प्रति ट्रक तीन हजार रुपयांत विक्री केल्याचा आरोप आहे.
विशेष म्हणजे भाजप तालुका अध्यक्ष प्रफुल्ल खोडे व संजय गांधी निराधार योजनेचे माजी अध्यक्ष हरीश पारसे यांनी सरकारी माती विक्रीचा गोरखधंदा सुरू केल्याची जोरदार चर्चा संपूर्ण तालुक्यात रंगली आहे. यावरूनच भाजप कार्यालयात काही पदाधिकाऱ्यांच्यात खडाजंगी देखील झाल्याचे बोलल्या जाते. त्यावेळी संजय गांधी निराधार समितीच्या माजी अध्यक्ष महोदयांची चक्क बिना पाण्याने हजामत केल्याचे सर्वश्रुत आहे.
ज्यांच्या शेतात ही सरकारी माती टाकण्यात आली, त्या शेतकऱ्यांनी मात्र बांधकाम कंपनीनेच माती डंप केल्याचा दावा करत हात झटकण्याचा केविलवाणा प्रयत्न केला. मात्र रस्ता बांधकाम कंपनीचे सुपरवायझर प्रविण ढोले यांनीच प्रति ट्रक तीन हजार रुपयांत माती विकल्याची स्पष्ट कबुली दिल्याने हे प्रकरण अधिकच गंभीर बनले आहे.
या संदर्भातील वृत्त प्रसार माध्यमांत झळकताच महसूल विभाग खडबडून जागा झाला. काल, मंगळवार(ता.१३) रोजी सेलूचे मंडळ अधिकारी रमेश भोले, झडशीचे मंडळ अधिकारी कुटे, वडगांव आणि बेलगांवचे साझाचे तलाठी वैभव घोडके, सेलू साझाचे तलाठी कार्तिक भट यांनी घटनास्थळी जात मोक्का चौकशी पंचनामा केला.
यासंदर्भात बोलताना तलाठी वैभव घोडके यांनी सांगितले की, याविषयी लवकरच कर्तव्यदक्ष आणि कार्यतत्पर अशी ओळख असलेल्या तहसीलदार मॅडम यांच्याकडे सविस्तर चौकशी अहवाल सादर केला जाणार असून, सरकारी माती चोरणाऱ्यांवर कारवाई अटळ आहे.
🔥 शासनाची मालमत्ता लुटण्याचा हा प्रकार थांबवला जाणार का, की राजकीय वरदहस्तामुळे पुन्हा ‘मातीखालचा व्यवहार’ दडपला जाणार? याकडे आता संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.