🔥धर्मदाय आयुक्त कार्यालयाच्या चौकशी अहवालामुळे केदारेश्वर मंदिरातील गैरप्रकार चव्हाट्यावर…सखोल तपास करून कारवाई करण्याची मागणी
प्रतिनिधी यवतमाळ -/ यवतमाळ येथील श्री केदारेश्वर महादेव मंदिर संस्थानमधील कथित आर्थिक अनियमितता, मंदिराच्या प्राचीन वास्तू व धार्मिक संरचनेतील बदल, परवानगीशिवाय करण्यात आलेले बांधकाम तसेच देवस्थानच्या मालमत्तेबाबतच्या तक्रारींच्या अनुषंगाने सहाय्यक धर्मदाय आयुक्त कार्यालयाकडून करण्यात आलेल्या चौकशीचा अहवाल प्राप्त झाला आहे. मात्र, हा अहवाल अनेक गंभीर बाबींवर केवळ खुलासा मागण्यापुरता मर्यादित असून, तक्रारीतील सर्व मुद्द्यांची सखोल चौकशी झालेली नसल्याचा आरोप तक्रारकर्ते अमोल कोमावार यांनी केला आहे. चौकशी अहवालातूनच मंदिर संस्थानमधील आर्थिक व प्रशासकीय व्यवहारांमध्ये अनेक अनियमितता समोर आल्या आहे.
केदारेश्वर मंदिरातील कथित गैरप्रकारांबाबत झालेले तक्रारीच्या अनुषंगाने सहाय्यक धर्मदाय आयुक्त कार्यालयाच्या निरीक्षकाने सादर केलेल्या अहवालात पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालये संचालनालय, नागपूर विभागाने १६ फेब्रुवारी २०२६ रोजी मंदिराची पाहणी करून दिलेल्या सूचनांचे अनुपालन करण्याचे निर्देश विश्वस्तांना देण्याची बाब नमूद करण्यात आली आहे.
या अहवालात मंदिरातील दानपेट्यांवर मंजूर योजनेनुसार विश्वस्तांचे सील नसणे, दानपेट्यांमधून प्राप्त होणारे सर्व उत्पन्न देवस्थानच्या बँक खात्यात जमा न होणे याची अहवालात नोंद घेण्यात आली आहे. देवस्थानचे सचिव यांनी भक्तांकडून प्राप्त होणाऱ्या देणग्या कोणत्या अधिकारात स्वतःच्या खात्यात वळविल्या, याबाबतही खुलासा मागण्याची बाब अहवालात नमूद आहे.
देवस्थानच्या तीन दुकानांना भाड्याने देण्यासाठी कलम ३६(१)(ब) अन्वये परवानगी घेण्यात आली नाही. कोषाध्यक्ष जितेंद्र चोखाणी यांच्या ताब्यात असलेल्या विविध चांदीच्या व इतर धातूंच्या वस्तूंची मालमत्ता नोंदवहीत नोंद करण्यात आली नसल्याची नोंद आहे.
🔥देवस्थानची जमीन विक्री, परवानगीचा अभाव
मौजा पिंपळगाव, ता. जि. यवतमाळ येथील गट क्र. ९ मधील देवस्थानच्या मालकीची जमीन विकण्यात आली असून, त्यासाठी कलम ३६(१)(अ) अन्वये आवश्यक परवानगी घेण्यात आली नसल्याचेही चौकशी अहवालात नमूद करण्यात आले आहे.
🔥बांधकामाच्या खर्चावरही प्रश्नचिन्ह
मंदिरातील बांधकामाबाबत विश्वस्तांनी कंत्राटदार संजय बर्डे यांना बांधकाम आदेश किंवा परवानगी दिल्याचे दिसून येत नाही. बांधकाम खर्चासाठी कंत्राटदाराने मागणीपत्र घेतले नाही. विशेष म्हणजे कंत्राटदाराला बांधकामाची रक्कम धनादेशाद्वारे न देता रोख स्वरूपात देण्यात आली. पावती पुस्तकाद्वारे प्राप्त होणारे उत्पन्नही देवस्थानच्या खात्यात जमा करण्यात आले नसल्याचे अहवालात नमूद आहे.
कोमावार यांच्या म्हणण्यानुसार, बांधकामासाठी निविदा काढल्याचे सांगण्यात आले असले तरी निविदेची प्रसिद्धी झालेल्या वृत्तपत्राची प्रतच सादर करण्यात आलेली नाही. तसेच एकाच दिवशी प्रत्येकी ३३ हजार रुपयांप्रमाणे आठ स्वतंत्र व्हाऊचरद्वारे रोख रक्कम अदा करण्यात आल्याचा मुद्दाही अहवालात नमूद आहे. त्यामुळे या संपूर्ण बांधकामाच्या खर्चाची स्वतंत्र व पारदर्शक चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
🔥कुंडातील कासवांचा शोध घेण्याची मागणी
केदारेश्वर मंदिर परिसरातील प्राचीन कुंड बुजविण्यात आल्याचा तसेच त्यामध्ये असलेली जवळपास १०० कासवे बेपत्ता असल्याचा आरोप कोमावार यांनी केला आहे. या बाबीची चौकशी धर्मदाय आयुक्त कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात येत नसल्यास प्रकरण वन विभागाकडे वर्ग करून स्वतंत्र चौकशी करणे आवश्यक होते, असे त्यांनी म्हटले आहे. मात्र, चौकशी अहवालात या बाबीचा उल्लेख नसल्याचा त्यांचा आरोप आहे.
🔥आता शॉपिंग कॉम्प्लेक्सच्या हालचालींवरही आक्षेप
केदारेश्वर मंदिराच्या आवारात शॉपिंग कॉम्प्लेक्स उभारण्याच्या हालचाली सुरू असून, त्यासाठी मंदिर ट्रस्टकडून परवानगी मागण्यात आल्याचे कोमावार यांनी म्हटले आहे. मंदिराच्या धार्मिक व ऐतिहासिक स्वरूपाचे जतन करण्याऐवजी व्यावसायिकीकरणाला प्राधान्य दिले जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या सर्व बाबींचा केवळ खुलासा घेऊन न थांबता आर्थिक व्यवहार, बांधकाम, देवस्थानची मालमत्ता, देणगी संकलन, प्राचीन वास्तू व वन्यजीवांशी संबंधित मुद्द्यांची संबंधित विभागांकडून स्वतंत्र आणि सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी अमोल कोमावार यांनी केली आहे.(क्रमशः)