क्रीडा विज्ञान व क्रीडा व्यवस्थापनातील पदवी व पदव्युत्तर पदवी यांना विद्यापीठ अनुदान आयोगाची मान्यता
प्रतिनिधी / वर्धा :
भारतातील तरुणांसाठी मान्यताप्राप्त पदवीला पर्याय म्हणून क्रीडा विज्ञान व क्रीडा व्यवस्थापन या विषयामध्ये पदवी आणि पदव्युत्तर या अभ्यासक्रमाचा समावेश करण्याचा महत्वपूर्ण निर्णय विद्यापीठ अनुदान मंडळाने (युजीसी) घेतला, त्याचे स्वागत आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ पुणे या संस्थेद्वारा राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांनी केले.
याबाबत आयोजित पत्रकार परिषदेत क्रीडा मंत्री सुनील केदार, क्रीडा विभागाचे सचिव ओमप्रकाश बकोरिया, माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू निलेश कुलकर्णी उपस्थित होते. हे मान्यताप्राप्त अभ्यासक्रम सादर करून भारतात एक संघटित व संरचित स्पोर्ट-एड क्षेत्र निर्माण करण्यात अग्रेसर ठरलेले महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या दूरदृष्टीतून आणि राज्याचे क्रीडा मंत्री सुनील केदार यांच्या पुढाकारातून साकार झालेले आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ, महाराष्ट्र हे राज्य सरकारच्या अथक परिश्रमाचे फळ आहे. राज्यातील क्रीडा शिक्षणाच्या विविध घटकांना योग्य ती मान्यता मिळविण्यासाठी मंत्री सुनील केदार यांनी युजीसीच्या अधिकाऱ्यांसोबत सतत मागोवा व माहिती घेत क्रीडा विद्यापीठ अभ्यासक्रम साकारले.
आपल्या वक्तव्यात मंत्री सुनील केदार यांनी सांगितले की, “विविध क्रीडा प्रकारातील विज्ञान व व्यवस्थापन यात कुशल मनुष्यबळ निर्माण करण्याच्या उद्दिष्ठाने आपल्याकडे यापूर्वी क्रीडा शिक्षणामध्ये नवकल्पना आणि परिवर्तन घडवून आणण्याचे एकमेव धोरण होते. आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ स्थापन झाल्याने आता तंत्रज्ञान, व्यवस्थापण, क्रीडा प्रशासन यातील विविध पैलूंचा समावेश करून क्रीडा क्षेत्रात क्रांती घडवून आणणे आणि क्रीडा क्षेत्रात भारतातर्फे पराक्रम गाजवू शकतील, असे भविष्यातील खेळाडू तैयार करणे, हे आमचे ध्येय तयार झाले आहे.
युजीसीच्या निर्णयाचे आम्ही स्वागत करीत आहो. यापुढे व्यवसायिक शिक्षणाच्या माध्यमातून आपल्याला भारतीय क्रीडा उद्योगाच्या दीर्घकालीन विकासाकरिता त्यातील प्रतिभा, नोकऱ्या आणि क्रीडा बौद्धिक संपत्ती तयार करण्यासाठी मोठ्या प्रमाणात झेप घेता येईल, अशी अपेक्षा असल्याचे मंत्री सुनील केदार यांनी सांगितले. आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ पुणे या संस्थेने जगातील नामांकित विद्यापीठे आणि संस्थांशी करार केला आहे.
म्हाळुंगे-बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलात वसलेले आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ ही शारीरिक व क्रीडा शिक्षण, क्रीडा विज्ञान व क्रीडा वैद्यक, क्रीडा तंत्रज्ञान, क्रीडा प्रशासन, क्रीडा व्यवस्थापण, क्रीडा माध्यमे व संज्ञापन, क्रीडा शिकवणी व प्रशिक्षण या विषयांचे अभ्यासक्रम राबविणारी पहिलीच शिक्षणसंस्था आहे. पहिल्या टप्प्यात २०२२-२३ या शैक्षणिक वर्षाकरिता क्रीडा विज्ञान व क्रीडा व्यवस्थापणतील ३ वर्षाचा अभ्यासक्रम, तसेच क्रीडा शिकवणी व प्रशिक्षण असा ३ महिन्यांचा अभ्यासक्रम सुद्धा सुरू करण्यात आला आहे.