हिंगणघाट -/शहरात कायदा व सुव्यवस्थेचा बुरखा पांघरून गरिबांच्या पोटावर लाथ मारण्याचे काम पोलिस प्रशासनाकडून सुरू असल्याचा गंभीर आरोप नागरिकांकडून केला जात आहे. ९ जानेवारी रोजी सुभाष चौक, पोलीस स्टेशन परिसरात एका बेरोजगार तरुणावर करण्यात आलेल्या अमानुष कारवाईने शहरात संतापाची लाट उसळली आहे.
रस्त्याच्या कडेला दूधडब्बा लावून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या तरुणाची बंडी जबरदस्तीने हटवण्यात आली. दूध अक्षरशः रस्त्यावर फेकून देण्यात आले. पोलिसांच्या या दडपशाहीमुळे दुकानात उभे असलेले ग्राहक पैसे न देता पळून गेले. यामध्ये संबंधित तरुणाचे ५ ते ७ हजार रुपयांचे थेट आर्थिक नुकसान झाले. एवढ्यावरच न थांबता त्याचा गॅस सिलेंडर जप्त करण्यात आला आणि कळस म्हणजे त्या युवकावर गुन्हा दाखल केल्याची माहिती समोर येत आहे.
ही संपूर्ण कारवाई पोलीस निरीक्षक अनिल राऊत यांच्या आदेशाने झाल्याचा दावा प्रत्यक्षदर्शी नागरिक करत असून, या घटनेनंतर एकच संतप्त सवाल जनतेतून विचारला जात आहे —
“गरिबाची बंडी फोडण्याची हिंमत आहे, मग शहरभर खुलेआम चालणाऱ्या दारू व ड्रग्सच्या धंद्यांवर हात घालण्याचे धैर्य कुठे जाते?”
नागरिकांच्या मते नंदोरी चौक, सरकारी दवाखान्यासमोरचा परिसर, पिंपळगाव रोड, दत्त मंदिर परिसर, आंबेडकर चौक, सुहानी मशिद, सिंधी कॉलनी, तेलंग खडी रोड, नूतन शाळा परिसर येथे रात्री दारू व एमडीसारख्या घातक अंमली पदार्थांची खुलेआम विक्री सुरू असते. आठवडी बाजार, डांगरी वॉर्ड मार्ग, लोटन चौक, कबरस्तान चौक, माता मंदिर चौक, आंबेडकर शाळा परिसर, शिवाजी मार्केट येथे तर अवैध धंद्यांना जणू प्रशासनाचे अभय मिळाले असल्याची चर्चा आहे.
दारू, ड्रग्स, जुगार, अवैध व्यवसाय शहराला पोखरत असताना पोलिस यंत्रणा डोळे झाकून बसली आहे का? की मोठ्या माफियांपुढे कायद्याची ताकद खुंटीला टांगली आहे? असा थेट सवाल आता नागरिक विचारू लागले आहेत. कायदा फक्त कष्टकरी, सामान्य आणि गरीबांसाठीच आहे का? श्रीमंत गुन्हेगार आणि माफियांसाठी वेगळा न्याय आहे का? असा संतप्त प्रश्न जनतेच्या मनात घोळत आहे.
या संपूर्ण प्रकारामुळे पोलिस प्रशासनाच्या निष्पक्षतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने हस्तक्षेप करून या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करावी आणि शहरातील सर्व अवैध धंद्यांवर बिनधास्त कारवाई करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. अन्यथा हा रोष केवळ शब्दांपुरता न राहता रस्त्यावर उतरल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची असेल, असा इशारा नागरिक देत आहेत.
प्रत्येक चौकात दुध विक्रेता नको, पण दारू विक्रेता चालतो — हाच का प्रशासनाचा न्याय?
हा प्रश्न आज संपूर्ण हिंगणघाट विचारत आहे. (क्रमशः)