वर्धा -/येथील भारताचा कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी लेनिनवादी) लिबरेशन च्या जिल्हा कार्यालय 26 इंदिरा मार्केट वर्धा येथे दिनांक 9 जानेवारी 2026 ला फातिमा शेख यांची जयंती साजरी करण्यात आली.यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष जेष्ठ पत्रकार राजू गोरडे, प्रमुख पाहुणे वर्धेचे सामाजिक कार्यकर्ते तथा प्रबोधनकार पद्माकर कांबळे, पत्रकार संरक्षण समिती म. रा.चे ग्रामीण जिल्हाध्यक्ष संदीप रघाटाटे होते. यावेळी फातिमा शेख यांच्या प्रतिमेला कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते पुष्प माला अर्पण करण्यात आले . यावेळी कार्यक्रमाची सुरुवात पद्माकर कांबळे यांनी फातिमा शेख यांच्या जयंतीनिमित्त गीत सादर केले. त्यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार राजू भाऊ गोरडे यांनी फातिमा शेख यांच्या जयंतीनिमित्त विचार व्यक्त करताना म्हणाले की,
भारतातील मुस्लिम समाजातील पहिली महिला शिक्षिका आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या सह-अध्यापिका फातिमा शेख यांच्या जयंतीनिमित्त (9 जानेवारी 1831) विनम्र अभिवादन भारतीय समाजातील स्त्री शिक्षणाच्या इतिहासात फातिमा शेख यांचे स्थान अत्यंत महत्त्वाचे, पण दीर्घकाळ दुर्लक्षित राहिलेले आहे. त्या भारतातील मुस्लिम समाजातील पहिल्या महिला शिक्षिका म्हणून ओळखल्या जातात. स्त्री-शूद्र-अतिशूद्र शिक्षणाचा दीप प्रज्वलित करणाऱ्या सावित्रीबाई फुले यांच्या त्या सह-अध्यापिका होत्या. फुले दांपत्याच्या शैक्षणिक व सामाजिक क्रांतीत फातिमा शेख यांचे योगदान केवळ सहकार्यापुरते मर्यादित नव्हते, तर ते वैचारिक धैर्य, सामाजिक जोखीम आणि मानवी करुणेचे प्रतीक होते.
19 व्या शतकातील जातीय, धार्मिक आणि लैंगिक भेदांनी ग्रासलेल्या समाजात स्त्री शिक्षणाची कल्पनाच बंडखोरी मानली जात होती. अशा प्रतिकूल वातावरणात म ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी जेव्हा मुलींसाठी शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला, तेव्हा समाजाने त्यांच्यावर बहिष्कार टाकला. त्या कठीण काळात फातिमा शेख आणि त्यांचे भाऊ उस्मान शेख यांनी फुले दांपत्याला आपल्या घरात आश्रय दिला. पुण्यातील त्यांच्या वाड्यात सुरू झालेली शाळा ही केवळ एक शिक्षणसंस्था नव्हती, तर ती जात-धर्म-वर्णभेदाविरुद्ध उभी राहिलेली वैचारिक क्रांती होती.
फातिमा शेख यांनी सावित्रीबाई फुले यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून अध्यापन केले. समाजाच्या रोषाला, अपमानाला आणि धमक्यांना सामोरे जात त्यांनी शिक्षणाचे कार्य अखंडपणे सुरू ठेवले. त्या काळी मुस्लिम स्त्रीने सार्वजनिक क्षेत्रात येऊन शिक्षण देणे हे दुहेरी धाडस होते—स्त्री म्हणून आणि अल्पसंख्याक समाजातील सदस्य म्हणून. तरीही फातिमा शेख यांनी माघार घेतली नाही. त्यांनी बहुजन, दलित, वंचित मुलींना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे पवित्र कार्य केले.
फातिमा शेख यांचे कार्य हे फक्त शिक्षणापुरते मर्यादित नव्हते; ते सामाजिक समतेच्या व्यापक लढ्याचा भाग होते. फुले दांपत्याच्या सत्यशोधक विचारांशी त्यांची भूमिका सुसंगत होती. स्त्री शिक्षण, धार्मिक सलोखा, मानवी बंधुता आणि सामाजिक न्याय या मूल्यांची त्यांनी प्रत्यक्ष कृतीतून मांडणी केली. असे विचार कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार राजूभाऊ विचार व्यक्त केले. यावेळी उपस्थित नजर भाई शेख, केशवराव शंभरकर, अनिल लांब सोगे, नारायण जारोडे, नितीन सुळे, प्रल्हाद चांभारे, इत्यादी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.