सेलू -/ स्मार्ट मीटरमुळे वाढत असलेल्या वीज बिलांच्या विरोधात तसेच ग्राहकांच्या विविध मागण्यांसाठी तालुक्यातील नागरिकांच्या वतीने २ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता धडक मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. हा मोर्चा सेलू बसस्थानकापासून सुरू होऊन महावितरणच्या कार्यालयावर धडकणार आहे.
साहसिक जनशक्ती संघटनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या मोर्चाचे नेतृत्व संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रवींद्र कोटंबकर करणार आहेत. स्मार्ट मीटर बंद करून पूर्वीचे जुने मीटर पुन्हा बसवावेत, वाढीव वीज बिलांबाबत योग्य ती कार्यवाही करावी, ग्राहकांवरील अन्याय तात्काळ थांबवावा तसेच वीज बिल निर्धारणाची प्रक्रिया पारदर्शक व न्याय्य करावी, अशा प्रमुख मागण्या आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात येणार आहेत.
स्मार्ट मीटर बसविल्यानंतर वीज बिलांमध्ये वाढ होत असल्याची तक्रार अनेक ग्राहकांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये असंतोषाचे वातावरण असून, या प्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी मोर्चाचे आयोजन करण्यात आल्याचे आयोजकांनी सांगितले.
“स्मार्ट मीटर बंद करा, जुने मीटर सुरू करा” या प्रमुख घोषणेसह नागरिकांनी मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी व्हावे, असे आवाहन साहसिक जनशक्ती संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे. वाढीव वीज बिलांच्या विरोधात एकजुटीने आवाज उठविण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.