‘ती’ आज वेळेवर आली.. अन् शाळकऱ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले!

0

🔥‘ती’ आज वेळेवर आली.. अन् शाळकऱ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले!

🔥सामाजिक कार्यकर्ते निखिल कडू यांच्या मांडणीने एसटी व्यवस्थापनाचा संवेदनशील निर्णय; सुधारित फेऱ्यांमुळे विद्यार्थ्यांची परवड थांबली

वर्धा -/ आर्वी ते सर्कसपूर दरम्यान धावणारी एसटी बस आज योग्य वेळेत गावात दाखल झाल्याने गेल्या अनेक दिवसांपासून वेळेअभावी शैक्षणिक नुकसानीला सामोरे जाणाऱ्या शाळकरी विद्यार्थ्यांची मोठी अडचण दूर झाली आहे. या शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला बसच्या वेळापत्रकात काही अपरिहार्य तांत्रिक कारणांमुळे बदल करण्यात आला होता. यामुळे १० वाजताची एसटी उशिराने धावत असल्याने शाळा वेळेत गाठणे विद्यार्थ्यांना कठीण जात होते. या समस्येकडे स्थानिक सामाजिक कार्यकर्ते निखिल कडू यांनी प्रशासकीय पातळीवर अत्यंत पद्धतशीरपणे पाठपुरावा करून लक्ष वेधले होते. अखेर एसटी व्यवस्थापनाने या मागणीची सकारात्मक व तातडीने दखल घेत वेळापत्रकात तात्काळ सुधारणा केल्याने विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

सर्कसपूर आणि टोणा येथील मिळून सुमारे ५० विद्यार्थी शिक्षणासाठी याच बससेवेवर प्रामुख्याने अवलंबून आहेत. पूर्वीच्या वेळापत्रकानुसार सकाळी सुटणारी बस योग्य वेळेत पोहोचत असल्याने विद्यार्थ्यांचा प्रवास सुकर होत होता. मात्र, मध्यंतरीच्या काळात या बसफेरीला लाडेगावचा अतिरिक्त फेरा जोडण्यात आल्यामुळे संपूर्ण वेळापत्रक विस्कळीत झाले होते आणि बस थेट दुपारी १२ नंतर पोहोचत होती. ही समस्या सामाजिक कार्यकर्ते निखिल कडू यांनी एसटी बसस्थानक व्यवस्थापकांच्या थेट भेटी घेऊन त्यांच्या निदर्शनास आणून दिली. तसेच या मार्गावरील प्रवाशांची व विद्यार्थ्यांची वास्तविक संख्या आणि त्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान लक्षात घेऊन पूर्वीची स्वतंत्र व्यवस्था अधिक योग्य ठरेल, अशी आग्रही विनंती केली होती.

या समस्येचे गांभीर्य ओळखून बसस्थानक व्यवस्थापन व नियंत्रकांनी अत्यंत संवेदनशीलता दाखवली. लोकप्रतिनिधी व सामाजिक कार्यकर्ते निखिल कडू यांनी मांडलेली बाजू तपासून एसटी प्रशासनाने अत्यंत गतिमानतेने अंमलबजावणी करत लाडेगावचा अतिरिक्त फेरा रद्द करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. आजपासून पूर्ववत जुन्या व सुकर वेळापत्रकानुसार सकाळी १० वाजता आर्वीहून सुटणारी एसटी थेट १०:३० वाजता सर्कसपूर येथे योग्य वेळेत पोहोचवली. बस वेळेत गावात आल्याचे पाहून ग्रामस्थांनी आणि चिमुकल्या विद्यार्थ्यांनी सुटकेचा श्वास सोडला.

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित लक्षात घेऊन तातडीने निर्णय घेणाऱ्या एसटी प्रशासनाचे व संबंधित अधिकाऱ्यांचे विद्यार्थ्यांसह सामाजिक कार्यकर्ते निखिल कडू यांनी मनःपूर्वक आभार मानले आहेत. प्रशासनाने जनभावना आणि विद्यार्थ्यांची गैरसोय समजून घेऊन त्वरित सकारात्मक पाऊल उचलले, हे ठिक असल्याचे निखिल कडू यांनी या प्रसंगी सांगितले. एसटी महामंडळाने दाखवलेल्या या तत्परतेमुळे विद्यार्थ्यांची रोजची होणारी पायपीट आणि पालकांची काळजी मिटली असून, प्रशासनाच्या या भूमिकेचे सर्कसपूर व टोणा येथील नागरिकांकडून स्वागत केले जात आहे.

        ब्युरो रिपोर्ट साहसिक      News-/24 वर्धा 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!