भाजपा सरकारने विकासाचे मापदंड उलटे केले,काँग्रेस नेते चिमोटे यांची टीका

0

🔥भाजपा सरकारने विकासाचे मापदंड उलटे केले,काँग्रेस नेते चिमोटे यांची टीका

प्रतिनिधी यवतमाळ-/ संयुक्त राष्ट्र संघाने मानवी विकासाचे तीन मापदंड दिले आहेत. त्यामध्ये प्रथम क्रमांकावर आरोग्य, त्यानंतर शिक्षण आणि नंतर मूलभूत सुविधा असा क्रम दिला आहे. मात्र, भाजपा सरकारने शिक्षण आणि आरोग्याला खाली करून मूलभूत सुविधांना प्रथम क्रमांक दिला. भाजपाचे सरकार शिक्षण आणि आरोग्याला दुर्लक्षित करून कोट्यावधी रुपयांच्या कमिशन साठी फक्त रस्ते विकासाला प्राधान्य देत असल्याची टीका काँग्रेसचे नेते चिमोटे यांनी केली. ते यवतमाळ येथे राज्याचे माजी शिक्षण मंत्री तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रा. वसंतराव पुरके सर यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.

               दिनांक २३ ऑक्टोबर रोजी शिक्षक विधान परिषद मतदारसंघाची निवडणूक होत आहे. यामध्ये काँग्रेसतर्फे अदिती पोहरे या निवडणूक लढवीत आहेत. उच्चशिक्षित असलेल्या अदिती पोहरे शिक्षकांच्या समस्या तसेच त्यांच्या मागण्या नक्कीच पूर्ण करतील, अशी ग्वाही चिमोटे यांनी दिली. शिक्षकांच्या जुन्या पेन्शनबाबत काँग्रेस सकारात्मक असून, राजस्थान तसेच कर्नाटकात आमचे सरकार आल्याबरोबर आम्ही शिक्षकांना जुनी पेन्शन दिल्याचे त्यांनी सांगितले. महाराष्ट्रातसुद्धा काँग्रेसचे सरकार आल्यास शिक्षकांना जुनी पेन्शन दिली जाईल, असे आश्वासनही त्यांनी दिले.

                राज्य तसेच केंद्रातील भाजपाचे सरकार नुसतेच कोट्यवधी रुपयांचे रस्ते बनवत आहे; मात्र शिक्षणाकडे त्यांचे दुर्लक्ष आहे. विद्यार्थीच घडला नाही, तर देश कसा घडेल, असा प्रश्नही त्यांनी या अनुषंगाने उपस्थित केला. पत्रकार परिषदेला प्राध्यापक वसंतराव पुरके, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सचिन नाईक आणि संजय ठाकरे उपस्थित होते. 

🔥समविचारी संघटनांसोबत चर्चा

या निवडणुकीमध्ये समविचारी संघटनांसोबत चर्चा करण्यासाठी प्राध्यापक वसंत पुरके, मिलिंद चिमोटे तसेच आमदार धीरज लिंगाडे यांची समिती तयार झाली असून, ती लवकरच इतर संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करून त्यांचे समर्थन मिळवण्याचा प्रयत्न करणार आहे, अशी माहिती वसंतराव पुरके यांनी दिली. राज्यात शिक्षकांची ६६ हजार पदे रिक्त आहेत; मात्र ही पदे भरण्यासाठी सरकार गंभीर नाही, असा आरोपसुद्धा वसंतराव पुरके यांनी केला. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सचिन नाईक यांनी मतदार यादीमध्ये घोळ असल्याचा आरोप केला. या संदर्भात कोणीही समाधानकारक उत्तर देत नसल्याचेही त्यांनी सांगितले.

ब्युरो रिपोर्ट साहसिक News-/24 यवतमाळ 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!